Shivsena unit pimpari in trouble | Sarkarnama

पिंपरी शिवसेनेत कलाटे विरूद्ध कुटे वाद विकोपाला 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 27 ऑगस्ट 2017

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेच्या पराभवानंतर पक्षातील वाद वाढले आहेत. नगरसेवकांची संख्या कमी असली तरी त्यांच्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातून शहरप्रमुख कलाटे यांना हटविण्याची मागणी पुढे आली आहे. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेतील वाद आता जाहीरपणे उफाळून आला आहे. शहरप्रमुख राहूल कलाटे यांचा कारभार हुकूमशाहीचा असल्याचा आरोप करत नगरसेवक प्रमोद कुटे यांनी बंड पुकारले आहे.

 
त्याला भाजपची फूस असल्याची चर्चा शहरात आहे. दरम्यान, आता प्रा.सचिन काळभोर या जुन्या शिवसैनिकाने,तर कलाटे यांच्या राजीनाम्याचीच मागणी केलीआहे. पालिका निवडणुकीतील अपयशाबद्दल कलाटे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता, अशी मागणी त्यांनी केली. 

कलाटे यांच्यामुळे शहरात शिवसेना वाघांची नव्हे, तर शेळ्यांची झाल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे. शिवसेनेतील ही जाहीर चिखलफेक सध्या शहरभर चर्चेचा विषय झाली आहे. त्यामुळे त्याची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली असून येत्या काही दिवसांत त्याबाबत कारवाई होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यातून कलाटे की कुटे यापैकी कुणावर कारवाई होणार याकडे शिवसैनिकांच्या जोडीने शहरातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, कलाटे यांना शहरप्रमुख पदावरून दूर करण्याचे संकेत "मातोश्री'या ठाकरे यांच्या निवासस्थानावरून मिळाले आहेत. 

स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून शिवसेनेतील या बंडाची बीजे रोवली गेली. गेल्या टर्ममध्ये कट्टर शिवसैनिक असलेल्या कुटे यांच्या मातोश्रींना स्थायी समितीसाठी डावलण्यात आले होते. यामुळे यावेळी आपल्याला संधी मिळावी,अशी त्यांची इच्छा होती. मात्र, कुटेंना पुन्हा डावलण्यात आल्याने ते नाराज झाले. ही संधी हेरून प्रथमच पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने शिवसेना फोडण्यासाठी सुरुंग लावला.

कुटे यांना भाजपने स्मार्ट सिटीच्या कंपनीवर संचालक म्हणून घेतले. त्यासाठी त्यांनी कलाटे यांनी स्वतःची त्यासाठी केलेली शिफारस डावलली. त्यातून भाजप व शिवसेनेत आरोप,प्रत्यारोप झाले. एवढेच नाही,तर नियुक्तीचा हा वाद न्यायालयात गेला. या संचालकपदाचा कुटे यांनी राजीनामा द्यावा, असे कलाटे यांनी मागणी केली. ती धुडकावण्यात आली. 
त्यामुळे कुटे हे बालिश असल्याची टिका कलाटे यांचे समर्थक नगरसेवक अमित गावडे यांनी केली.

त्यामुळे संतप्त झालेल्या प्रा. काळभोर यांनी गावडे हे कलाटे यांचे चमचे असल्याचे पत्रकच काढले. ते म्हणाले, ""कलाटे यांना पक्षच चालविता येत नाही. शहरप्रमुख, गटनेते यानंतर "एसपीव्ही'चे संचालक पदही त्यांना हवे होते. त्यातून त्यांना सर्वांना एकत्र घेऊन काम करायचे नसून सर्व पदे स्वताकडेच ठेवायची आहेत, असे दिसते''

संबंधित लेख