शिवसेना मंत्र्यांना दुष्काळी भागात जाण्याचा उद्धव ठाकरेंचा आदेश
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र कार्यक्रम आटोपून "मातोश्री'वर परतलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्याची तातडीची बैठक बोलावली. अवघ्या अर्धा तासाच्या या बैठकीत ठाकरे यांनी मंत्र्याना दुष्काळग्रस्त भागात जावून जनतेच्या समस्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले.

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढीस लागली आहे. अनेक गावांत पाणी व चाऱ्याचा प्रश्न गहण होत असल्याने नागरीकांनी शहराकडे स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे, सरकार म्हणून दुष्काळग्रस्त नागरीकांना दिलासा देणे व दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी कशी होत आहे यासाठीची पाहणी करण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे सर्व कॅबिनेट व राज्यमंत्र्यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी असलेल्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थीतीचा आढावा घ्यावा. ज्या जिल्ह्यात पालकमंत्री शिवसेनेचा नाही तिथे बाजूच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्याने जावे. सोबत जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांना घ्यावे. स्थानिक प्रशासनाच्या सोबत अमंलबजावणीचा आढावा बैठका घ्याव्यात. त्यासोबतच थेट जनतेत जावून या अंमलबजावणीबाबतची माहीती घ्यावी, असे आदेश दिले.
शिवसेना मंत्र्यांचे सर्व दौरे पुर्ण झाल्यानतंर त्याचा सविस्तर अहवाल ठाकरे यांना सादर करण्यात येणार असून, त्यानंतर शिवसेना दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आराखडा तयार करून प्रत्यक्ष मदतीचे काम हाती घेईल. असे या बैठकीत नियोजित करण्यात आल्याची माहीती आहे.