Shrikant Jichkar observed Roja for Friendship | Sarkarnama

मैत्रीखातर डॉ. श्रीकांत जिचकारांनी 'रोजा' ठेवला होता 

अनीस अहमद, काँग्रेस (शब्दांकन - सुरेश भुसारी)  
रविवार, 5 ऑगस्ट 2018

आम्हा युवकांमध्ये जिचकार यांच्याबद्दल एक अप्रूप होते. आमचे ते आजच्या भाषेत बोलायचे तर 'आयडॉल' होते. 'श्रीकांत दादा, श्रीकांत दादा' करीत आम्ही त्यांच्या मागे मागे राहायचो - अनीस अहमद

नागपूर : डॉ. श्रीकांत जिचकार, अविनाश पांडे यांच्या मैत्रीमुळे मला राजकारणात यश मिळाले. मैत्रीचे बंध इतके घट्ट झाले होते की, जात, धर्म कुठे आड आलीच नाही. एका वर्षी रमजानच्या महिन्यात डॉ. श्रीकांत जिचकार यांनी रोजा ठेवला होता. मैत्रीची ही आठवण मी कधीच विसरू शकत नाही.
 
डॉ. श्रीकांत जिचकार तेव्हा विद्यार्थी नेते होते. ते तेव्हा नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस करीत होते. तेव्हा मी हिस्लॉप कॉलेजमध्ये होतो. हिस्लॉप कॉलेज हे महाविद्यालयीन निवडणुकीसाठी होणाऱ्या खलबताचे केंद्र राहत होते. हिस्लॉपच्या जवळच असलेल्या जीएस कॉमर्स कॉलेजमध्ये अविनाश पांडे शिकत होते. आम्ही तिघेही तीन महाविद्यालयात शिकत होतो. परंतु, मैत्री पक्की झाली. यामागे डॉ. श्रीकांत जिचकार कारणीभूत होते. आम्हा युवकांमध्ये जिचकार यांच्याबद्दल एक अप्रूप होते. आमचे ते आजच्या भाषेत बोलायचे तर 'आयडॉल' होते. 'श्रीकांत दादा, श्रीकांत दादा' करीत आम्ही त्यांच्या मागे मागे राहायचो. 

यातूनच या दोन नेत्यांशी संपर्क आला. हे संबंध पुढे मैत्रीत परावर्तीत झाले. आजही अविनाश पांडे नागपुरात आले की, फोन करतात. त्यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. मी पहिल्यांदा 1990 मध्ये विधानसभा निवडणूक लढविली. तेव्हा नुकताच कॉलेजमधून बाहेर आलो होते. त्यावेळी श्रीकांत जिचकार व अविनाश पांडे यांनीच निवडणुकीचे तंत्र समजावून सांगितले. 1980 मध्ये श्रीकांत जिचकार आमदार झाले होते तर अविनाश पांडे 1985 मध्ये निवडून आले होते. 1990 च्या निवडणुकीत माझा केवळ 6 मतांनी पराभव झाला. हा पराभव खूप मनाला लागला. कारण मला काँग्रेसची उमेदवारी श्रीकांत जिचकार यांच्यामुळेच मिळाली होती. त्यावेळी या दोन्ही मित्रांनी खूप आधार दिला. 

पुढे मी 1995 मध्ये मध्य नागपूर मतदारसंघातून निवडून आलो. पुढे मंत्रीपदही भूषविले. परंतु, 1990च्या पराभवानंतर या दोन्ही मित्रांनी दिलेला सल्ला कधीही विसरू शकत नाही. एवढेच नव्हे माझ्या मैत्रीखातर डॉ. श्रीकांत जिचकार यांनी रमजान महिन्यात 'रोजा' ठेवला होता. दिवाळीच्या मी नेहमी त्यांना शुभेच्छा देत होतो. परंतु. एका हिंदू मित्राने माझ्यासाठी रोजा ठेवायचा, ही कल्पनाच माझ्यासाठी नवीन होती. यातून त्यांचे माझ्याप्रती असलेले प्रेम, सहानुभूती स्पष्ट झाली. असे मित्र मिळणे आता कठीण आहे. या मैत्रीला माझा सलाम. 
 

संबंधित लेख