Shivsena & MIM are beneficiaries of Aurangabad riots | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

औरंगाबादची दंगल शिवसेना-एमआयएमच्या राजकीय स्वार्थासाठी- अब्दुल सत्तार 

जगदीश पानसरे : सरकारनामा 
बुधवार, 16 मे 2018

पाच दिवसांपुर्वी शहरात झालेली दंगल ही पुर्वनियोजित आणि शिवसेना-एमआयएमच्या राजकीय स्वार्थासाठी घडवण्यात  आली आहे . 

- कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार

औरंगाबाद :  पाच दिवसांपुर्वी शहरात झालेली दंगल ही पुर्वनियोजित आणि शिवसेना-एमआयएमच्या राजकीय स्वार्थासाठी घडवण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला. 

या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी शहराला वेठीस धरले. हा सगळा प्रकार मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला असून दंगल घडवणाऱ्यांवर कठारे कारवाई आणि दंगलग्रस्त, मयतांच्या कुटुंबाना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली असल्याचे सत्तार म्हणाले. 

औरंगाबादेत शुक्रवारी रात्री दंगल घडली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी नुकसान झालेल्या भागाला भेटी दिल्या. तेव्हा हा सगळा प्रकार मुद्दाम घडवून आणल्याचे प्रकर्षाने जाणवले. शहागंज भागात दोन्ही समाजाची  दुकाने  असतांना केवळ एकाच समाजाला लक्ष्य करण्यात आले. हीच परिस्थीती अन्य ठिकाणी होती. 

पोलीसांचा निष्काळजीपणा दंगल भडकण्याला कारणीभूत ठरला, वेळीच हस्तक्षेप केला असता तर प्रकरण एवढे चिघळले नसते. शिवसेना, एमआयएमच्या ज्या दोन नगरसेवकांना अटक करण्यात आली ते प्रत्यक्ष दंगलीत सहभागी होते, तसे पुरावे पोलीसांकडे असल्यानेच ही कारवाई करण्यात आली. पण यामागचे करते करविते दुसरेच आहे असा सूचक इशारा देखील अब्दुल सत्तार यांनी दिला. 

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्‍वासन 
शहरातील दंगलीचा घटनाक्रम, त्यामागचे राजकारण आणि वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी आज (ता. 16) मुंबईत त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. दंगल झाली, राजकारण झाले, दोन निष्पाप बळी गेले, कोट्यावधीच्या मालमत्ते राखरांगोळीही झाली. पण ज्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांच्या उर्दनिर्वाहाचे साधन हिरावले गेले त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. 

मयताचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांना तातडीने आर्थिक मदत करून दिलासा देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. दंगेखोर कुठल्याही पक्षाचे, जातीचे असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत दिले आहे. दंगलीत नुकसान झालेल्यांना तात्काळ मदत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शहराचे अतोनात नुकसान 

औरंगाबादेतील दंगलीने केवळ जीवत आणि मालमत्तेची हानी झाली नाही तर औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने देखील खूप मोठे नुकसान होणार असल्याची भिती सत्तार यांनी व्यक्त केली. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहराबरोबरच राज्याची पर्यटन राजधानी देखील आहे. दंगलीमुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे तसे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांमध्येही भिती पसरली आहे. त्याचा परिणाम निश्‍चितच पर्यटन व्यवसायावर होईल. 

डीएमआयसी, ऑरिक सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पात आधीच उद्योग यायला तयार नाहीत, काही आलेले उद्योग परत गेले. त्यात दंगलीची भर पडल्याने नवे उद्योग, प्रकल्प शहरात येण्यास धजावणार नाही परिणामी शहराचा विकास खुंटेल, असा इशारा देखील अब्दुल सत्तार यांनी दिला.

संबंधित लेख