shivsena pimpari | Sarkarnama

संभाव्य शहरप्रमुखपदावरून पिंपरी शिवसेनेत अस्वस्थता

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

दरम्यान, पालिका निवडणुकीनंतर गटनेतेपदी नियुक्ती झाल्याने शहरप्रमुखपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, अशी मागणी आपण स्वताहून पक्षप्रमुखांकडे केली असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख राहूल कलाटे यांनी सांगितले. तसेच त्याजागी सर्वांना सामावून घेईल व बरोबर घेऊन जाईल अशा व्यक्तीला बसवावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

पिंपरी : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत बंडखोरी केलेले योगेश बाबर यांची शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी नियुक्ती निश्‍चीत झाल्याचे वृत्त झळकताच शहर शिवसेनेत खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकनिष्ठ शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. जर, ही नियुक्ती केली तर त्याविरोधात राजीनामाअस्त्र उपसण्याच्या बेतातही काही जुने एकनिष्ठ पदाधिकारी आहेत. 

दरम्यान,या नाराजीची लगेच "मातोश्री'ने दखल घेतली असून काही एकनिष्ठ शिवसैनिकांशी पुन्हा चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे या नियुक्तीत फेरबदल होण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, बंडखोरीचे शस्त्र उगारणाऱ्यांना पद हा शहर शिवसेनेचा इतिहास आहे. यापूर्वी अशा पाचजणांना पदे (त्यात शहरप्रमुखपदही) देण्यात आलेली आहेत त्यामुळे त्यात बदल होईल याविषयी राजकीय जाणकार साशंक आहेत. 

शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे दोन्ही खासदार व एक आमदार यांची वांद्रे (पश्‍चिम), मुंबई येथील आपल्या निवासस्थानी नुकतीच बैठक घेतली. त्यात बाबर यांचे नाव शहरप्रमुख म्हणून निश्‍चीत झाल्याचे वृत्त आले. त्यानंतर शहर शिवसेनेत अस्वस्थता पसरली. कारण बाबर यांना शिवसेनेने तिकिट न दिल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढविली. मात्र, ते पराभूत झाले.त्यानंतर ते सहा महिने पक्षापासून दूरच राहिले होते. तसेच गणेशोत्सवात त्यांच्या मंडळाने मोदीवरील देखावा उभारल्याने तो चर्चेचा विषय झाला.त्यामुळे आपले चुलते आणि शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांच्यानंतर योगेशही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा  रंगली होती. 

दरम्यान, पालिका निवडणुकीनंतर गटनेतेपदी नियुक्ती झाल्याने शहरप्रमुखपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, अशी मागणी आपण स्वताहून पक्षप्रमुखांकडे केली असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख राहूल कलाटे यांनी सांगितले. तसेच त्याजागी सर्वांना सामावून घेईल व बरोबर घेऊन जाईल अशा व्यक्तीला बसवावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. 
 

संबंधित लेख