shivsmarat shivaji maharaj statue assembly news | Sarkarnama

शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याने सत्ताधारी विरोधकांकडून धारेवर 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई : शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत विरोधकांनी आज गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दहा मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. विधानसभेत विरोधकांनी "तुमचं आमचं नात काय ? जय जिजाऊ शिवराय !" अशा घोषणा देत कामकाज बंद पाडले. त्यानंतर कामकाज सुरू होताच स्थगन प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी सभात्याग करत सरकारचा निषेध केला. 

मुंबई : शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत विरोधकांनी आज गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दहा मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. विधानसभेत विरोधकांनी "तुमचं आमचं नात काय ? जय जिजाऊ शिवराय !" अशा घोषणा देत कामकाज बंद पाडले. त्यानंतर कामकाज सुरू होताच स्थगन प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी सभात्याग करत सरकारचा निषेध केला. 

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निविदा राज्य सरकारने दिली आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्यांच्या पुतळ्याची उंची कमी करत 112 फुट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले,"" आम्ही शिवस्मारकाचा निर्णय घेताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 160 मी निश्‍चीत केली होती. मात्र, सध्या त्याची उंची 160 मीटर वरून 126 मीटर केली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्याबाबतीत मी बराच वेळ खर्च केला आहे. डिजाईनमध्ये बदल मी समजू शकतो. महाराजांच्या पुतळ्यांची उंची कमी करणे म्हणजे महाराजांच्या विचारांचे प्रातरणा करणे आहे.'' 

पहिल्या प्रस्तावाला पर्यावरण खात्याने मंजूरी दिला आहे. आता या सरकारने पुन्हा उंची कमी केली आहे. छत्रपतींचे नाव घेवून सत्तेत आला अन्‌ महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करता या बद्दल महाराष्ट्राची जनता तुम्हाला प्रस्ताव माफ करणार नाही. यावर स्थगन प्रस्तावावर चर्चा करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, " हा विषय अत्यंत गंभीर आहे. ही सरकारची हातचलाखी आहे का ? महाराजांचा पुतळा दहा फुटाचा कराल अन्‌ चबुतऱ्याची उंची 200 मीटर कराल आणि म्हणाल आमचा पुतळा जगात मोठा आहे. हे बरोबर नाही. यापुर्वीच्या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली होती. आता स्मारकाच्या रचनेत बदल केला आहे. म्हणजे पुन्हा पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी स्मारक रखडणार आहे." 

पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, " सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा आवमान करण्याचे धाडसं हे सरकार करत आहे. हे स्मारकाबाबत दिलेले अश्वासन आपण पाळत नाही. यावर आम्हाला चर्चा करायची आहे. स्थगन प्रस्ताव स्विकारा. " 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, " राज्यातील तमाम शिवप्रेमींना संतप्त करणारी ही गोष्ट आहे. या राज्यात काय चाललयं. कशा करता हे करत आहेत ? जगातलं सर्वात उंच स्मारक युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजाचे व्हायला हवे. ते कमी करण्याचा प्रयत्न झाला तर काळ तुम्हाला माफ करणार नाही. जनता तुम्हाला माफ करणार नाही." 

त्यावर निवेदन करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले, " विषय गंभीर असल्याने आमची कधीही चर्चेसाठी तयारी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जगातला सर्वात उंच पुतळा होणार तो आम्हीच करणार आहोत. तोही शिवस्मारक 210 मीटरचे होणार आहे. 
मागच्या सरकारच्या वतीने मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतो. की 2001 साली महाराजांच्या स्मारकाचा निर्णय झाला मात्र स्मारकाचे काम सुरू व्हायला 2018 उजाडला. " विरोकांनी याविषयावर राजकारण करू नये. हिम्मत असेल तर चर्चा करा. गेल्या पंधरा वर्षात तुम्ही काय केले याची चर्चा करू. आम्ही चर्चेला तयार आहोत." 

यावेळी सत्ताधारी आमदारांनी "जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा दिल्या. तर विरोधक आमदरांनी वेलमध्ये उतरत सरकारविरोधी घोषणा दिला. " तुमचं आमचं नातं काय, ""जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय'', अशा घोषणा विरोधकांच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी विरोधक वेलमध्ये उतरून गोंधळ घालत होते. अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज 10 मी. तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू होताच स्थगन प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी सभात्याग केला. 
 

संबंधित लेख