सुप्रिया सुळे यांच्या सेल्फिप्रेमावर शिवतारे यांची उपरोधिक टीका

सुप्रिया सुळे यांच्या सेल्फिप्रेमावर शिवतारे यांची उपरोधिक टीका

पुणे : पुरंदरचे आमदार, राज्यमंत्री विजय शिवतारे आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघांतील राजकीय सामना पुन्हा सुरू झाला आहे. पुरंदर मतदारसंघातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो सुळे यांनी सेल्फिसह पोस्ट केल्याने शिवतारे भडकले आहेत.

सुळे यांच्या खासदारकीच्या कामाचा जाब या निमित्ताने शिवतारे यांनी विचारला आहे. तसेच त्यांना काहीच काम नसल्याने सेल्फी काढण्याचेच काम उरले असल्याची उपरोधिक टीका एका जाहीर पत्राद्वारे त्यांनी केली आहे. शिवतारे यांच्या पत्राला आता सुप्रिया सुळे काय उत्तर देणार, याची प्रतिक्षा आहे.

शिवतारे यांचे पत्र जसेच्या तसे.... 

मा. खासदार सुप्रियाताई सुळे,
सप्रेम जय महाराष्ट्र ...
पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार करण्याबाबत मध्यंतरी आपली बातमी वाचली आणि एक दोन ठिकाणी काढलेले सेल्फीही पाहिले. कात्रज घाटात काम सुरु होण्याच्या बरोबर काही काळ आधी आपण पहिला सेल्फी कात्रज घाटात काढलात. त्यानंतर दुसरा सेल्फी काढलात तो फुरसुंगीला. या राष्ट्रीय महामार्गासाठी खासदार म्हणून आपण गडकरींकडे पाठपुरावा करायचे सोडून सेल्फीच काढत बसलात. नंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि नामदार गडकरी साहेबांकडून आम्ही हा रस्ता मार्गी लावला. आपल्या दुर्दैवाने आपलं एक तंत्र माझ्या लक्षात आलं आहे. मी मंजूर केलेल्या कामांची यादी अधिकाऱ्यांकडून घ्यायची आणि ही कामे चालू होण्याच्या टप्प्यात आली की आपण सेल्फी काढत सुटता. उरुळी कांचन वाघापूर जेजुरी रस्त्यावर आपण काढलेला सेल्फीही मी पाहिला. तांत्रिक कारणामुळे या कामाच्या दोनदा निविदा झाल्या. आता ते श्री. डी.टी.पाटील नावाच्या उद्योजकाला मिळाले आहे. बँक आणि सरकारमधील वाटाघाटी पूर्ण होऊन हे काम आता लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसताच तिथेही आपण सेल्फिसाठी आपल्या कार्यकर्त्यांसह अवतरलात. 


यापुढे सेल्फीसाठी आपण जास्त त्रास घेण्याची आवश्यकता नाही. मीच आपल्याला माहिती देतो. सासवड नारायणपूर कापूरहोळ या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. तिथे सेल्फीसाठी आपण जाऊ शकता. फुरसुंगी उरुळी देवाची या ९३ कोटींच्या पाणीयोजनेचे काम सदया वेगाने सुरू आहे. कुठल्याही स्थितीत जून २०१९ मध्ये योजना चालु करण्याचे आदेश मी प्राधिकरणाला दिले आहेत. स्वतःचे काहीच काम नसल्यामुळे तिथेही एखादा फेरफटका मारून आपण सेल्फी काढू शकता.

मंतरवाडी खडीमशीन चौक रस्त्याचे जवळपास ७१ कोटीचे कॉक्रीटमध्ये काम सुरु आहे. खरं तर या रस्त्याची दुर्दशा आपल्याच काळात झाली. पुण्यात वाहतूक कोंडी नको म्हणून सोलापूर रोड, मुंबई तसेच बंगळूर रस्ता या तीन-तीन राष्ट्रीय महामार्गांची रहदारी आपण मंतरवाडी कोंढवा रस्त्याने वळवलीत. त्याचा अमाप त्रास येथील लोकांनी भोगला. आता निदान सेल्फी काढण्यासाठी तरी आपण तिथे जायला हवे. दिवे गायरानात पुढील काळात राष्ट्रीय बाजार संकुल होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २४ रस्ते मंजूर आहेत. त्यातील अनेकांची कामे चालू आहेत तर काही सुरु होणार आहेत. तिथेही आपण सेल्फीसाठी जायला हरकत नाही. क्रीडासंकुल आणि धान्य गोदामाचे काम दिवे येथे चालू आहे. जलसंधारणाची तर अफाट कामे आहेत. आपल्याला सेल्फीचीच हौस असेल तर कुठल्याही बंधाऱ्यांच्या बाजूला उभे राहून ती भागवता येईल.


उत्कृष्ट खासदार सोडा पण उत्कृष्ट सेल्फीपटू आपण नक्की होऊ शकाल. सेल्फी, आरोग्य शिबिरं किंवा जिल्हा परिषदेच्या सायकली वाटायला खासदार होण्याची बिलकुल आवश्यकता नाही. कोपऱ्यावरच्या गणपती मंडळांचे अध्यक्ष अशी कामे नित्यनेमाने करत असतात. पवार चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनही आपण हे काम करू शकता. त्यासाठी उगाचच खासदारकीची जागा अडवून ठेवणे योग्य नाही. केंद्राकडून इतक्या वर्षात एकही प्रकल्प आपण आणू शकला नाही. केंद्रीय रस्ते विकास निधीतून एक छदामही तुमच्या मतदारसंघात तुम्हाला आणता आला नाही यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठली असू शकते ? विमानतळ हा तसा केंद्राचा विषय पण त्याबाबत अजून तुमच्या घरातच एकवाक्यता नाही. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. ‘सेल्फी विथ सुप्रिया सुळेज वर्क्स’ या नावाने आपण एखादी मोहीम राबवा आणि आपली कामे जनतेला एकदा दाखवाच.

जनतेलाही या मोहिमेचे खूप कुतूहल लागून राहिले आहे. तुम्हाला पुरंदरचा आमदार राष्ट्रवादीचा हवा असल्याचेही मी वाचले. पण हे निर्णय जनता घेत असते. तुमच्या इच्छेला त्यामुळे काडीचाही अर्थ उरत नाही. पवार साहेबांची कन्या या एकाच पात्रतेवर आपल्याला आजवर दिलेली संधी आपण काम करायचं सोडून सेल्फी काढत वाया घालवली. त्यामुळे आता बारामतीचा खासदार तुमचा नको ही जनतेची इच्छा आहे. प्रशासकीय इमारत, जेजुरी रुग्णालय व अन्य कामांसाठी आपण घंटानाद केलात. सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह २२ कोटींची राज्यातील ही एकमेव एवढी मोठी प्रशासकीय इमारत आहे. मी अधिवेशनात या कामाला निधी मिळवल्याचे समजताच आता काम पूर्ण होणार हे लक्षात आल्यावर आपल्याला घंटानाद आठवला आहे. प्रशासकीय प्रक्रियेत आमच्याकडे एखाद दुसरं काम रेंगाळतं कारण आम्ही काम करतो. पण शरद पवार साहेबांच्या कन्येकडे निदान स्वतःचं असं रेंगाळलेलं कामही दाखवायला नसावं ही बाब तुमच्यासाठी नसली तरी जनतेसाठी आश्चर्यकारक आहे. दर निवडणुकीला सासवड, जेजुरीला आपण भेट देऊन लोकल रेल्वे आणायचे आश्वासन देता. मागील १२ वर्ष झाली. आपली लोकल रेल्वे अजून कागदावर सुद्धा नाही. त्यासाठी घंटानाद करायचे आपण विसरलात.

असो. एकदा आपली कामे जनतेच्या अवलोकनार्थ जाहीर कराल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.
आपला हितचिंतक
विजय शिवतारे, राज्यमंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com