shivsena local leader criticise bjp goverenment | Sarkarnama

शिवसेना म्हणतेय, 'सरकारला मराठ्यांची ताकद दाखवणार'! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

मराठा आरक्षण आंदोलनांर्तगत बंदच्या आज दुसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक झाले आहेत. आज सकाळी नगरमधून युवकांची महारॅली निघाली. नगरच्या प्रमुख मार्गावरून जावून दिल्ली गेट येथे रॅलीचा समारोप झाला. तेथे जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर आंदोलक रास्ता रोको करण्यासाठी रवाना झाले. 

नगर : "आंदोलनादरम्यान युवकांनी शांतता राखा. कुठलेही नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. भावनेच्या भरात आपला तोल जावू देऊ नका. सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. पण त्यांना दिसेल मराठ्यांची ताकद. कार्यकर्त्यांनी संयम राखा,'' असे आवाहन शिवसेनेचे स्थानिक नेते संभाजी कदम यांनी केले. 

आज सकाळी माळीवाडा बसस्थानकाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते पुष्पहार घालून आंदोलनाच सुरूवात करण्यात आली. हजारो युवक असलेली मोटारसायकल महारॅलीची सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली गेली. जाताना दुकानदारांना बंदचे आवाहन करण्यात आले. दिल्ली गेट येथे रॅलीचा समारोप सकाळी अकरा वाजता करण्यात आला. तेथे कार्यकर्त्यांची भाषणे होऊन शांततेचे आवाहन करण्यात आले. 

दिल्ली गेट येथे प्रचंड गर्दीतून पुण्याकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. त्या वेळी युवकांनी तातडीने कडी तयार करून रुग्णवाहिकेला रास्ता मोकळा करून दिला. असेच सहकार्य युवकांनी करावे, असे आवाहन या वेळी नेत्यांनी केले. 

श्रीगोंदे येथे निमगाव खलू येथे रास्ता रोको सुरू झाला. संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी येथे बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. राहुरी, कर्जत, पारनेर तालुक्‍यातील सर्वपक्षीय कडकडीत बंद करण्यात आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख