shivsena mla | Sarkarnama

साहेबांचा "आदेश'च नसल्याने शिवसेना आमदार संभ्रमात

ब्रह्मा चट्टे
रविवार, 4 जून 2017

काही शिवसैनिकांनी साहेबांच्या आदेशाची वाट न पहाता शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला असला तरी संपूर्ण पक्ष म्हणून शिवसेना कधी सहभाग घेणार ? असा प्रश्न आमदार वरिष्ठांना विचारत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई : राज्यात शेतकरी संपाचा वणवा पेटला असतानाच शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र चांगलेच पेचात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच अग्रेसर म्हणून मिरविणाऱ्या शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट आदेश नसल्याने काय भूमिका घ्यावी कळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. "साहेबांचा' आदेश नसल्याने शिवसेनेचे आमदार संभ्रमात असून कार्यकर्त्यांना काय सांगायचे कळतच नसल्याची "खंत' शिवसेनेचे आमदार व्यक्त करत असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. 

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा यासारख्या मागण्या करत राज्यातला शेतकरी 1 जूनपासून संपावर आहे. शेतकऱ्यांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना नेहमीच आक्रमक झालेली गेल्या दोन वर्षात सातत्याने दिसली आहे.

मात्र, आता शेतकरी संपाचे अग्निकुंड धगधगत असताना पक्षप्रमुखांकडून पाठिंब्याच्या घोषणेशिवाय काहीच झाले नसल्याचे समजते. याबाबत शिवसेना आमदार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना संपर्क करत असून त्यांच्याकडूनही कोणत्याच आदेश येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचेही समजते. शिवसेनेला नेहमीच चिमटे काढणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ही शेतकरी संपातील शिवसेनेच्या भूमिकेबाबत चांगलेच कोपरखळ्या मारल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्तेही चिडले असून संपाबाबत साहेबांच्या आदेशाची वाट पहात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

काही शिवसैनिकांनी साहेबांच्या आदेशाची वाट न पहाता शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला असला तरी संपूर्ण पक्ष म्हणून शिवसेना कधी सहभाग घेणार ? असा प्रश्न आमदार वरिष्ठांना विचारत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांची भूमिका कळू शकत नाही. सामनामधून सरकारला संपावरून धारेवर धरण्यात येत आहे. सामनामधून कितीही लिहिले तरी साहेब सांगत नाहीत तोपर्यंत काहीच करता येत नसल्याचे आमदार सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

संबंधित लेख