shivsangram and shivsena | Sarkarnama

शिवसेनेचे सरदार अयोध्या स्वारीवर ; शिलेदारांनी हाती घेतला शिवसंग्रामचा झेंडा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

शिवसेनेच्या वाघांनो सावकारकीसाठी स्वत:चा वापर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा. अखेरचा जय महाराष्ट्र अशी पोस्ट बंडखोरी करणारे बीड विधानसभा प्रमुख सुदर्शन धांडे यांनी सोशल मिडीयावर टाकली होती. नव्या कार्यकारीणीवर यापूर्वीही काही शिवसेना समर्थकांनी अशीच टिका केली होती. 

बीड : " पहिले मंदिर, फिर सरकार' चा नारा देत शिवसेनेने अयोध्येवर कुच केली. जिल्ह्यातील पक्षाच्या सरदारांनीही या मोहिमेत हिरीरीने सहभाग नोंदविला. मात्र, याच वेळी इकडे पक्षाच्या काही शिलेदारांनी शिवसंग्रामचा झेंडा हाती घेतला. शिवसेनेला जयमहाराष्ट्र करताना पक्षाचे विधानसभा प्रमुख सुदर्शन धांडे यांनी " शिवसैनिक वाघांनो सावकारकीसाठी स्वत:चा वापर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा ' ही सोशल मिडीयावर टाकलेली पोस्ट बरेच काही सांगून जात आहे. 

साधारण वर्षभरापूर्वी सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांच्या खांद्यावर जिल्हा प्रमुख पदांची धुरा आली. मुळूक यांच्याकडे केज, माजलगाव आणि परळी हे तीन मतदारसंघ तर खांडे यांच्याकडे पक्षाचे बीड, गेवराई आणि आष्टी मतदार संघाची जबाबदारी आहे. दरम्यान, पंधरवाड्यापूर्वी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख, विधानसभा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख आदी कार्यकारिणीची घोषणा झाल्यापासून पक्षांतर्गत अस्वस्थता वाढलेली अवस्थता काही काही कडवे शिवसैनिक आणि समर्थकांनी सोशल मिडीयावरुन व्यक्त केली होती. 

दरम्यान, शिवसेनेने " पहिले मंदिर फिर सरकार' चा नारा देत अयोध्येवर कुच केली. मागच्या तीन दिवसांपासून विविध माध्यमांवर शिवसेनेचीच चर्चा आहे. या मोहिमेत दोन्ही जिल्हा प्रमुखांसह जिल्ह्यातील इतर प्रमुख पदाधिकारीही या मोहिमेत सहभागी झाले. शनिवारी उद्धव ठाकरेंनी शरयु नदीतीरी आरती करतेवेळी जिल्ह्यातील मंदिरांतही शिवसैनिकांनी आरतीचा गजर केला. 

तिकडे अयोध्येला गेलेल्या सरदारांकडून तेथील फोटो सोशल मिडीयावर टाकले जात असतानाच माजी शहरप्रमुख, पक्षाचे बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहिलेले आणि सध्या विधानसभाप्रमुखपदाची जबाबदारी असलेल्या सुदर्शन धांडे यांनी "अखेरचा जय महाराष्ट्र' म्हणण्याबरोबच " शिवसैनिकांनो सावधान सावकारकीसाठी स्वत:चा वापर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा' अशी पोस्ट टाकून पक्षांतर्गत खदखदीला वाचा फोडली. त्यानंतर सुदर्शन धांडे यांच्यासह पक्षाचे माजी पंचायत समिती सभापती, माजी उपजिल्हा प्रमुख आणि सध्या जिल्हा समन्वयक असलेले नारायण काशिद, नवनाथ प्रभाळे यांच्यासह इतरही काही शिलेदारांनी आपल्या समर्थकांसह रविवारी शिवसंग्रामचे झेंडे हाती घेतले. 

सुदर्शन धांडे यांचे वडिल दिवंगत शिवाजीराव धांडे यांनी नगराध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. तर, नारायण काशिद व नवनाथ प्रभाळे या दोघांचा ग्रामीण भागात बऱ्यापैकी राबता आहे. एकिकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देऊन लोकसभेसह सहाही मतदार संघात पक्षाचा झेंडा फडकविण्याचा विश्वास व्यक्त केलेला असताना होमपिच असलेल्या बीडमध्येच पक्षाला अशी गळती लागल्याने हे स्वप्न कसे पुर्ण होणार असा प्रश्न आहे. दरम्यान, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी या शिलेदारांना गळाला लावत मतदार संघात ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 

संबंधित लेख