shivsena strategy for chindam vote | Sarkarnama

'तडीपार छिंदम'च्या मतांवर शिवसेना डल्ला मारणार?

मुरलीधर कराळे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

त्याची मते शिवसेना, भाजप की आघाडीचे उमेदवार घेणार, यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.

नगर: महापालिका निवडणुकीत उपद्रव करू शकतील, अशा सुमारे चारशे लोकांना तडीपार करण्यात आले. अंतीम सुनावणीत निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी केलेल्या श्रीपाद छिंदमचाही समावेश आहे. त्यामुळे त्याची मते शिवसेना, भाजप की आघाडीचे उमेदवार घेणार, यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरून वादग्रस्त ठरलेल्या छिंदमने प्रभाग क्रमांक नऊमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्याच्या विरोधात शिवसेनेचे सुरेश तिवारी, आघाडीकडून राष्ट्रवादीच्या अनिता राठोड, तर भाजपकडून प्रदीप परदेशी यांनी उमेदवारी केली आहे. 

या प्रभागातील पदमशाली समाजाचे मते छिंदमला मळू शकतील, असा अंदाज राजकीय मंडळी बांधत आहेत. परंतु शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी यापूर्वीच जाहीर एका भाषणातून बोलताना या समाजाचा व छिंदमच्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. या समाजाच्या पाठिशी शिवसेना प्रथमपासून उभी आहे, असे सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेला हा समाज जवळचा वाटतो. शिवाय छिंदम याच्या वक्तव्यामुळे त्याच्यावर नाराज असलेल्या गटाचा फायदा शिवसेना उचलू शकेल, असे राजकीय धुरिणांना वाटते. राष्ट्रवादीच्या अनिता राठोड व प्रदीप परदेशी यांचाही प्रभागात असलेला जुना संपर्क चांगला आहे. त्यामुळे छिंदमचे मते कोण घेणार, यावरच या मतदारसंघातील विजयाचे गणित अवलंबून असेल, असे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, छिंदम जिल्ह्याबाहेर राहूनही प्रचार कसा करणार, याबाबत विरोधक उमेदवार करडी नजर ठेवणार असल्याचे समजते. 
 

संबंधित लेख