shivsena congress yuti | Sarkarnama

"अर्जूना'च्या धनुष्याने दानवेंचा वेध घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 सप्टेंबर 2017

सत्तार यांच्या विरोधात आंदोलन करायला लावून वातावरण तापवण्यात दानवे यांचाच हात होता असा आरोप देखील कॉंग्रेसने केला होता. दोन दिवस सत्तार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. तेव्हा दानवे यांनीच दबाव आणून सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप कॉंग्रेस कार्यकर्ते करत होते. तेव्हापासून दानवे-सत्तार यांचे बिनसले असे सध्या तरी दोन्ही नेते दाखवत आहेत. 

औरंगाबाद : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी जालना आणि औरंगाबाद या दोन जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेने कॉंग्रेसचा "हात' धरत सत्ता मिळवली. राज्य व केंद्राच्या सत्तेत असूनही योग्य सन्मान राखला जात नसल्याची सल शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहेच. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका सेना-भाजप स्वतंत्रपणे लढतील हे जवळपास निश्‍चित समजले जाते. 

अशा वेळी कॉंग्रेसच्या मदतीने भाजपला घायाळ करण्याची रणनिती शिवसेनेने आखली आहे. कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव उघडपणे कॉंग्रेस नेत्यांना आपल्या मतदारसंघातील विकासकामांच्या उद्घाटनासाठी बोलवत असतांना आता शिवसेनेचे जालना येथील आमदार व राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी देखील कॉंग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उचांवल्या आहेत. 

सिल्लाडे नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेचा शुभारंभ शनिवारी सिल्लोडमध्ये झाला. कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमासाठी अर्जुन खोतकर यांना निमंत्रित केले आणि त्यांनी देखील ते स्वीकारत हजेरी लावली. अब्दुल सत्तार हे धुर्त राजकारणी म्हणून प्रसिध्द आहेत. म्हणूनच 2014 मध्ये देशभरात मोदी लाट असतांना देखील त्यांनी आपला मतदारसंघ राखत ताकद दाखवून दिली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सत्तार यांच्यात पडद्यामागे होणाऱ्या राजकीय घडामोडी लपून राहिलेल्या नाहीत. पण अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे प्रकरण सिल्लोडमध्ये घडले आणि त्याचा पुरेपूर राजकीय फायदा रावसाहेब दानवे यांनी उचलला. 

सत्तार यांच्या विरोधात आंदोलन करायला लावून वातावरण तापवण्यात दानवे यांचाच हात होता असा आरोप देखील कॉंग्रेसने केला होता. दोन दिवस सत्तार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. तेव्हा दानवे यांनीच दबाव आणून सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप कॉंग्रेस कार्यकर्ते करत होते. तेव्हापासून दानवे-सत्तार यांचे बिनसले असे सध्या तरी दोन्ही नेते दाखवत आहेत. 

आम्ही पाच पांडव.... 
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या सिल्लोडमधील एन्ट्रींने "कुछ तो गडबड है..' या शंकेला वाव मिळतो. घरकुल योजनेच्या निमित्ताने अब्दुुल सत्तार, अर्जून खोतकर, हर्षवर्धन जाधव, प्रभाकर पालोदकर आणि माजी आमदार कल्याण काळे एकाच व्यासपीठावर आले होते. सत्तार यांनी आपल्या भाषणात या पाच नेत्यांचा उल्लेख पाच पांडव असा केला. आगामी जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जून खोतकर यांनी मैदानात उतरावे त्यांच्या मागे आम्ही संपूर्ण ताकद उभी करू अशी ग्वाही सत्तार यांनी दिली. 

वेगळ्या राजकीय समीकरणाची नांदी म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे अर्जुनाच्या धनुष्याने दानवेंचा वेध घेण्याची खेळी या निमित्ताने शिवसेना आणि कॉंग्रेसने मिळून करत असल्याचे बोलले जाते. आम्ही सत्तेत आहोत म्हणजे गुलाम नाही असे म्हणत खोतकरांनी देखील भाजप विरुध्दच्या लढाईचा शंखनादच सिल्लोडच्या कार्यक्रमातून केल्याचे दिसते. 

रावसाहेब दानवे यांची जालन्यातील वाढती ताकद आणि दखल खोतकरांसाठी भविष्यात धोक्‍याची घंटी ठरू शकते. त्यामुळेच दानवेंना रोखण्यासाठी सत्तारांची साथ खोतकर घेतात का? हे आगामी काळात दिसून येईल. एकीकडे अर्जून खोतकर, दुसरीकडे दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना सोबत घेऊन सत्तारांनी टाकलेल्या जाळ्यात रावसाहेब दानवे अडकतात का? की नेहमी प्रमाणे सगळ्यांना चकवा देण्यात ते पुन्हा यशस्वी होतात हे भविष्यात स्पष्ट होईलच. 

संबंधित लेख