shivsena beed faction in morcha | Sarkarnama

शिवसेनेच्या बीडमधील आंदोलनातही गटबाजी उघड

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 जुलै 2017

बीड : कधी काळी वाघाची डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेची ताकद बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच आता गटबाजीची बाधा पक्षाला जडली आहे. कर्जमाफीबद्दल सोमवारी (ता. 10) झालेल्या आंदोलनातूनही शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे यांच्यावर उपजिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आंदोलनाचा आम्हाला निरोपच दिला नाही, आम्हाला डावलण्यात आल्याचे म्हणत स्वतंत्रपणे जिल्हा बॅंकेसमोर ढोल बडवत आंदोलन केले. 

बीड : कधी काळी वाघाची डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेची ताकद बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच आता गटबाजीची बाधा पक्षाला जडली आहे. कर्जमाफीबद्दल सोमवारी (ता. 10) झालेल्या आंदोलनातूनही शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे यांच्यावर उपजिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आंदोलनाचा आम्हाला निरोपच दिला नाही, आम्हाला डावलण्यात आल्याचे म्हणत स्वतंत्रपणे जिल्हा बॅंकेसमोर ढोल बडवत आंदोलन केले. 

सरकारने कर्जमाफीची घोषणा व शेतकऱ्यांना तात्काळ दहा हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर किती शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची 
मदत व कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला याची गावनिहाय यादी जाहीर करावी तसेच मंजूर पिक विम्याचे तात्काळ वाटप करावे या मागणीसाठी 
जिल्हाप्रमुख अनिल जगताप व बाळासाहेब पिंगळे यांनी जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेसमोर थाळीनाद करत जोरदार आंदोलन केले. 

माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासह त्यांचे समर्थक आणि सर्व तालुक्‍यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून गर्दीही जमवली. पण, जिल्हाप्रमुख पदाच्या शर्यतीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना जाणिवपूर्वक आंदोलनापासून दुर ठेवल्याचा थेट आरोप उपजिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी सरकारनामाशी बोलताना केला. त्यामुळे पक्षनिष्ठा आणि आमचे अस्तित्व दाखवण्यासाठी आम्हीही आंदोलन केल्याचा खुलासा त्यांनी केला. 

श्री. खांडे यांच्यासह माजी आमदार प्रा. सुनिल धांडे, उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख ऍड. चंद्रकांत नवले, शहरप्रमुख सुदर्शन धांडे यांनी एकत्र येत "हम भी कुछ कम नही' म्हणत याच बॅंकेच्या मोंढा शाखेसमोर ढोल बडवत जिल्हाप्रमुखांच्या थाळीनादाला प्रत्युत्तर दिले. यातून आंदोलनाची चर्चा होऊन शेतकऱ्यांना हा पक्ष आपला वाटण्यापेक्षा पक्षातील गटबाजीवरच अधिक चर्चा झाली. 

जिल्ह्यात पक्षाची वाताहात 
काही वर्षांपुर्वी शिवसेनेने प्रत्येक जिल्ह्यात दोन जिल्हाप्रमुख नियुक्त केले होते. बीडमध्येही शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख कार्यरत आहेत. पण, विधानसभा निवडणुकीपासून पक्षाची जिल्ह्यात दिवसेंदिवस पिछेहाट सुरु आहे. बीड मतदारसंघात पक्षाचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले होते. चार महिन्यापुर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही पक्षाची वाताहात झाली. ही पडझड रोखण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री बदामराव पंडित पक्षात आले. त्या निमित्ताने शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या सत्तेत वाटा आणि गेवराई पंचायत समितीत पुर्ण सत्ता हस्तगत करता आली. जिल्ह्यात पक्ष दिवसेंदिवस पिछाडीवर जात असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 
नजरेतून सुटले नाही. त्यामुळे दीड महिन्यापूर्वी खुद्द ठाकरे यांनीच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून खडे बोल सुनावले होते. 

संघटनात्मक बदलांचे संकेतही दिल्याने खुर्ची जाण्याची भिती काही पदाधिकाऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती. काही पदाधिकाऱ्यांना नारळ मिळणार हे गृहित धरून दुसऱ्या फळीतील पदाधिकारी जोमाने त्यांची जागा घेण्यासाठी कामाला लागले होते. त्यातून जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे यांचा एक तर उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक व कुंडलिक खांडे यांचा दुसरा असे उघड दोन गट पडले. 

संबंधित लेख