Shivsena MP Shrikant Shinde arrested | Sarkarnama

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक

सरकारनामा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

*

ठाणे : मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्यावर शाई आणि झाडांची राख फेकल्याप्रकरणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह 47 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.

याप्रकरणात पोलिसांनी गोंधळ घालणे, धमकावणे अशी विविध 10 कलमे लावून अटक केली. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांत जामीनावर त्यांची सुटकाही करण्यात आली.

अंबरनाथ येथील मांगरूळमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून 1 लाख वृक्षांची लागवड केली होती. सुमारे आठवड्याभरापूर्वी या ठिकाणी काही समाजकंटाकांनी या वृक्षांना आगी लावून ती जाळली होती. असे असताना वन विभागाकडून या समाजकंटाकांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

 राजेंद्र कदम हे त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी देखील गेले नव्हते. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी श्रीकांत शिंदे हे त्यांच्या सुमारे 50 ते 60 शिवसैनिकांसह कोपरी येथील राजेंद्र कदम यांच्या कार्यालयात गेले. याच दरम्यान, काही महिला शिवसैनिकांनी थेट राजेंद्र कदम यांच्या अंगावर काळी शाई आणि जळलेल्या झाडांची राख फेकून दिली. तसेच कार्यालयात गोंधळही घातला.

यानंतर पोलिसांनी सुमारे अर्धा ते पाऊण तासानंतर शिवसैनिकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी याप्रकरणात 47 शिवसैनिकांना अटक केली. यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही समावेश होता. धमकावणे, गोंधळ घालणे, अशी 10 कलमे या सर्व शिवसैनिकांवर लावण्यात आली. मात्र, ही सर्व कलमे जामीनपात्र असल्याने अटकेतील सर्वांना सोडून देण्यात आले.

 दरम्यान , शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वनसंरक्षकांवर राख फेकली. तसेच, त्यांच्या कार्यालयात धिंगाणा घातला. त्यामुळे या दोघांसह आंदोलनात सहभागी झालेल्यांवर भादंवि 353 अन्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली होती .  

संबंधित लेख