Shivraj Patil Chakurkar explains how politics actually works | Sarkarnama

पंतप्रधान व्हायचेय असे जाहीर केले की विरोधक निवडणुकीत पाडायच्या तयारीला लागतात -चाकूरकर

सुशांत सांगवे
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हायचे, असे जाहीर केले की काही लोक तिकीट मिळू नये यासाठी तर काही लोक तिकीट मिळल्यानंतर 'हा निवडून येऊ नये' यासाठी प्रयत्न करतील...

लातूर : "पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हायचे, असे जाहीर केले की काही लोक तिकीट मिळू नये यासाठी तर काही लोक तिकीट मिळल्यानंतर 'हा निवडून येऊ नये' यासाठी प्रयत्न करतील..." अशा शब्दांत पडद्यामागचे गुपित माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी उघडपणे सांगितले.

या पदांपेक्षा मला जनतेचे, माझ्या पक्षाचे, विरोधकांचे प्रचंड प्रेम मिळाले. न मागता वेगवेगळी राजकीय पदे मिळाली. यात मी समाधानी आहे. इथून पुढेही कुठल्याही पदाचे मागणे नाही, असेही ते म्हणाले.

लातूरातील नवनिर्माण प्रतिष्ठानच्या नवनिर्माण व्याख्यानमालेची सुरवात पाटील यांच्या मुलाखतीने झाली. 'माझा कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक जीवनप्रवास' असा मुलाखतीचा विषय होता. पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हायची संधी आपल्याला मिळेल का, या प्रश्नावर त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.

पाटील म्हणाले, "माझ्या आयुष्यात सगळे काही सहज घडले. अडचणी आल्या नाहीत. कोणाचा त्रास झाला नाही. उलट मदतच झाली. त्यामुळे नगर परिषदेत अध्यक्ष झालो. पुढे विधानसभेत, लोकसभेत काम करण्याची संधी मिळाली."

" इंदिरा गांधींनी त्यावेळी शिकलेल्या तरुणांना संधी द्यायचे ठरवलेले होते. त्या धोरणानुसार मला पक्षात वेगवेगळी पदे मिळाली. एकेदिवशी मला सभागृहात अचानक अर्थसंकल्पावर आणि सुरक्षेवर भाषण करावे लागले. ते इंदिराजींनी ऐकले. त्यानंतर त्यांनी मला कायम स्वातंत्र्य दिले. त्या माझ्यासाठी आईच होत्या. मुलासारखं वागवायच्या."

"नरसिंहराव आणि अटलबिहारी वाजपेयी हे एका सभागृहात असूनही त्यांनी एकमेकांविरोधात कधी काही बोलले नाहीत, अशी आठवण सांगून पाटील यांनी सभागृहात पूर्वी गोंधळ व्हायचा, आजही होतो; पण आजच्या अनेक लोकांना 'आपण गोंधळ नाही घातला तर अँक्टिव्ह आहोत', असे वाटत नाही, "अशी टिपण्णीही त्यांनी या वेळी केली.

संबंधित लेख