सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याला शिवसेनेने दिला नेतेपदाचा मुकूट 

सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याला शिवसेनेने दिला नेतेपदाचा मुकूट 

पुणे : तेहेतीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील पहिल्या जाहीर सभेसाठी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून खुर्च्या-सतरंज्यांची व्यवस्था पाहणारे चंद्रकांत खैरे अखेर आज शिवसेनेचे नेते झाले आहेत. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानून 1985 मध्ये शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा गुलमंडीवर स्थापन करण्यात निवडक 15-20 संस्थापकात चंद्रकांत खैरेही होते. सुभाष पाटील, प्रदीप जैस्वाल, राधाकृष्ण गायकवाड, संजय शिरसाठ, अशोक चोटलानी आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांची दडपशाही आणि न्यायालयीन खटल्यांचे अडथळे पार करीत शिवसेना औरंगाबादेत रुजविली आणि वाढवत नेली. 

मनोहर जोशी, सुधीर जोशी, छगन भुजबळ, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार या शिवसेनेच्या तत्कालीन नेत्यांनी मराठवाड्यात शिवसेना वाढविण्यासाठी मेहनत घेतली. तेव्हा त्यांच्या मागेपुढे कार्यकर्ते म्हणून गळ्यात भगवे उपरणे घालून हिंडणारे चंद्रकांत खैरे यांनी भविष्यात आपल्याला हा दिवस पाहायला मिळेल असा विचार केला असेल का? 

बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाचे धोरण स्वीकारीत 1987 ते 90 या काळात पाहता पाहता मराठवाड्यात शिवसेनेचा दबदबा निर्माण केला. शिवसेनेच्या बंदला रस्त्यावर चिटपाखरूही दिसायचे नाही, असा तो काळ होता. या काळात मराठवाड्यात प्रारंभीपासून जे शिवसेनेबरोबर राहिले त्यांच्या पदरी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कधी लवकर तर कधी उशीराने का होईना सभापती, महापौर, आमदार, खासदार अशा पदांचे भरभरून सत्तेचे माप टाकले. 

चंद्रकांत खैरे हे नशीबवान आहेत असे त्यांच्या समर्थकांना आणि विरोधकांनाही वाटते. खैरे हे देखील साधू संत, बाबा महाराज, व्रत वैकल्य आणि कर्मकांडात रमताना दिसतात. त्यांची श्रद्धा आणि देवभक्ती कधी चर्चेचा तर कधी चेष्टेचा विषय बनते. पण ते पराकोटीचे प्रयत्नवादी आणि धडपडे आहेत. प्रसंगी दिवसातील तेरा चौदा तास ते झोकून देऊन हातात घेतलेले काम आणि मोहीम फत्ते करतात . 

मराठवाड्यात खैरे यांच्या बरोबरीने किंवा वेळप्रसंगी अधिक कर्तृत्ववान आणि हुशार नेते होते. पण झटपट मोठे होण्याची घाई आणि स्वतःविषयीच्या अवाजवी कल्पना यामुळे काहींना अपेक्षित मजल मारता आली नाही. एकेकाळी शिवसेनेत प्रचंड दबदबा असलेले कै. मोरेश्‍वर सावे आणि सुभाष पाटील हे दोन नेते महत्त्वाच्या वेळी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने सेल्फ आउट झाले. उस्मानाबाद, परभणी येथेही काही नेते नावारूपाला येत होते. पण कधी पक्षांतर तर कधी बंडखोरीने अनेकजण राजकीय पटलावरून अस्तंगत झाले आहेत. 

आपल्या कार्यक्षेत्रात घराघरापर्यंत संपर्क राखण्याची जिद्द, उत्तम संघटन कौशल्य, मोठा जनसंपर्क आणि आपल्या मतदारांसाठी मंत्री खासदार असतानाही रस्त्यावर उतरून दोन हात करण्याची तयारी या गुणांमुळे खैरे नेता म्हणून पुढे आले. पक्षाचा निर्णय आपल्या मनासारखा झाला नाही, पक्षांतर्गत विरोधकांची सरशी झाली तरीही सबुरीचे धोरण ठेवून चालणारे खैरे "लंबी रेस का घोडा' ठरले. शिवसेना पक्षावर आणि ठाकरे घराण्यावर निष्ठा असलेल्या चंद्रकांत खैरेंची गेल्या 33 वर्षात कार्यकर्ता ते नेता अशी प्रगती झाली. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींवर नेहमी भर देणारे चंद्रकांत खैरे हळूहळू शिवसेनेत वरच्या पायऱ्या चढत गेले. 

राजकारण हा अतिशय संयमाने आणि सबुरीने खेळण्याचा विषय मानला जातो. एका सामान्य कुटुंबातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या खैरेंनी आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवलेले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी हुकली किंवा आपल्याहून कर्तृत्वाने - वयाने लहान असलेल्यांना पक्षाने मोठी पदे दिली तरी खैरेंनी आकांडतांडव किंवा बंडखोरी केली नाही. पक्षाच्या आणि पक्ष नेतृत्वाच्या विरोधात कधीही बंडाचा झेंडा न फडकावणाऱ्या खैरेंच्या गळ्यात त्यांच्या निष्ठेची पावती म्हणून नेतेपदाची माळ पडली आहे. 

खैरेंनी 1988 मध्ये नगरसेवक झाल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. महापालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून काम करीत असतानाच 1990 मध्ये विधानसभा निवडणुका लागल्या. उमेदवारीसाठी पक्षात शह-काटशहाचे पराकोटीचे राजकारण झाले पण अखेर मातोश्रीवरून चंद्रकांत खैरे हे नाव औरंगाबादसाठी निश्‍चित झाले.

1990 ला आमदार झाल्यावर खैरेंना खासदार मोरेश्‍वर सावेंच्या सावलीतच वावरावे लागे. अतिशय धुरंधर आणि मुरब्बी राजकारणी असलेल्या सावेंचे 1995 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्याने ठाकरेंशी मतभेद झाले. या वादात सावे शिवसेनेबाहेर पडले. सुभाष पाटील यांनाही बंडखोरी नडली. त्यामुळे 1995 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून आलेल्या खैरेंना युती सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. गृहनिर्माण, वन-पर्यावरण आणि परिवहन खात्याचा कार्यभार त्यांनी सांभाळला. 

1999 मध्ये पक्षांतर्गत राजकारणातून मंत्री असलेल्या खैरेंना लोकसभेला उभे करण्यात आले. समोर कॉंग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांना उमेदवारी दिली. आता "खैरेंचा दी एंड' होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण झाले उलटेच. एक लाखावर मतांची आघाडी घेत खैरे निवडून आले. त्यानंतरच्या 2004, 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकात विरोधकांनी जंगजंग पछाडले पण सलग चारवेळा खैरे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. 

गेल्या 33 वर्षात औरंगाबाद शहरात लग्न, बारसे, वाढदिवस, शोकप्रसंग, धार्मिक कार्यक्रम अशा विविध निमित्ताने खैरे घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत. जिह्यातही गावागावांपर्यंत त्यांचा प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. जिल्ह्यातील आणि शहरातील शिवसेनेच्या अन्य नेत्यांचा पूर्ण अभ्यास ते करून बसले आहेत. आपल्याला वरचढ होणाऱ्या स्थानिक नेत्यांना आवश्‍यक तेंव्हा ब्रेक लावण्याचे कौशल्यही त्यांनी विकसित केले आहे . 

प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, आमदार संदीपान भुमरे, अण्णासाहेब माने, नामदेव पवार असे अनेकांशी खैरेंचे मतभेद वेळोवेळी झाले आहेत पण खैरे तुटेपर्यंत ताणत नाहीत. पुन्हा एक पाऊल मागे जाऊन जमवूनही घेतात. शिवाय महत्वाच्या वेळी मदतही करतात. त्यामुळे मतभेदाचे रूपांतर शत्रुत्वात होत नाही . 

काही झाले तरी मातोश्रीवर आपले संबंध आणि महत्व कायम राहील याची खबरदारी त्यांनी नेहमीच घेतली. ठाकरे यांचा शब्द कधीही खाली न पडू देणाऱ्या आणि दिलेली जबाबदारी चोखपणे पार पडणाऱ्या चंद्रकांत खैरे यांचा पक्षातील प्रभाव हळूहळू वाढत गेला . 

परिस्थिती प्रतिकूल असताना सबुरीचे धोरण स्वीकारून शांत राहायचे आणि योग्य संधी आल्यानंतर बाजी पलटवायची हा खैरेंचा खाक्‍या आहे . 

शिवसेनेतील 33 वर्षांच्या वाटचालीत चंद्रकांत खैरे यांचा मुंबईहून येणाऱ्या शिवसेनेच्या संपर्कनेत्यांशी काहीवेळा संघर्षही झाला. दिवाकर रावते मराठवाड्याचे संपर्कनेते असताना त्यांचे आणि खैरेंचे तीव्र मतभेद झाले होते. तसेच पुढे रामदास कदम यांच्याशीही खैरेंचे मतभेद झाले. अन्य काही नेत्यांशीही त्यांचे जमले नाही. पण अखेर मातोश्रीवरील त्यांचे वजन विरोधकांना भारी पडले.

रामदास कदम यांच्यासारख्या कॅबिनेट मिनीस्टरला औरंगाबादचे पालकमंत्रीपद सोडून नांदेडला जावे लागले, यातच सर्वकाही आले. खैरेंच्या राजकीय प्रगतीत जिभेवर साखर ठेवून गोड बोलण्याची त्यांची कार्यपद्धती महत्त्वाची ठरलेली आहे. ही साखरपेरणी त्यांना आता वाढवावी लागेल. आता शिवसेनेचे नेतेपद मिळाल्यानंतर त्यांना भाजपचे आव्हान मोडून काढीत मराठवाड्यात शिवसेना वाढविण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com