Shivsena Minister Samruddhi Mahamarg | Sarkarnama

शिवसेनेचा विरोध असणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी सेना मंत्र्याचे एक पाऊल पुढे !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 जुलै 2017

समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. मग शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट का असू नये?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'या मुखपत्रातून 'शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाची समृद्धी करा' असा खोचक सल्लाही दिला होता. असे असताना पहिल्या काही खरेदी खतांवर साक्षीदार म्हणून एकनाथ शिंदे यांनी सहीही केली आहे.

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध असताना काही शेतकऱ्यांच्या जमिनींच्या थेट खरेदीला गुरुवारी नागपूरजवळच्या हिंगणा येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बाजू घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. समृद्धी महामार्गासाठी जमिन अधिग्रहणावरून शिवसेनाचा विरोध असताना महामार्गासाठी सेना मंत्र्यानेच एक पाऊल पुढे टाकल्याने नव्या चर्चेला तोंड फुटणार आहे.

समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. मग शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट का असू नये?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'या मुखपत्रातून 'शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाची समृद्धी करा' असा खोचक सल्लाही दिला होता. असे असताना पहिल्या काही खरेदी खतांवर साक्षीदार म्हणून एकनाथ शिंदे यांनी सहीही केली आहे. यावेळी 120 शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यासाठी इरादापत्रेही दिली.

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीच हा प्रकल्प असून एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेना नेहमीच विकासाच्या बाजूने उभी राहाते. किंबहुना, मुंबई-पुणे दृतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच स्वप्नातून साकारला होता. मात्र, प्रकल्प साकारत असताना एकाही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. प्रत्येक शेतकऱ्याशी चर्चा करून, अखेरच्या शेतकऱ्याचे समाधान करूनच हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची राज्य शासनाचीही भूमिका असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित लेख