श्रीपाद छिंदम पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

श्रीपाद छिंदम पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

नगर : माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत असल्याचे संकेत आहेत. त्याने आज एक पत्रक प्रसिद्धीस देवून आपण शहरासाठी दहा कोटींची कामांसाठी पाठपुरावा केला. हा निधी आता मंजूर झाला असून, शहराचा विकास होईल, असा दावा केला आहे.

 आगामी निवडणुकीत जनताच आता न्यायनिवाडा करणार आहे. मी केलेली विकासकामे जनतेसमोर घेवून जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे छिंदम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेच्या कामासंदर्भात छिंदम याने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्याची आॅडिओक्लिप सोशल मीडियावर प्रसारीत झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व शिवप्रेमींनी छिंदम याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. छिंदम याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकही झाली. दरम्यान, जामीनावर सुटल्यानंतर त्याने महापालिकेच्या एका महासभेला हजेरीही लावली होती.

उपमहापाैरपदाचा राजीनामा आपण दिला नसून, महापालिकेत दाखल झालेल्या राजीनाम्यावर आपली सही नसल्याचे त्याने सांगून राजीनामा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता एक पत्रक प्रसिद्धीस देवून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित केले आहे.

पत्रकात छिंदम याने म्हटले आहे, की नगर शहराच्या विकासासाठी भरीव निधी मिळावा, यासाठी उपमहापाैरपदाची जबाबदारी स्विकारल्यापासून आपण सतत प्रयत्नशील होतो. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासकडे शहर विकासासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव दाखल करून विविध कामे सुचविली. याबाबत अनेक बैठका मंत्रालयात झाल्या. त्याला आता यश आले असून, शनिवारी हा निधी महापालिकेला वर्ग झाला आहे. आता लवकरच हे कामे सुरू होतील.

सत्ताधारी शिवसेनेला महापालिकेत राजकारणाशिवाय काही सुचले नाही. कार्यकाळ संपायची वेळ आली, तरीही शिवसेनेच्या महापाैरांना कोणताही निधी आणता आला नाही. आता शिवसेनेच्या नाकावर टिच्चून शहरात विविध विकासकामे होणार आहेत.

मी पहिला उपमहापाैर आहे, की ज्याने शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणला. आजपर्यंतचे उपमहापाैर केवळ रबरी शिक्के होते. माझी कारकीर्द विकासकामांचा ठसा उमटविणारा ठरला आहे. माझ्या कामाचा धडाका महापाैर व संबंधित काही मंडळींच्या खुपत होता. त्यांच्या चुकीच्या कामांना मी सतत विरोध करीत होतो. त्यामुळेच माझी राजकीय कारकीर्द संपविण्याच्या उद्देशाने माझ्यावर हे बालंट आणले. माझे भांडण हे जनतेच्या प्रश्नांसाठी होते. शिवसेनेने त्याचा विपर्य़ास केला. आता लवकरच जनताच याचा न्यायनिवाडा करणार आहे. कोण दोषी, कोण निर्दोष हे लवकरच दिसून येईल, असेही छिंदम याने पत्रकात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com