Shivsena on roads for better roads | Sarkarnama

रस्त्यासाठी शिवसेना उतरली रस्त्यावर 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

महानगरातील तुकाराम चौक ते मलकापूर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. गत काही महिन्यांपासून सुरू असलेले हे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांची मोठी अडचण होत आहे.

अकोला: महानगरातील रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या मुद्यावर शिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक होत शिवसेना स्टाईलने आंदोलन केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. 

महानगरातील तुकाराम चौक ते मलकापूर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. गत काही महिन्यांपासून सुरू असलेले हे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांची मोठी अडचण होत आहे. रस्त्याचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याने कामात सुधारणा करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, बांधकाम विभागाकडून त्यावर आवश्‍यक कारवाई होत नसल्याने मंगेश काळे यांच्यासह शिवसेना महानगराध्यक्ष अतुल पवनीकर, माजी तालुकाप्रमुख मुकेश मुरूमकार यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी बुधवारी रास्ता रोको केला. 

शिवसैनिकांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकारी पटोकार यांना पाचारण करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या कामाबद्दल मंगेश काळे यांनी पटोकार यांना धारेवर धरले. शिवसैनिकांचा रौद्रावतार पाहून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली.  
 

संबंधित लेख