अतिक्रमणाच्या मुद्यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना पुन्हा आक्रमक

अतिक्रमणाच्या मुद्यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना पुन्हा आक्रमक

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये 11 मे रोजी झालेल्या दंगलीनंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पण ज्या शहागंज, चेलीपूरा, राजाबाजार भागात दंगलीचा भडका उडाला त्या भागात फळविक्रेत्या गाड्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. फळ विक्रेत्याशी झालेल्या वादातूनच या भागात दंगल झाल्याचे बोलले जाते. मात्र फळ विक्रेत्यांनी पुन्हा बस्तान बसवल्याने शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. येत्या 48 तासांत अतिक्रमण हटवा नाही तर रास्ता रोको करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला देण्यात आलाय. 

शहरात उसळलेल्या दोन दिवसांच्या दंगलीत 10 कोटींची मालमत्ता जळून खाक झाली होती, तर दोघांचा बळीही या दंगलीने घेतला होता. फळ विक्रेत्यांकडून खरेदी केलेले आंबे खराब निघाल्याचा जाब विचारायला गेल्याला तरूणाला फळ विक्रेत्यांच्या जमावाने बेदम मारहाण केल्यानेच पुढचे महाभारत घडले होते. अतिक्रमणाच्या या मूळ मुद्यावर पुन्हा शिवसेनेने लक्ष केंद्रित केले आहे. पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देखील शिवसेनेने शहागंज, चेलीपूरा आणि राजाबाजार भागातील फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. 

पण हिंदुशक्ती मोर्चाचा बंदोबस्त आणि नुकताच सुरू झालेला रमझान यामुळे महापालिकेने या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले. अर्थात यामागे शांत झालेले वातावरण पुन्हा बिघडू नये असा जरी हेतू असला तरी या फळ विक्रेत्यांमुळेच शहरात भडका उडू शकतो असे बोलले जाते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी येत्या 48 तासांत शहागंज, चेलीपूरा, राजाबाजार भागातील फळविक्रेत्यांचे अतिक्रमण हटवा नाहीतर रास्ता रोको करू असा इशारा महापालिका प्रशासनाला दिला आहे. 
महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील मनपा आयुक्त डॉ. निपूण विनायक यांना अतिक्रमण हटवण्या संदर्भात सूचना दिल्या आहेत. आता महापालिका अतिक्रमण हटवणार की शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com