युती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच !

युती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच !

 मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे.

विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे आश्‍वासन दिले असताना गेल्या चार वर्षांपासून भाजपने शिवसेनेला या पदापासून दूर ठेवले आहे. 


शिवसेनेचे आमदार कमी असल्याने मंत्रिमंडळात शिवसेनेला पाच कॅबिनेट व सात राज्यमंत्रिपदे देण्यात आली. यातही शिवसेनेच्या मंत्र्यांकडे कमी महत्त्वाची खाती दिल्याने युतीत चार वर्षांपासून धुसफूस सुरू आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे आहे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र, सरकारच्या चार वर्षांतील कारभारावरून आणि दोन्ही पक्षांतील कुरघोडीवरून भाजपने शिवसेनेला उपाध्यक्षपदापासून दूर ठेवले आहे.

शिवसेना आणि भाजपमधील सत्तासंघर्ष लपून राहिलेला नाही. मात्र या संघर्षामुळे विधिमंडळातील संविधानिक पद चार वर्षांपासून रिक्‍त असल्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच असल्याचे विधिमंडळातील नोंदीवरून दिसून येते. 

आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. यासाठी शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी भाजपला शिवसेनेसोबत युती करायची आहे.

दुसरीकडे भाजपने दिलेली सापत्न वागणूक शिवसेना नेत्यांच्या मनात सलत आहे. याबाबत शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभेतील उपाध्यक्षपदाचा मुद्दा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com