Shivsena boycotts BJP MP Harishchandra Chavan's meeting | Sarkarnama

भाजप खासदार चव्हाण यांच्या आढावा बैठकीकडे सत्तारूढ शिवसेनेची पाठ !

सरकारनामा
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

आम्हाला बैठकीला बोललेच नाही अशी तक्रार  शिवसेना पदाधिकाऱ्यांची आहे

नांदगाव :  शिवसेनेची सत्ता असलेल्या तालुका पंचायत समितीत खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीकडे शिवसेनेचे पदाधिकारी फिरकलेच नाहीत.  त्यामुळे सध्या तालुक्‍याच्या राजकीय वर्तुळात तो चर्चेचं विषय बनला आहे.  

आम्हाला बैठकीला बोललेच नाही अशी तक्रार या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आहे.  विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावरील महानगरीच्या स्वागतासाठी शिवसेनेचे झाडून सर्व पदाधिकारी उपस्थित होते  व  खासदार चव्हाण यांच्या प्रयत्नाबद्दल या सगळ्यांनी चव्हाणांचे स्वागत तसेच अभिनंदन केले .

चव्हाणांची भेट घेतल्यावर काही वेळातच तालुका पंचायत समितीत आयोजित बैठकीकडे स्वतःच्या सत्ता ताब्यात असलेल्या तालुका पंचायत समितीत सभापती उपसभापती यांच्यासह कुणीही फिरकलेच नाहीत. 

शिष्टाचाराप्रमाणे सभापती सौ विद्यादेवी पाटील यांच्या नावाचा बैठकीकडे पुकारा करण्यात आला व या बैठकीचे निमंत्रण दिले होते का ?  अशा शब्दात माजी आमदार संजय पवार यांनी विचारणा केली.  त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी निमंत्रण दिल्याचा खुलासा केला व बैठक सुरु झाली.  खासदार चव्हाण यांच्या वतीने तहसीलदारांना आढावा बैठकीच्या नियोजनाची सूचना करण्यात आली होती.  त्यांनी जागा उपलब्ध होत नसल्याने तालुका पंचायत समितीत ती घ्यावी ,असे गटविकास अधिकाऱ्यांना सुचविले. त्याप्रमाणे बैठक संपन्न झाली. 

मात्र निमंत्रण मिळाले नसल्याने आम्ही आलो नाही . खासदार चव्हाण यांची आढावा बैठक एखाद्या वेळेस पक्षीय पातळीवर असेल म्हणून आम्ही त्याकडे गेलो नाही , असा खुलासा शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे यांनी केला.  दरम्यान बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या होत्या . 

त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना काय कळविले ,अशा शब्दात भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी याबाबतचे आपले स्पष्टीकरण दिले .  आढावा बैठकीचा प्रोटोकॉल व त्यासंबंधी आपापली भूमिका स्पष्ट केली.  बैठकीला निमंत्रण मिळले नसल्याच्या मुद्द्यावरून सत्तारूढ शिवसेना पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने, निमंत्रणाचे कवित्व मात्र चांगलेच गाजते आहे

संबंधित लेख