शिवसेना भाजपचे हम साथ साथ है ? 

शिवसेना भाजपचे हम साथ साथ है ? 

मुंबई : आगामी निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी शिवसैनिकांना भाजपशी दोन हात करण्याचे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले असताना मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 29 च्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सेना - भाजपाचे " हम साथ साथ है !" सुरू असल्याचे दिसत आहे. 

या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा म्हणून शिष्टाई करण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर धाव घेतली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठिंब्याचे साकडे घालत तावडे यांनी "आघाडी" घेतली आहे. यावेळी भाजप आमदार भाई गिरकर उपस्थित होते. भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे चारकोपमधील वॉर्ड 29 मध्ये येत्या 13 डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. शैलजा गिरकर यांच्या जागी त्यांची सून प्रतिभा गिरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. गिरकर परिवाराचे आणि शिवसेनेचे जुने संबंध लक्षात घेता या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार उभा करणार नसल्याचे कळते. 

दरम्यान, देशाच्या व राज्याच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने अनेक मुद्द्यावर पंतप्रधान व भाजपवर वेळोवेळी " बाण" सोडले आहेत. सामनामधून तर भाजपवर टीकास्त्र सोडत भाजपला "घायाळ" करण्याची एकही संधी शिवसेनेने सोडेलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या भाजपला दिलेल्या पाठिंब्याने राजकिय वर्तुळात मात्र तर्क वितर्कांना उधाण आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com