शिवसेनेने "नाही', "नको'  म्हणायला शिकले पाहिजे ! 

गेल्या साडेतीन वर्षात भाजपने शिवसेनेला काय काय दिले. हे संपूर्ण देशाला माहीत आहे. त्यामुळे यापुढेही शिवसेनेने स्वाभिमान गहाण न ठेवता. न वाकता राजकारण केले पाहिजे. राजकीय परिणाम काही होवोत शिवसेना हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे असे कायम मराठी माणसाला वाटले पाहिजे.
शिवसेनेने "नाही', "नको'  म्हणायला शिकले पाहिजे ! 

भविष्यात शिवसेनेलाच अच्छे दिन येतील असे एका मित्राचे म्हणणे होते. मात्र त्याचे हे मत पटले नव्हते. तसे पाहता या गोष्टीला दीडदोन वर्षे झाली असतील. त्यावेळी भाजप जोरात होता. देशात मोदींना पुढील दहा वर्षे कोणी हलवू शकत नाही. मोदींना पर्याय कोण असे वाटत होते. शिवसेनेला तर भाजप कस्पटासमान किंमत देत होता. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना उद्धव ठाकरेंना साधे निमंत्रण देण्याचेही सौजन्य दाखविले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा मुंबईत असत तेव्हा उद्धव हे मराठवाड्यात किंवा इतर कुठल्या तरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असत. 

सत्तेची नशा भाजपच्या मंडळींना इतकी चढली होती की ते कुणालाच जुमानत नव्हते. आम्हीच शहनशाह आहोत. हा अहंकार या पक्षाच्या नेत्यांमध्ये दिसून येत होता. भारताची लोकशाही महान असे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. कारण आपल्या देशात लोकशाहीची तत्त्वे सर्वच पक्षांनी पाळली आणि जोपासली. मोदी राजवटीत मात्र विरोधकांची हेटाळणी आणि प्रतिमा मलिन करणे हाच अजेंडा त्यांनी राबविला. जे सत्तेत आहेत ते उद्या विरोधी बाकावरही बसू शकतात. यावर सत्ताधारी मंडळींचा विश्वासच नव्हता. मात्र, या वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. 

देशातील राजकीय समीकरण बदलत चालले.2014 मध्ये विरोधक खंगले होते. साडेतीन वर्षानंतर ते ताजेतवाने बनले आहेत. देशभर कॉंग्रेससह इतर पक्षही सरकारला सळो की पळो करून सोडत आहेत. प्रादेशिक पक्षही मागे नाहीत. भाजप मोठा मासा आहे तो आपणास गिळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची जाणीव त्यांना आहे. भाजपचा मित्रपक्ष "टीडीपी' तर थेट सत्तेतून बाहेरच पडला. शिवसेना रोज इशारे देते. मोदी-फडणवीस सरकारवर विरोधकांसारखा हल्लाबोल करीत आहे. सत्तेत राहायचे. मांडीला मांडी लावायची आणि भाजप सरकारवर टीका करायची हा एकहाती कार्यक्रम या पक्षाने राबविला आहे. 

शिवसेनेच्या या भूमिकेवर राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी सारखे शक्तिमान पक्षही तुटून पडत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा सध्या हल्लाबोल सुरू आहे. या पक्षाचे फायरब्रॅंड नेते अजित पवार यांनी तर भाजपपेक्षा शिवसेनेलाच टार्गेट केले. त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढविताना हा पक्ष म्हणजे गांडूळ असल्याचे म्हटले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री उपस्थित असतात. मुख्यमंत्र्यांसमोर ते सर्व निर्णय मान्य करतात आणि बाहेर आले की सरकारच्या निर्णयावरच टीका करतात. मंत्रिमंडळ बैठकीत का विरोध केला जात नाही ? या प्रश्‍नाचे शिवसेनेचे नेतेमंडळी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. हे चित्र जनतेच्या पचनी पडत नाही. विरोध करायचा असेल तर तो थेट केला पाहिजे. शिवसेना दुटप्पी भूमिका का म्हणून घेत आहेत. हा प्रश्‍न सातत्याने विचारला जात आहे. 

दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपचा जुना मित्र असलेल्या शिवसेनेला मोदी आणि त्यांच्या पक्षाकडून साडेतीन वर्षात कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही. उलट शिवसेनेला जितके म्हणून अडचणीत आणता येईल तितके आणण्याचा प्रयत्न केला गेला.

किरीट सोमय्या, आशिष शेलार, पुरोहित, मेहता सारखी बेस नसलेली मंडळी शिवसेना संपवायला निघाली होती. तसेचकेंद्रात आणि महाराष्ट्रात मंत्रिपदे देताना भाजपने तुकडा टाकल्यासारखी वागणूक शिवसेनेला दिली. अगदी दुय्यम खाती दिली. तरीही शिवसेनेने मानापमान सहन करून मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. 

एक एक मित्र भाजपपासून लांब होत चालले असताना त्यांना आता जुन्या मित्राची पावलोपावली आठवण होऊ लागल्याचे दिसून येते. राष्ट्रीयस्तरावर तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

"टीडीपी', समाजवादी पक्ष, "बसप', "आप', राष्ट्रवादी कॉंग्रेस, बिजू जनता दल, तृणमूल कॉंग्रेस आदी म्हणून जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची काही तरी ताकद आहे. उद्या देशाचे राजकारण ते ही बदलू शकतात. तसेच कॉंग्रेस अद्याप भारत मुक्त झाला नाही हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. भाजपला उत्तरप्रदेशही एक हाती राखता येईल का ? याविषयी आतापासून चर्चा रंगत आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावर गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ मित्र असलेल्या शिवसेनेला बरोबर ठेवल्यास त्याचा फायदाच होईल हे भाजपवाल्यांच्या आता लक्षात आलेले दिसते. 

शिवसेना स्वतंत्र लढली तर राष्ट्रीय पातळीवरही वेगळा संदेश देशभर जाऊ शकतो ही भीतीही भाजपवाल्यांना सतावत असावी. त्यामुळेच गेल्या काही महिन्यापासून शिवसेनेला गोंजारण्याचे सातत्याने भाजप प्रयत्न करीत आहे. तरीही शिवसेनेचा वाघ गुरगुरतच आहे.

शिवसेना स्वतंत्र लढल्यास त्यांनाही फटका बसू शकतो आणि भाजपचेही नुकसान होऊ शकते. पुढे राष्ट्रीय पातळीवर काय शिजते यावरच शिवसेना लक्ष ठेवून असावी. शिवसेनेनेही इतर राज्यातील पक्षांशी चर्चा सुरू ठेवली आहे. त्यामुळे आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

पुढील दीड वर्षे देशभर राजकारणात बऱ्याच आणि आश्‍चर्यकारक घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने शिवसेनेला राज्यसभेचे उपाध्यक्षपद देऊ केले आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, या वृत्तानंतर खुद्द शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपने ऑफर दिली तरी ती स्वीकारणार नाही असे स्पष्ट केले. ते एका अर्थाने बरेच झाले.

खरे तर शिवसेनेने तयारी दाखविली असती तर ती सत्तेसाठी लाचार असल्याची टीका झाली असती. आता दीड वर्षासाठी एखादे पद स्वीकारून भाजपचे उपकार नकोत अशी या पक्षाच्या नेत्यांची भावना झाली असेल ती चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. 

गेल्या साडेतीन वर्षात राज्यात आणि केंद्रात मित्र भाजपने शिवसेनेला काय काय दिले हे संपूर्ण देशाला माहीत आहे. त्यामुळे यापुढेही शिवसेनेने स्वाभिमान गहाण न ठेवता. न वाकता राजकारण केले पाहिजे. आपला कणा ताठ ठेवला पाहिजे. राजकीय परिणाम काही होवोत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष आहे असे मराठी माणसाला कायम वाटत राहिले पाहिजे अशी शिवसेनेने आपली वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com