Shivsena's Powershow in BJP's Constituency at Karanja | Sarkarnama

कारंजा मतदारसंघ भाजपचा; शक्ती प्रदर्शन शिवसेनेचे

माणिक डेरे 
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पोहरादेवी येथे 25 कोटी रुपये खर्च करून नगारा वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. लाखो बंजारा बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले. सुरेख नियोजनाबाबत मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांची पाठ थोपटली. मात्र, या गर्दीने वेगळ्या राजकीय समीकरणालाही या मतदारसंघाच्या राजकीय सारीपाटावर अवतरविले आहे. 

मानोरा : बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीत आतापर्यंत मोठ्या राजकीय सभा झाल्या आहेत. येथील सभेने राजकीय इतिहास निर्माण केल्याचा इतिहास आहे. यावेळेही पालकमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीत केलेल्या शक्ती प्रदर्शनात कारंजा विधानसभा मतदारसंघच नव्हे तर, वाशीम -यवतमाळ लोकसभा मतदार संघातील राजकीय बदलाचे पडघम वाजले आहेत.

पोहरादेवी येथे 25 कोटी रुपये खर्च करून नगारा वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. लाखो बंजारा बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले. सुरेख नियोजनाबाबत मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांची पाठ थोपटली. मात्र, या गर्दीने वेगळ्या राजकीय समीकरणालाही या मतदारसंघाच्या राजकीय सारीपाटावर अवतरविले आहे. 

हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. आमदार राजेंद्र पाटणी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. बंजारा बहूल असलेल्या या मतदारसंघात युती झाली तर, शिवसेना दावा ठोकण्याच्या मनस्थितीत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव यांनी मनसेचा शेला खांद्यावर घेऊन निवडणूक लढविली होती. त्यांचे मताधिक्य पाहता, बंजारा समाजाचा उमेदवार या मतदारसंघाचे राजकीय चित्र बदलणार ठरणार आहे. 

शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. सुभाष राठोड, डॉ. महेश चव्हाण व रणजित जाधव यांची नावे समोर येत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश घेतला. उमेदवारीच्या बोलीवरच त्यांचा मातोश्रीवर शिवसेना प्रवेश झाला असल्याने संजय राठोड यांचा शब्द की, खासदार भावना गवळींचा उमेदवार या द्वंदात प्रकाश डहाकेंचे राजकीय भवितव्य काय? असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. गवळी व राठोड यांच्या पक्षांतर्गत साठमारीत काय राजकीय समिकरण समोर येईल याची चुणूक पोहरादेवीच्या कार्यक्रमातून दिसून आली आहे. 

नगारा भूमिपूजन समारोहात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांच्यावर पोहरादेवीतील कार्यक्रमाची जबाबदारी सोपविली होती. दिलीप जाधव हे सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्त झटताना दिसले. दिलीप जाधव यांच्या पत्नी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या सभापती आहेत. हा धार्मिक कार्यक्रम असला तरी, दिलीप जाधव यांचा पोहरादेवीतील वावर वेगळ्या राजकीय समिकरणाला जन्म देणारा ठरणार तर नाही ना? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

लोकसभा गणिताची फेरमांडणी?
संजय राठोड हे तीनवेळा दारव्हा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून गेले आहेत. वाशीम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते पाहता सध्यातरी या मतदारसंघातील बंजारा समाज संजय राठोड यांच्याकडे एकवटला आहे. काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांची उमेदवारी पक्की असल्याने, शिवसेनेकडून संजय राठोड यांना उमेदवारी देऊन, या मतदारसंघातील जातीय समतोल शिवसेनेच्या बाजूने वळविण्याची खेळी ऐनवेळी शिवसेना नेतृत्त्वाकडून खेळली गेली तर, भावना गवळी यांचाही पत्ता कट होण्याची शक्यता असल्याची चर्चा कार्यक्रम स्थळी होती. 

संबंधित लेख