shivsena barane and adhalrav | Sarkarnama

शिवसेनेत श्रीरंग बारणेंचे वजन वाढले, आढळरावांना मातोश्रीचा झटका

उत्तम कुटे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील अपयशामुळे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख राहूल कलाटे यांना बदलणार हे निश्‍चीत होते.मात्र, जिल्हाप्रमुख (मावळ) मच्छिंद्र खराडेही बदलणे धक्कादायक मानले जात आहे. 

पिंपरी : पिंपरी - चिंचवड शिवसेना शहरप्रमुख आणि पुणे जिल्हाप्रमुखपदी आज मुंबईत झालेल्या बैठकीत नावे निश्‍चीत करण्यात आली. त्या दोन्ही पदांवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे समर्थकांची नावे नक्की झाली. शिरूरचे पक्षाचे खासदार शिवाजीराव आढळऱाव-पाटील यांची शिफारस यावेळी डावलण्यात आल्याने भाजपचे आवतण मिळालेल्या आढळरावांना हा मातोश्रीने झटका दिल्याचा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे. तीनवेळा खासदार झालेल्या आढळरावांच्या तुलनेत प्रथमच खासदार असलेल्या बारणेंचे वजन मातोश्री व शिवसेनेत वाढल्याची चर्चाही रंगली आहे. 

यानिमित्ताने एका दगडात बारणे यांनी दोन पक्षी मारल्याची चर्चा शहर शिवसेनेतील एका जुन्या पदाधिकाऱ्याने सांगितले. आपल्या मर्जीतील नसलेले शहरप्रमुख व जिल्हाप्रमुख, तर त्यांनी दूर केलेच. एवढेच नाही,तर त्याजागी आपले समर्थक बसविण्यातही त्यांना यश आले आहे, असे हा पदाधिकारी म्हणाला. 

शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख म्हणून योगेश बाबर, तर जिल्हाप्रमुख म्हणून गजानन चिंचवडे यांची नावे आज निश्‍चीत झाली. मात्र,त्यांच्या जाहीर निवडीची घोषणा दसरा मेळाव्यानंतर केली जाणार आहे. हे दोघेही बाबर यांचे पाठीराखे आहेत. योगेश हे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे पुतणे आहेत. चिंचवडे हे,तर बारणे कॉंग्रेसमध्ये असल्यापासून त्यांचे अनुयायी आहेत. यामुळे आगामी लोकसभा लढणे बारणे यांना आता अधिक सोपे जाणार आहे. 

महिला संघटिका सुलभा उबाळे यांची शिफारस या बैठकीत केली होती,असे समजते. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे, बारणे, आढळऱाव आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे आमदार ऍड. गौतम चाबूकस्वार अशा चौघांत मुंबईत मातोश्री या ठाकरे यांच्या बंगल्यावर पाऊण तास ही बैठक झाली. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील अपयशामुळे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख राहूल कलाटे यांना बदलणार हे निश्‍चीत होते.मात्र, जिल्हाप्रमुख (मावळ) मच्छिंद्र खराडेही बदलणे धक्कादायक मानले जात आहे. 

संबंधित लेख