Shrigonde municipal election MLA Rahul Jagtap on back foot | Sarkarnama

श्रीगोंदे पालिकेबाबत आमदार जगताप बॅकफूटवर

संजय आ. काटे
रविवार, 29 जुलै 2018

श्रीगोंदे तालुक्याची आमदारकी जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असली तरी शहरात पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी त्यांच्याकडे आज सक्षम चेहरा नाही.

श्रीगोंदे (जि. नगर),  : श्रीगोंदे तालुक्याची आमदारकी जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असली तरी शहरात पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी त्यांच्याकडे आज सक्षम चेहरा नाही. याउलट भाजपाच्या माध्यमातून माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या गटाकडे उमेदवारांची यादीच आहे.

काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. त्यामुळे आमदार राहूल जगताप पालिकेत बॅकफूटवर असून, भाजप व काँग्रेसने मोठी जुळवणी सुरू केल्याचे दिसते. 

दिवाळीपुर्वीच पालीकेची निवडणूक जाहीर होईल. मात्र सध्या शहरातील वातावरण तापलेले दिसते. उरलेल्या महिन्यात पालीकेत नगराध्यक्ष बदलाचे वारे वाहत असले तरी मनोहर पोटे यांना हटविण्यात पाचपुते गट राजी नसल्याचे बोलले जाते.

त्यांना हटवून जरी नाना कोथिंबीरे यांच्याकडे सुत्रे आली तरी होवू घातलेल्या निवडणूकीत पुन्हा पोटे हे नगराध्यक्षपदासाठी पाचपुते गटाचे सर्वात सक्षम नेते मानले जातात. त्यांच्यासोबत सुनीता शिंदे, छाया गोरे  व डाॅ. सुवर्णा होले यांची नावे प्रमुखांच्या तोंडी आहेत. 

दोन्ही काँग्रेसची नगरपालीकेला आघाडी ग्राह्य धरली जात आहे. कारण त्यांनतर विधानसभा असल्याने नेते वेगळे लढण्याचे धाडस करणार नाहीत. शिवाय पाचपुते यांचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाला असला तरी त्यांची ताकत कमी नसल्याने विरोधक तशी हिम्मत करणार नाहीत. आघाडी झाली तर येथून काँग्रेसलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी लागेल असे दिसते. 

त्याची दोन कारणे आहेत. विधानसभा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे पुन्हा दिसते. दुसरे असे की पालिकेत  राष्ट्रवादीला नगराध्यक्षपदाचा चेहराचा नाही. काही नावांची चर्चा होत असली तरी त्यातील काही नावे तर प्रभागात जिंकतील की नाही अशी आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आमदार जगताप यांच्याकडेच चेहरा नसल्याने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्यावाचून त्यांना पर्याय दिसत नाही. 

काँग्रेसमध्येही नगराध्यक्षपदासाठी मातब्बर कार्यकर्त्यांची वानवा असली तरी विद्यमान उपनगराध्यक्ष अर्चना गोरे यांचेच नाव सध्या घेतले जाते. ऐनवेळी भाजपातील सुंदोपसुंदीचा फायदा काँग्रेस घेवू शकते. कारण सुनीता शिंदे व पोटे यांना नगराध्यक्ष करण्यात काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांचाच मोठा वाटा आहे. त्यामुळे ऐनवेळी त्यांच्यातील एकाची नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकते. अर्थात या आडाख्यांचे हे दोन्ही इच्छूक आज खंडन  करतील मात्र भविष्यात काहीही घडू शकते अशी शहरात चर्चा आहे. 

संबंधित लेख