Shivsena MLAs waiting for Udhdhav Thakarey"s arrival | Sarkarnama

"साहेब" परदेश वारीवरून  परतण्याची वाट पाहताहेत शिवसेनेचे आमदार 

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 22 एप्रिल 2017

पक्षवाढीसाठी लोकांमधून निवडून आलेल्या चेहऱ्यांना संधी द्या अशी मागणी पक्षाकडे वारंवार होत आहे. शिवसेनेत इच्छूकांना संधी द्याया\ची तर विद्यमान मंत्र्यांपैकी काहींना नारळ द्यावा लागणार आहे . कोणाला नारळ मिळणार याच्याविषयीदेखील कार्यकर्त्यात  चर्चा सुरु आहे

मुंबई, ता.22 :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या "परदेश दौऱ्यावर असून ते मुंबईत कधी परततात याकडे मंत्री पदासाठी इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांचे लक्ष लागले आहे .  

राज्यात सध्या मंत्रीमंडळ विस्ताराचे वारे जोरात फिरत आहे. यासंबधी भाजपच्या कोअर कमिटीचा अहवाल घेवून मुख्यमंत्री दिल्लीला पोहचणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. यामुळे सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना पक्षातील इच्छूक  आमदारांनाही मंत्रीमंडळ बदलाचे वेध लागले आहेत.

सेना मंत्र्यांच्या कामगिरीवर आमदार नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या खांदे पालटाची शक्यता लक्षात घेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुर्वी आमदार व मंत्र्यांची संयुक्त बैठक बोलवली होती. त्यानंतर सेना आमदारांनी मंत्रीमंडळात लोकांमधून निवडून गेलेल्या ( विधानसभेच्या ) आमदारांना मंत्री करण्याचा हट्ट पक्षप्रमुखाकडे धरला होता. तर ग्रामीण भागातील आमदारांनाही मंत्रीपदाची संधी देण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे केली होती. या आमदारांच्या मागणीला शहरातील आमदारही सहमत असल्याचे पक्षप्रमुखांना निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

 त्यामुळे आमदारांच्या मागणीला आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात हे पहावे लागणार आहे. सध्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये विधान परिषदेवर निवडून गेलेल्या मंत्र्यांची संख्या अधिक आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री दीपक सावंत हे विधान परिषदेवर निवडून येत मंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर विधानसभेतून एकनाथ शिंदे  जालन्याचे अर्जुन खोतकर , जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील आणि पुणे जिल्ह्याचे  विजय शिवतारे आदींची मंत्री पदावर वर्णी लागलेली आहे .  

त्यांमुळे पक्षवाढीसाठी लोकांमधून निवडून आलेल्या चेहऱ्यांना संधी द्या अशी मागणी पक्षाकडे वारंवार होत आहे. शिवसेनेत इच्छूकांना संधी द्याया\ची तर विद्यमान मंत्र्यांपैकी काहींना नारळ द्यावा लागणार आहे . कोणाला नारळ मिळणार याच्याविषयीदेखील कार्यकर्त्यात  चर्चा सुरु आहे .  सध्या मंत्री मंडळ विस्ताराच्या वावड्या उठल्याने सेना आमदारांचे डोळे उध्दव ठाकरे यांच्या परतीकडे लागले आहेत.
 

संबंधित लेख