shivendrasinhraje | Sarkarnama

बॅंकेच्या कटकटीतून शिवेंद्रसिंहराजे "रिलॅक्‍स'! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

अजिंक्‍यतारा बॅंक व महिला बॅंक ही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती. अजिंक्‍यतारा बॅंक अडचणीत आल्याने ठेवींचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला
होता. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर तीव्र स्वरूपाची टीका होत होती. आता मात्र ही कटकट संपण्याच्या मार्गावर आहे. 

सातारा : अजिंक्‍यतारा सहकारी बॅंक व अजिंक्‍यतारा महिला सहकारी बॅंक या दोन्ही बॅंका कऱ्हाड अर्बन बॅंकेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अडचणीतील या संस्थांच्या विलीनीकरणाचा निर्णय झाल्याने सातारा तालुक्‍यातील ठेवीदारांचा प्रश्‍न सुटला आहे. त्यासोबतच सातारा-जावलीचे आमदार
शिवेंद्रसिंहराजेंवरील ताणही कमी झाला आहे. 

कर्जाची थकबाकी वाढल्याने अजिंक्‍यतारा सहकारी बॅंक अडचणीत आली होती. एनपीए वाढल्याने थकीत कर्जासाठी जास्त तरतूद करावी लागल्याने या बॅंकेतील ठेवींचे मूल्यांकन कमी झाले. पर्यायाने रिझर्व्ह बॅंकेने अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेवर निर्बंध आणले. त्यानंतर बॅंकेतील ठेवीदारांचा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला. सर्वाधिक ठेवीदार सातारा तालुक्‍यातील असल्याने ही बॅंक विलीनीकरणाचा पर्याय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापुढे होता. अडचणीतील बॅंक विलीन करून घेण्यास बॅंका सहजासहजी तयार होत नाहीत. पण कऱ्हाड अर्बन बॅंकेने तयारी दर्शविली. पण त्यांनी एक अडचणीतील बॅंक विलीन करून घेताना दुसरी चांगली चाललेली अजिंक्‍यतारा महिला सहकारी बॅंकही विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. चांगली चाललेली महिला सहकारी बॅंक विलीन करण्याच्या मनःस्थितीत आमदार शिवेंद्रसिंहराजे नव्हते. पण कऱ्हाड अर्बनच्या या दोन्ही संस्था विलीन करण्याच्या प्रस्तावास रिझर्व्ह बॅंक व सहकार खात्याने मंजूरी दिली. कऱ्हाड अर्बन बॅंकेला या दोन्ही बॅंकांच्या 13 शाखा मिळतील. त्यामुळे कऱ्हाड अर्बनच्या 61 शाखा होतील. यासंदर्भात कऱ्हाड अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी काल कऱ्हाडमध्ये
याबाबतची घोषणा केली. या निर्णयामुळे सातारा तालुक्‍यातील या बॅंकेचे ठेवीदार व खातेदारांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 

संबंधित लेख