Shivsena Shivsampark Abhiyan for Maval | Sarkarnama

मावळातील तटबंदीसाठी आता शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान

उत्तम कुटे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक... असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार घरोघरी जाऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ या उपक्रमासाठी देण्याचे आवाहन शिवसेनेने केले आहे.

पिंपरी : 'संपर्क से समर्थन' या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संकल्पनेनंतर शिवसेनेनेही तशाच स्वरुपाची मोहीम आता सुरु केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेचे नाव शिवसंपर्क अभियान असे आहे. मावळचा गड 2019 ला शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेच्या मावळ्यांनी मावळ गडाची ही तटबंदी सुरु केली आहे.

गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक... असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार घरोघरी जाऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ या उपक्रमासाठी देण्याचे आवाहन शिवसेनेने केले आहे. हे अभियान संपूर्ण मावळ लोकसभा  मतदारसंघात राबवले जाणार असून यावेळी शाखांना भेटी देण्यात येणार आहेत, असे शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी सरकारनामाला सांगितले. त्यात सामील होऊन पक्षवाढीसाठी सर्वांनी एकसंधपणे काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
2019 ला स्वबळावर केंद्रात सत्तेत येण्यासाठी शहा यांनी देशभर संपर्क से समर्थन हे अभियान सुरु केले आहे. त्यात ते समाजातील प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी घेत आहेत. मुंबई दौऱ्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर व पुणे भेटीत शिवशाहीर बाबा पुरंदरे आदींना ते भेटले आहेत. या धर्तीवर शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनीही असेच अभियान सुरु केले आहे. मावळमध्ये सध्या श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे खासदार आहेत. चिंचवडे हे त्यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या संकल्पनेतूनच हे अभियान सुरु करण्यात आले आहे. त्याची सुरुवात मावळ तालुक्यामधील कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन घेऊन नुकतेच करण्यात आली. 

नंतर नाणे मावळचा पश्चिम भाग कुसगाव-वरसोली व लोणावळा विभागातील शिवसेना आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांसमवेत संवाद साधण्यात आला. मावळ तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक , आजी-माजी पदाधिकारी , तालुका प्रमुख,विधानसभा प्रमुख, संघटक, समन्वयक,नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत समिती सदस्य, उपाशहर प्रमुख, महिला आघाडी उपशहर संघटक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना शहर अधिकारी, भा.वि. सेना शहर संघटक व शिवसैनिक, युवा सैनिक , महिला आघाडी पदाधिकारी  यांच्या सूचना, संकल्पना समजून घेऊन विविध क्षेत्रातील समाजसेवकांच्या भेटी गाठी घेण्यात आल्या. 

यासंदर्भात चिंचवडे म्हणाले, "राजकारणापेक्षा समाजहिताचा विचार या अभियानात करण्यात आला आहे. ८०% समाजकारण या हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेला अनुसरून समाजामध्ये विविध क्षेत्रात लोकाभिमुख कार्य करणारे मान्यवर यांच्या भेटीगाठी त्यात घेण्यात येणार आहेत. तसेच गावागावात जाऊन त्या परिसरातील समस्या ,प्रलंबित शासकीय कामे जाणून घेतली जाणार आहेत. प्रसंगी त्यासाठी आंदोलनही केली जातील. त्याजोडीने हिंदू हृदयसम्राटांचे विचार मनामनात, शिवसेना गावागावात, शिवसैनिक घराघरात”या संकल्पनेतून घरोघरी जाऊन जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कामही केले जाणार आहे. अभियानाची सांगता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहे.''

संबंधित लेख