शिवसेनेचा मोर्चा फसला आणि प्रदीप जैस्वाल  नेत्यांसमोरच पदाधिकाऱ्यांवर  भडकले !

pradip-jaiswal
pradip-jaiswal

औरंगाबाद  : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन दिवसापूर्वीच्या मोर्चास गर्दी कमी होती म्हणून महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल भडकले .

संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या समोरच महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी पदाधिकाऱ्यांना जाब विचारला.माझ्यासह इथे बसलेल्या कुणाविरूध्द तुमची तक्रार असेल तर बिंनधास्त  बोला, कुणालाही घाबरण्याची गरज नाही असे आवाहनच त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. 

 शेतकऱ्यांना दसऱ्यापुर्वी कर्जमाफी द्या या मागणीसाठी (ता.11) काढण्यात आलेला मोर्चा फसल्याच्या बातम्यांवरून शिवसेनेत अद्यापही धुसफू सुरु आहे. पुर्व, पश्‍चिम आणि मध्य अशा तीनही मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोर्चाच्या विषयावरून पुन्हा वातावरण तापले होते.  

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानूसार शेतकरी कर्जमाफीची रक्कम 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा या मागणीसाठी औरंगाबादेत शिवसेनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चाला जिल्हाभरातून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक, जि.प.प.स. सदस्य, महिला आघाडी, युवासेना, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, गट व शाखाप्रमुखांनी आवर्जून उपस्थि राहावे असे आदेश देण्यात आले होते. 

पाच ते दहा हजारांची संख्या जमवून शहरात वातावरण निर्मिती करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. पणे जेमतेम हजार दीड हजार कार्यकर्ते पदाधिकारी मोर्चात सहभागी झाल्याने मोर्चा फसल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमधून प्रसिध्द झाल्या.

पश्‍चिम मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रदीप जैस्वाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मोर्चा फसल्यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली, त्यापेक्षा फक्त निवेदन दिले असते तरी चालले असते असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

तालुका प्रमुख, सरपंच यांनी ग्रामीण भागातून मोर्चासाठी शेतकरी कार्यकर्ते का आणले नाही, याला जबादार कोण? तुम्हाला काय अडचणी होत्या? एक नगरसेवक शंभर कार्यकर्ते मोर्चाला आणू शकत नाही का? असा सवाल जैस्वाल यांनी बैठकीत उपस्थित केला. यावर अनेकांनी आम्हाला मोर्चासाठीचे निरोपच मिळाले नसल्याची तक्रार केली. 

प्रदीप जैस्वाल हे शिवसेनेचे प्रारंभीपासूनचे कार्यकर्ते राहिले आहेत . वयाच्या पंचविसाव्या वर्षी ते शिवसेनेतर्फे औरंगाबादचे महापौर  झाले होते .  औरंगाबाद जिल्ह्याचे खासदारपद त्यांनी भूषविले आहे . शहरातील मध्य मतदारसंघातून ते एकदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . रोखठोक  आणि निर्भीड स्वभावामुळे त्यांचा शिवसेना पक्ष संघटनेत दरारा आहे .  सर्वसामान्यांच्या  मदतीला सदैव धावून जाणारा नेता म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे . त्यामुळे त्यांनी या विषयावर आवाज उठवल्याने विषय गंभीर बनला . 

पक्षाला वेळ देता येत नसेल तर पद सोडा- घोसाळकर 

प्रदीप जैस्वाल यांच्या आक्रमक भूमिकेनंतर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी देखील पदाधिकाऱ्यांना फ़ैला वर घेतले. मोर्चा फसल्यामुळे नाचक्की झाल्याचा मुद्दा मात्र त्यांनी खोडून काढला. मोर्चामुळे शहारात चांगला मेसेज गेला, शहर दणाणून गेले असे ते म्हणाले. पक्षातील गटबाजी, हेवेदावे आणि आपले पद आणि त्या पदाचे काम काय हे माहीत नसल्यामुळेच पक्षाची पिछेहाट होत असल्याचे सांगितले.

 शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला देखील यायला पदाधिकाऱ्यांना वेळ नसेल तर पद कशाला घेता सोडून द्या असा दम त्यांनी भरला. भाजपची ताकद शहरात वाढत आहे, महापालिकेत त्यांच्या नगरसेवकांची संख्या वाढत असतांना आपण मात्र आहे तिथेच आहोत. आपला शत्रू बदलला आहे याची जाणीव सगळ्यांनी ठेवायला हवी.

 पक्षाने बोलावलेल्या बैठकांना लोकप्रतिनिधी, महापौर, उपमहापौर, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर हजर रहायलाच पाहिजे, संघटनेसाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर पद सोडा आणि दुसऱ्याला काम करण्याची संधी द्या ,अशा शब्दांत घोसाळकर यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले. 

बैठकीला उशीरा आलेल्या युवासेना जिल्हाअधिकारी नगरसेवक ऋषीकेश खैरे यांना देखील घोसाळकर यांनी फैलावर घेत बैठकीला येतांना वेळा पाळत जा, वाईट सवय सोडा, कारणे देऊ नका अशा भाषेत खडसावले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com