शिवसेना सत्तेमधून बाहेर पडणे अवघड !

शिवसेना सत्तेमधून बाहेर पडणे अवघड !

औरंगाबाद : राज्याच्या सत्तेत वाटेकरी असून देखील सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेची आता चांगलीच कोंडी होताना दिसते आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहोत असे म्हणत आपला विरोध आपल्याला निवडून दिलेल्या जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी असल्याचे चित्र निर्माण करण्यात उद्धव ठाकरे सुरवातीला यशस्वी ठरले. भाजपने अपमानास्पद वागणूक दिल्याचे राजकीय भांडवल करत सर्वसामान्यांची सहानुभूती मिळवण्यात देखील शिवसेनेने बाजी मारली. पण आता "अति झाले आणि हसू आले' अशी अवस्था शिवसेनेच्या बाबतीत झाली आहे. एकमेकांची उणीदुणी काढत सत्तेची तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर पटत नसेल, प्रश्‍न सुटत नसतील, शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ शकत नसाल तर सत्तेतून बाहेर पडा असा सल्ला विरोधकांसह सर्वसामान्य जनता शिवसेनेला विविध माध्यमातून देत आहे. स्वाभिमानी आणि तळागाळातील शिवसैनिकांची देखील हीच इच्छा असल्याचे बोलले जाते. शिवसेना मात्र अद्यापही सरकारमधून बाहेर पडण्याच्या मूडमध्ये नसल्याचे उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे. 

शांत, संयमी आणि मवाळ अशी प्रतिमा असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख अलीकडे सरकारमधून बाहेर कधी पडणार या प्रश्‍नावर भडकतांना दिसतात. मराठवाड्यात सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना त्यांचा संताप दिसून आला. निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश नुकतेच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले होते, आणि त्यानंतरच शिवसंपर्क मोहिमेला मराठवाड्यातून प्रारंभ झाला. त्यामुळे सहाजिकच शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार, मध्यावधी लागणार आणि शिवसेना स्वबळावर लढणार या चर्चेला उधाण आले. कर्जमुक्ती, तूर खरेदी, शेतीमालाला हमी भाव या मुद्यांच्या आधारे गावागावात जाऊन भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करायचे आणि चाचपणी करत विधानसभेची तयारी करायची हा शिवसंपर्क मोहिमे मागचा हेतू म्हणावा लागेल. 

मराठवाड्यातील 46 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार व मुंबई महापालिकेचे नगरसेवक थेट जाऊन धडकले. शेताच्या बांधावर, शेतकऱ्याच्या घरात आणि गावागावातील पारावर पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी या मंडळींनी चर्चा करत संघटनेची बांधणी केल्याचे सांगितले जाते. एखाद्या मोठ्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधीची तयारी वाटावी असे वातावरण 
मराठवाड्यात आणि पुढील महिनाभरात संपूर्ण राज्यात दिसणार आहे. शिवसंपर्क मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा सर्वांत प्रथम त्यांना ही मोहीम म्हणजे मध्यावधी निवडणुकीची तयारी आहे का? आणि शिवसेना सरकारमधून बाहेर कधी पडणार हा प्रश्‍न विचारण्यात आला. यावर एरवी संयमी आणि शांत वाटणारे उध्दव ठाकरे भडकले आणि "आमच्या पेक्षा तुम्हालाच अधिक घाई झाल्या'चे म्हणाले. शिवसंपर्क मोहिमेचा मध्यावधीशी जोडलेला संबंध त्यांना खटकला. "दोन वर्ष कुठल्याच निवडणुका नाहीत, निवडणुका आल्या म्हणजे संघटना बांधणी करावी का' असा प्रती प्रश्‍न करत उद्धवच ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. कर्जमुक्तीच्या प्रश्‍नावर सरकार तीन वर्षापासून काहीच निर्णय घेत नसतांना आणखी किती वाट पाहणार? आणि "हो मी कर्जमुक्त होणारच' यातून काय साध्य होणार हे प्रश्‍न देखील उद्धव ठाकरे यांना आवडले नाही. मग मी काय करावे, तुम्ही नाही म्हणत असाल तर थांबतो असा सूर उद्धवच ठाकरे यांनी लावला. त्यांच्या या पावित्र्यामुळे पत्रकार परिषदेतील वातावरण थोडावेळ गंभीर बनले. माझ्याकडून वेड्या ाकड्या अपेक्षा ठेवू नका, मी माझ्या पध्दतीने पुढे जातो, तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढे जा असा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिला. एकंदरीत पत्रकार परिषदेमध्ये वारंवार सरकारमधून बाहेर कधी पडणार या विचारल्या गेलेल्या प्रश्‍नाला उद्धव ठाकरे चांगलेच वैतागले होते. 
चीत भी. मेरी पट भी. मेरी 
माझ्या डोळ्यासमोर मध्यावधी निवडणुका नाही असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाला निवडणुकीसाठी नेहमीच तयार राहावे लागते अशी भूमिका मांडत "चीत भी मेरी पट भी मेरा'चा अनुभव दिला. शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर शिवसंपर्क मोहिमेमुळे चैतन्य तर आहे, पण पुढे काय? असे प्रश्‍नार्थक चिन्ह देखील होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील अनेक भागात भाजपने जोरदार मुसंडी घेत शिवसेनेला मागे टाकले. त्यामुळे यापुढे भाजपसोबत जाणे शिवसेनेसाठी धोक्‍याची घंटा ठरू शकते हे ओळखूनच अनेक ठिकाणी अध्यक्षपद आणि सत्तेसाठी शिवसेनेने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. जर मध्यावधी निवडणुका लागल्याच तर पक्षाला लागलेली गळती रोखून लढाईला सज्ज राहता यावे यासाठीच ही शिवसंपर्क मोहीम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारमधून बाहेर न पडताच भाजपला जितक बदनाम करता येईल तितकं करायच आणि निवडणुका लागल्या की त्या जोरावरच शिवसेनेची स्वबळावर सत्ता आणायची अशी रणनीती आखली जात आहे. 
मध्यावधीचा ढोल फुटणार 
शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेच्या बाबतीत भाजपने सावध भूमिका घेतल्याचे सध्या तरी दिसते. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नाही याची खात्री भाजप नेतृत्वाला आहे. त्यामुळेच "मी मारल्या सारख करतो, तू रडल्या सारख कर' असाच प्रयोग दोन्ही बाजूने सुरू आहे. कारण भाजप देखील आपल्या विविध कार्यक्रम, कार्यकर्ता मेळाव्यातून मध्यावधीच्या तयारीला लागा अशी हाक देताना दिसते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अनेकदा मध्यावधी आणि स्वबळाचा नारा दिला आहे. एवढेच नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार अशी भविष्यवाणी देखील काही दिवसांपूर्वी केली होती. 
मध्यावधी निवडणुकीला समोर जाण्याची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा आणि तयारी असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी तशी शक्‍यता मात्र दिसत नाही. एकूणच सरकार पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल, तीन वर्ष काढली तशी पुढील दोन वर्ष देखील शिवसेना-भाजप एकमेकांना दूषणे देत काढेल आणि थेट 2019 मध्येच निवडणुकांना समोर जाईल असेच "पहले आप, पहले आप'च्या या दोन्ही पक्षांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com