Shivsena Ramdas Kadam Nashik Politics | Sarkarnama

घंटागाडीचा ठेकाच रद्द करा! : रामदास कदम महापालिकेवर संतापले

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 जुलै 2017

विकास निधीच्या 25 टक्के रक्कम प्रदूषण नियंत्रणावर खर्ची करा. महापालिकेने दोन वर्षांतील शंभर कोटींचा हिशेब मला द्यावा. आधी स्वतःचे पैसे खर्च करा, मग सरकारकडे हात पसरा. गोदावरी स्वच्छता मोहीम राबविली तर स्वयंसेवी संघटनांची मदत घेण्याचीही गरज भासणार नाही- रामदास कदम

नाशिक : ''गोदावरीच्या प्रदूषणावर सगळीकडे ओरड असतांना थेट कचरा वाहणाऱ्या घंटागाड्या नदीत धुतल्या जातातच कशा? त्यावर कोणाचे लक्ष नाही का? त्यांच्यावर कारवाई नको तर त्यांचा ठेका रद्द करा. अन्यथा मी रस्त्यावर उतरेन अन्‌ त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करीन,'' अशा शब्दात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महापालिका व जिल्हा प्रशासनाला दम भरला आहे. त्यामुळे उपस्थित लोकप्रतिनिधीही आचंबीत झाले आहेत.

नाशिक शहरात गोदावरी प्रदूषणाविषयी पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, विभागीय आयुक्त महेश झगडे यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंत्री कदम यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी बैठकीत, महापालिकेने गोदावरी प्रदूषण निर्मूलनासाठी न्यायालयासह 'निरी'च्या आदेशांच्या अंमलबजावणीत कुचराई अनेकदा पुढे आल्याने संप्तत झालेल्या कदम यांनी ''शहरात 420 पैकी 285 एमएलडी सांडपाणी निर्माण होते. सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी महापालिकेला अमृत योजनेतून 65 कोटींची मागणी आहे. असे पैसे मागम्याएैवजी विकास निधीच्या 25 टक्के रक्कम प्रदूषण नियंत्रणावर खर्ची करा. महापालिकेने दोन वर्षांतील शंभर कोटींचा हिशेब मला द्यावा. आधी स्वतःचे पैसे खर्च करा, मग सरकारकडे हात पसरा. गोदावरी स्वच्छता मोहीम राबविली तर स्वयंसेवी संघटनांची मदत घेण्याचीही गरज भासणार नाही,'' अशा कानपिचक्‍या दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनीही यामध्ये योग्य कार्यवाही व देखरेख ठेवली पहिजे. त्यात कसुर होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

कदम यांचा दौरा नेहेमीच विविध कारणांनी गाजतो. महापालिकेत भाजपची सत्ता तर शिवसेना विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने लोकप्रतिनिधीही आचंबीत झाले. स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते मात्र खुष झाले. त्यांनी अनेक वर्षे केलेल्या पाठपुराव्याला कदम यांच्या झाडाझडतीने बळ मिळाले.

संबंधित लेख