Shobha De trolled on twitter for opposing Thakray memorial | Sarkarnama

ठाकरेंच्या स्मारकाला विरोध करणाऱ्या शोभा डे यांची ट्‌विटरवर धुलाई

सरकारनामा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे पुतळे आणि स्मारके झाली त्याबाबत तुम्ही काय बोलणार? या विषयांवर तुम्ही का बोलत नाहीत? अशी विचारणा  अनेकांनी केली. 

मुंबई : "आणखी स्मारकांची गरजच काय? आम्हाला शाळा, दवाखान्यांची गरज आहे. मला 100 कोटी रुपयांची ग्रॅंट द्या. एक नागरिक म्हणून या 100 कोटी रुपयांचा वापर लोकहितासाठी कसा करायचा हे मी दाखवून देईन,'' असे ट्विट शोभा डे यांनी केल्यानंतर ट्‌विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाचे पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडले. त्यानंतर काही वेळाने शोभा डे यांनी स्मारकावर 100 कोटी रुपये खर्च करण्यास विरोध दर्शविणारे ट्‌विट केले.

 

 

त्यांच्या ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेकांनी ट्विटरवर शोभा डे यांची धुलाई केली आहे. एक लेखिका म्हणून आपल्या लेखनाचा दर्जा सुधारावा, कामोत्तेजक लेखन करू नका, कमी घ्या आणि घेतल्यानंतर ट्विट करू नका असे सल्ले ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या मंडळींनी शोभा डे यांना दिले आहेत. काहींनी तुमच्या स्मरणार्थ स्मारक बांधले जाणार नाही असेही सांगितले.

सिया त्रिपाठी यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, "शोभा डे यांना 100 कोटी दिले तर त्या पुन्हा भारतात दिसणारच नाहीत. शोभा डे त्यांचा मित्र विजय मल्ल्यासोबत परदेशात असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध होईल.''

राहुल कटारिया शोभा डे यांना असे बोलणे तुम्हाला 'शोभ'त नाही असे म्हटले आहे.

संजय लिंगे यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, " गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला त्याचा खर्च हजारो करोड होता. तेव्हाच ते पैसे मागायला हवे होते तुम्ही. कुठे 100 करोडच्या मागे लागलाय?''

तर एकाने असे म्हटले आहे, मेहुल चोकसी यांच्यापासून पैसे घेऊन पळून जाण्याची प्रेरणा घेतली आहे का? तुम्ही हे पैसे घेऊन फरार होऊन अँटिग्वा सारख्या देशात स्थायिक होणार असे दिसते. 

तमिळनाडूमध्ये लेनीनच्या पुतळ्याच्या उद्‌ घाटनाच्या वेळी तुम्ही फेव्हिकॉल घेतले होते काय? असा प्रश्‍न एकाने उपस्थित केला आहे. 

इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांचे पुतळे आणि स्मारके झाली त्याबाबत तुम्ही काय बोलणार? या विषयांवर तुम्ही का बोलत नाहीत? अशी विचारणाही अनेकांनी केली. 

प्रज्योत देवलासी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच तुम्ही मुंबईत मोकळा श्‍वास घेऊ शकता.'' 

अनेकांनी त्यांच्यावर कॉंग्रेसधार्जिण्या असल्याचाही आरोप केला आहे.

संबंधित लेख