शिवसेनेचा मुख्यमंत्री हे स्वप्नच ! 

शिवसेनेने आधी भाजपपेक्षा जास्त आमदार निवडून आणावेत. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आल्यापासून या पक्षाचे काही नेत्यांची अवस्था जितंम मया अशी झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना खूष करण्यासाठी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी शिवसेनेचे काही नेते करू लागले आहेत. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी राज्यात परिस्थिती अनुकूल आहे का ?
शिवसेनेचा मुख्यमंत्री हे स्वप्नच ! 

युवराज आदित्य ठाकरे तीस वर्षाचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने विधानसभेसाठी शक्तीप्रदर्शन करण्यास सुरवात केली आहे. राज्यातील सर्व आमदारांना मातोश्रीवर येण्याच्या सूचना ठाकरे घराण्याचे निष्ठावंत नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. शिंदे यांच्याप्रमाणे संजय राऊत यांनीही युवराजांवर स्तुतिसुमने उधळताना ते राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले आहे. 

शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री पाहणे हे या पक्षाच्या छोट्यामोठ्या नेत्यांचे स्वप्न. ते स्वप्न मात्र कधी पूर्ण होणार हे सांगता येणार नाही. कारण राज्यातील वातावरण आजतरी ना शिवसेनेच्या ना कॉंग्रेसवाल्यांच्या बाजूचे आहे हे मुळात स्वप्न पाहणाऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. देशात सर्वत्र कमळ फुलले आणि या फुलाचीच चलती आहे. हे सत्य काही झाले तरी नाकारून चालणार नाही. म्हणून काय स्वप्न पाहू नयेत की काय ? असे कोणीही म्हणून शकतो.

उच्चे लोगो की उच्चे स्वप्ने आहेत. ती पाहण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आदित्य मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल. राज्यातील दु:खदारिद्य्र नष्ट होईल. सर्वांना समान न्याय मिळेल असे कोणाला वाटत असेल तर तेही काही चुकीचे नाही. असो. 

येत्या चार महिन्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचे आखाडे आतापासून बांधण्याची स्पर्धा नैसर्गिक युतीवाल्यांमध्ये सुरू आहे. दारुण पराभवाने थकले भागलेले बिचारे दोन्ही कॉंग्रेसवाले यावर काहीही भाष्य करीत नाहीत. अनेक सरदारांनी कमळ हातात घेतल्याने लढायचे कोणाच्या जिवावर असा त्यांच्यापुढील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. भाजपच्या नेत्यांनी तर देवेंद्र फडणवीसांवर शिक्कामोर्तब केले. भाजपचाच मुख्यमंत्री हे ठणकावून सांगताना ते शिवसेनेला काय वाटेल याची अजिबात चिंता करीत नाही. याचा अर्थ असा की त्यांचा रोड मॅप तयार आहे. 

शिवसेना-भाजपची युती झाली तरी देवेंद्रच कसे मुख्यमंत्री होतील याची काळजी भाजपवाले घेतील. राहिला प्रश्‍न शिवसेनेचा. भाजपप्रमाणे शिवसेनाही आदित्य यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याच्या तयारीत आहेत. उद्या जरी युती झाली नाही झाली तरी पक्ष ताकदीने मैदानात उतरू शकतो. भाजपला रान मोकळे सोडायचे नाही याचा विचार बहुधा पक्षाने केलेला असावा. आदित्य जर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील तर पक्षाचे कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील आणि अधिक जागा जिंकता येतील असे आखाडे बांधले जात असावेत. 

भाजप आणि शिवसेनेचा विचार केला तर शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद मोठी असल्याचे दिसून येते. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या पक्षात आहेत. म्हणजे ज्या पॉकेटमध्ये दोन्ही कॉंग्रेस चांगली कामगिरी करते तेथेच भाजपने सुरुंग लावला आहे. भाजपचा रोड मॅप काय असेल हे आज सांगता येत नसला तरी उद्या समजा शिवसेनेने युती नाही केली तरी त्यांना काही फरक पडणार नाही. स्वबळावर ते 130 पर्यंत पोचण्याचे प्रयत्न करतील. 

शिवसेनेने आधी भाजपपेक्षा जास्त आमदार निवडून आणावेत. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आल्यापासून शिवसेनेतील काही नेत्यांची अवस्था जितंम मया अशी झाली आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होईल असे हे विद्वान गृहीत धरून चालले आहेत. परंतु मतदारांना गृहीत धरून चालत नाही हे मतदारांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. 

विधानसभेला वंचित आघाडीने कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि राज ठाकरे व राजू शेट्टींची त्यांना जोड मिळाली तर भाजप-शिवसेना युतीला पळता भुई थोडी होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यापूर्वी विधानसभेला बुद्धिबळाचा पट कसा मांडला जातो आणि कोण कोणाबरोबर जाते हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. 

आज महाराष्ट्रात भाजपचे पक्षसंघटन अन्य संघटनांच्या तुलनेत खूपच मजबूत आहे. भाजपचे बूथपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे विनू झालेले आहे. ज्या जिल्ह्यात भाजप कमजोर आहे अशा जिल्ह्यात व तालुक्‍यात भाजपने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सामर्थ्यवान नेत्यांना पक्ष प्रवेश दिला आहे. 

शिवसेनेचे बळ मुंबई, मराठवाडा आणि कोकणात आहे. पण विदर्भात शिवसेनेची ताकद फार कमी आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात म्हणावी तेवढी ताकद नाही. उत्तर महाराष्ट्रातही शिवसेनेला बरेच काम करावे लागणार आहे. मराठवाड्यात शिवसेनेला वंचित आघाडी आणि हर्षवर्धन जाधव प्रणीत मराठा संघटनेचे उमेदवार मोठा तडाखा देऊ शकतात. 

त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मुख्यमंत्री आमचाच ही भाषा करणे वेगळे आहे. शिवसेनेसमोर पहिले आव्हान भाजपपेक्षा जास्त जागा मिळविण्याचे असणार आहे. भाजपने शिवसेनेच्या मदतीने महाराष्ट्राच्या सर्वच महानगरात आपले पाय मजबूतपणे रोवले आहेत. मुंबई, पुणे नागपूर, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये आज भाजपचा जोर आहे. 

शिवसेनेचे संघटन चांगले असले तरी आज शिवसेनेला कै. बाळासाहेब ठाकरे यांची उणीव भासते आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आणि आपल्या भोवतीच्या वलयाने शिवसेनेकडे मतदारांना खेचून घेत असत. बाळासाहेबांची जेथे सभा होई तेथे शिवसेनेचे आमदार-खासदार हमखास निवडून येत असत हे 1990 आणि 1995 च्या निवडणुकीत महाराष्ट्राने पाहिलेले आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहण्याआधी कै. बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्य आत्मसात करणे आवश्‍यक आहे. 

जयललिता, करुणानिधी, ममता बॅनर्जी, मायावती, मुलायम सिंह, नीतिशकुमार, लालूप्रसाद यादव, नवीन पटनाईक, जगमोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या स्वत:च्या ताकदीवर राज्यात सत्ता मिळविली होती. ती ही स्वबळावर. तसे महाराष्ट्रात आजपर्यंत कधी घडले नाही. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे खरे नेते असूनही त्यांना स्वबळावर पक्षाला विजय मिळविता आला नाही. 

मुळात आपल्याकडील लोक नेत्याला देव मानत नाहीत हे एक कारण आहेच. शिवाय दोन्ही कॉंग्रेसची  काही भागात ताकद आहेच. त्यांचे ठरलेले मतदारसंघ असतात. त्यामुळे भाजपलाही बहुमत मिळविताना मोठी कसरत करावी लागेल. शेवटी शिवसेनेने काही जादू केल्यास युवराज मुख्यमंत्री होऊ शकतात अन्यथा नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com