...तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही! : शिवसेनेचा इशारा

 ...तर मुंबईतून एकही  विमान उडू देणार नाही! : शिवसेनेचा इशारा

नवी दिल्ली : ""गैरवर्तन करणारे मोकाट, आणि मलाच शिक्षा का दिली जात आहे. 'तू नरेंद्र मोदी है क्‍या' असे म्हणत त्या अधिकाऱ्यानेच माझ्याशी प्रथम अरेरावी केली असताना माझ्याच विरोधात गुन्हा कसा काय दाखल करण्यात आला, असा सवाल खासदार रवींद्र गायकवाड यांनी लोकसभेत उपस्थित केला. दरम्यान, चप्पलमारप्रकरणावरून आज लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला. नागरी विमान उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी प्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही असे म्हणताच त्यां शिवसेना सदस्यांनी घेराव घातला. यावेळी गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह काही मंत्र्यांनी मध्यस्थी करीत शांतता राखण्याचा प्रयत्न केला. न्याय न मिळाल्यास मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. 

यासंदर्भात गायकवाड यांनी लोकसभेत निवेदन केले. संसदेच्या प्रतिमेला तडा गेला असल्यास मी संसदेची माफी मागतो. मात्र, मी एअर इंडियाच्या त्या अधिकाऱ्याची कदापी माफी मागणार नाही असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. खासदार गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी विरोधात लोकसभेत शिवसेनेचे खासदार आक्रमक झाले. त्यानंतर लोकसभेचे कामकाज 12.45 पर्यंत तहकूब करण्यात आले. आपल्यावरील बंदी उठविण्यात यावी, तसेच गुन्हा मागे घेण्यात यावा अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षा सुनीता महाजन व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली. 

तो म्हणाला, 'तू नरेंद्र मोदी है क्‍या' 
गायकवाड यांनी सांगितले की, मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार वही मागितली होती. तो अधिकारी काही मिनिटांनंतर माझी तक्रार ऐकण्यासाठी आला. 
तो मला म्हणाला 'तुम कौन हो ?' त्यावर मी त्याला विचारले 'तुम कौन हो ?', तर तो म्हणाला, "मै एअर इंडिया का बाप हूँ। 

त्याला सांगितले की, मी खासदार आहे. त्यावर तो अधिकारी म्हणाला, "तो तू नरेंद्र मोदी है क्‍या?" 

त्यावर मी त्या अधिकाऱ्याला ढकलून दिले. त्यावरून माझ्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कसा काय दाखल करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विमानाने प्रवास करणे हा माझा घटनात्मक अधिकार आहे. एअरलाईन्स माझा अधिकार कसा काय नाकारू शकतात. लोकसभेत मला न्याय मिळेल अशी आशा, मी एक शिक्षक आहे, विनम्रता हा माझा स्वभाव आहे असे गायकवाड यांनी निवेदन करताना सांगितले. 

केंद्रीय मंत्री अनंत गिते म्हणाले, "रवींद्र गायकवाड हे सन्माननीय संसद सदस्य आहेत. विमान प्रवास करीत असताना प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. परंतु, विमानात अशा काहीही घटना घडल्यास संबंधितांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला जातो. हे अन्यायकारक आहे. त्यामध्ये बदल करण्यात यावा.'' 
विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, माझ्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर माझ्या नावाने सातवेळा विमानाची तिकिटे काढण्यात आली. त्या जागी कोणी प्रवास केला मला माहीत नाही. कोणीही कोणाच्याही नावे प्रवास करणे धोकादायक आहे.'' 
विमान प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची ओळखपत्रे तपासण्यात यावी. त्यासाठी कायदा केला जावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

तडजोड नाही : राजू 
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी तडजोड करणार नसल्याचे सांगताच शिवसेना खासदारांनी त्यांना घेराव घातला. भाजप खासदार एस.एस. अहलुवालिया आणि राजनाथसिंह यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एअर इंडियाच्या विमानांचे मुंबईतून उड्डाण होऊ देणार नाही, असा इशारा सेना खासदार देत असल्याचे ऐकू आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com