"..... तेंव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म".

"..... तेंव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म".

आवाज कुणाचा शिवसेनेचा ! इतकी माणंस कशाला, ...च्या मयताल ! एक लाडू ताटावर,... ... वर ! ...च्या आवशीचा घो !! कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही ! अशा एक ना एक घोषणा देत शिवसेनेने आपला आवाज बुलंद केला. कॉंग्रेस, समाजवादी मंडळींविषयी शिवराळ भाषा ज्यावेळी शिवसेना वापरत होती. तेंव्हा हेच भाजपवाले त्यांना टाळी देत होते. मग, तीच भाषा त्यांच्याविषयी वापरली जावू लागताच भाजपवाले का अस्वस्थ होत आहेत. 

एखाद्यावर तुटून पडण्यासाठी मातोश्रीवरून आदेश आला की मग तो पुढे कोण आहे हे कधीच पाहिले गेले नाही. जो शिवसेनेच्या विरोधात गेला त्याला कोणत्याही परिस्थितीत आडवा करायचे हेच धोरण एक दोन वर्षे नव्हे तर गेली पन्नास वर्षे शिवसेनेने सुरूच ठेवले आणि आजही ते सुरूच आहे. 

राजकीय नेते, लेखक, अभिनेते, अभिनेत्री असो की व्यावसायिक ! शिवसेनेने कधी कोणाची गय केली नाही. देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्री मंत्र्यांपर्यंत जे कोणी अप्रिय वाटले की त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी शिवसेैनिक अधिक आक्रमक होत असतात. मग कधी मारहाण कर, कधी तोंडाला काळे फास, गाढवावरून धिंड काढ, कधी प्रतिकात्मक पुतळा जाळ तर कधी घोषणा देऊन समोरच्या माणसाला असा काही पंच द्यायचा की त्याला पूर्णपणे घायाळ करायचे. त्यामुळे सहजा शिवसेनेच्या वाटेला जाण्याचे धाडस कोणी करीत नसे. राडा संस्कृतीचे नेहमीच शिवसेनेने समर्थन केले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते. तोपर्यंत भलेभले त्यांना टरकून होते. पुढे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा आक्रमक चेहरा काहीसा बदलण्याचा प्रयत्न केला असे म्हणावे तर त्यांच्यातील ठाकरीबाणा अचानक खडबडून जागा होतो. जे उद्धवांचे तेच राज ठाकरेंचेही. 

गेल्या पाच दशकातील शिवसेनेचा इतिहास आक्रमकतेनेच भरलेला आहे. तो कधीही मवाळ झालेला नाही. बाळासाहेब तर बाळासाहेब होते. त्यांच्याशी उद्धव-राज यांची तुलनाही होऊ शकत नाही. तशी तुलना करणेही उचित होणार नाही. मात्र शिवसेनेने आपला आक्रमक चेहरा कधीही सोडायचा नाही हा बाळासाहेबांनी दिलेला कानमंत्र ते टिकवून आहेत. हा पक्ष किंमत मोजतो पण, तुटून पडतो. उद्धवांकडे पाहिले तर ते संयमी वाटतात मात्र, अशी काही फिरकी घेतात की समोरचा क्षणात खाली येतो. राज ठाकरेंसमोर तर कोणी डोळ्यात डोळे घालून पाहूही शकत नाही. समोरच्या प्रश्‍नकर्त्याचीच ते उलट तपासणी घेतात. मग कितीही मोठा पत्रकार, संपादक असो. तुटून पडाव राज ठाकरेंनी आणि शांत राहून समोरच्याचा काटा काढावा उद्धव ठाकरेंनी. 

2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जे सत्तांतर झाले त्यानंतर भाजपबरोबरचे शिवसेनेचे गेल्या पंचवीस वर्षातील मधूर नाते खऱ्या अर्थाने तुटण्यास सुरवात झाली. शिवसेनेने कधी नव्हे इतका टोकाचा विरोध भाजपला करण्यास सुरवात केली. ठाकरे बंधुचे एकच लक्ष्य आहे. ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजप. गेल्या तीन वर्षाच्या काळात शिवसेनेने तर भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तशी येथे खूप उदाहरणेही देता येतील. गेल्या काही दिवसापासून अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनवरून शिवसेना प्रथम आक्रमक झाली. त्यापाठोपाठ मनसेही विरोधासाठी मैदानात उतरली. या दोन्ही पक्षांचा एकच प्रश्‍न आहे ही बुलेट ट्रेन मुंबईतच का ? यामागे मराठी माणूस हेच कारण आहे. आज मुंबईचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाचे पाऊल उपनगराच्याही पुढे पडत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाचा पाया असलेला मराठी माणूसच जर उद्धवस्त झाला तर या दोन्ही पक्षांचे भविष्य काय हा प्रश्‍न उतरतो. शिवसेना-मनसेने म्हणूनच मोदी-फडणवीस म्हणजे भाजपलाच लक्ष्य केले आहे. शिवसेनेला तर भाजपपेक्षा कॉंग्रेसची राजवट अधिक चांगली होती हे म्हणावे लागत आहे. 

महागाईच्या मुद्यावरून शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. नेहमीच्या स्टाइलने शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात ज्या घोषणा दिल्या त्याने भाजप नेते भलतेच संतप्त झाले आहेत. या शिवसेनेशी युतीच नकोच अशी भावनाही झाली असावी. थेट मोदींना शिंगावर घेण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत खुद्द उद्धव यांनी मोदींचाच बापही काढला. आता त्यांचे मावळे " इतकी माणसं कशाला, मोदींच्या मयताला ' अशा घोषणाच देत आहेत. याच घोषणा एकेकाळी ज्या कॉंग्रेसवाल्यांविरोधात दिल्या जात होत्या. त्यावेळी हेच भाजपवाले शिवसेनेला टाळी देत होते. त्यावेळी यांना शिवराळ भाषा आहे असे का वाटले नाही ? 

शिवसेनेचे भूमरॅंग उलटले तर त्यांना शिवसेना नकोशी वाटू लागली. दिवंतग समाजवादी नेत्या मृणाल गोरे, अहिल्याताई रांगणेकर, पुष्पा भावे या महिला तर शिवसेनेच्या कडव्या विरोधक होत्या. शिवसेनेच्या फॅसिझमवर त्यांनी ज्या ज्या वेळी आवाज उठविला त्या त्या वेळी शिवसेनेने त्यांची (आज जशी भाजपची टर उडवित आहेत) टर उडविली होती. हा इतिहासही लक्षात घेण्याची गरज आहे. या तिघींविरोधात शिवसेनेच्या घोषणा काय होत्या तर आज ज्या दिल्या जात आहेत त्याच होत्या. काही घोषणा तर अशा होत्या की त्या येथे मांडताही येत नाही. मात्र तेंव्हा हेच भाजपवाले तोंडावर बोट ठेवून तमाशा पाहत होते. कारण त्यांना शिवसेनेचे बोट धरून घराघरात पोचायचे होते. बाळासाहेबांच्या भाषेचे समर्थन केले जात होते. त्यांची ठाकरी भाषा कशी चुकीची नाही हे भाजपवालेच सांगत होते. आज तीच भाषा भाजपला शिवराळ का वाटावी. 

माजी पंतप्रधना मनमोहनसिंग, सोनिया गांधी,ज्येष्ठ नेते शरद पवार, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, समाजसेवक अण्णा हजारे, अभिनेत्री शबाना आझमी, नानासाहेब गोरे, छगन भुजबळ, नारायण राणे, ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर असो की राहुल गांधी या सर्व मंडळींविषयी जी भाषा वापरली त्यावेळी "..... तेंव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म".  असा सवाल यानिमित्त्याने भाजपच्या मंडळींना करावासा वाटतो. 

आज शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी जी शिवराळ भाषा वापरीत आहे त्याचे कदापि समर्थन करता येत नाही. परंतु, ज्यावेळी ती फार्मात होती. त्यावेळी यापेक्षाही वाईट आणि लाज वाटेल अशा घोषणा बेंबीच्या देटापासून शिवसैनिक देत होते. तेंव्हा का म्हणून नाही निषेध केला. कारण त्यावेळी शिवसेनाप्रमुखांसमोर मान वर करून बोलण्याची हिम्मत त्यांच्यात नव्हती ? असे आज म्हणावे का ? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com