shivsena on gst | Sarkarnama

जीएसटीसंदर्भातील विशेष अधिवेशनात सेनेची अग्निपरीक्षा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई : जीएसटीसंदर्भात शिवसेनेच्या शंका राहू नयेत म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन सोमवारी भेट घेतली असली तरी, मुंबई महापालिकेच्या कर उत्पन्नावरून शिवसेनेचे अजून समाधान झालेले नाही.

सुधीर मुनगंटीवारांकडून मंगळवारी पुन्हा उद्धव ठाकरे यांची समजूत काढली जाणार असली तरी, जीएसटीवरुन आडून बसणारी शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्‍नांवर विशेष अधिवेशनात आक्रमक राहणार का? असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. 

मुंबई : जीएसटीसंदर्भात शिवसेनेच्या शंका राहू नयेत म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन सोमवारी भेट घेतली असली तरी, मुंबई महापालिकेच्या कर उत्पन्नावरून शिवसेनेचे अजून समाधान झालेले नाही.

सुधीर मुनगंटीवारांकडून मंगळवारी पुन्हा उद्धव ठाकरे यांची समजूत काढली जाणार असली तरी, जीएसटीवरुन आडून बसणारी शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्‍नांवर विशेष अधिवेशनात आक्रमक राहणार का? असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. 

मुंबई महापालिकेतील आर्थिक तिजोरीशी संबंध असल्याने ठाकरे यांना चर्चा करायला वेळ आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वारंवार इशारे दिल्यानंतर, शिवसेनेची भूमिका ऐनवेळी बदललेली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे.

हा केवळ दिखावा आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यातून जीएसटीसंदर्भात मुंबईत होणाऱ्या विशेष अधिवेशनात विरोधी पक्षांकडून शिवसेनेची कोंडी केली जाण्याची शक्‍यता आहे. 

राज्य सरकारकडून जीएसटी विधेयक केंद्र सरकारला सादर करण्यासाठी तीन दिवसीय 20 मेपासून विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या करासाठी केंद्राकडे सारखा कटोरा मागत फिरणार का ? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

जीएसटीसंदर्भातील मसुदा तयार करताना सत्तेतील सहकारी शिवसेनेचे समाधान व्हावे यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सोमवारी मातोश्रीवर गेले. परंतु, त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून पूर्ण समाधान झाले नाही.

मुंबई महापालिकेचे जकातीचे उत्पन्न रद्द होणार असल्याने राज्य सरकारकडून करापोटी किती रक्कम देणार यावरून अडले आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मंगळवारी पुन्हा चर्चा करण्याचे आश्‍वासन केले आहे.

परंतु, जीएसटीचा तिढा सुटला तरी, शिवसेनेसमोर कर्जमाफीचा मुद्दा असून, शिवसेनेनेच यासाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे , अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तडजोड नाही अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नरमाईची भूमिका घेतल्याने शिवसेनेचे ग्रामीण भागातील आमदार अस्वस्थ झाले होते.

त्यावेळी कर्जमाफीवर आम्ही ठाम आहोत, अशी आजही शिवसेनेची भूमिका असल्याचे सांगण्यात येत असले तरी, दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनाची सेनेची मागणी भाजप सरकारकडून गुंडाळली गेली तर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

राज्यात सत्तेत असूनही आम्हाला भाजपकडून सत्ताधारी आमदार म्हणून वागणूक मिळत नाही. आमच्या पक्षाने भाजपसोबत युती तोडण्याचा निर्णय घेतला तोही मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी. आता जीएसटीबाबत मुंबई महापालिकेचे नुकसान होऊ नये यासाठी पक्ष नेतृत्वाकडून काळजी घेतली जात आहे.

जीएसटीसंदर्भातील विशेष अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी आम्हाला बाजू मांडावी लागेल. नाहीतर मतदारसंघात तोंड कसे दाखवणार असे सेनेच्या ग्रामीण भागातील एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 

संबंधित लेख