मी महाराज, तेरावा वंशज असे दाखवून उदयनराजेंकडून गळचेपी : शिवेंद्रसिंहराजेंची तोफ

साताऱ्यातील गणेश विसर्जनाचा मुद्दा गाजतो आहे. खासदार उदयनराजे यांनी मंडळांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे सांगत प्रशासनाचे पर्याय धुडकावले. आता या विरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदारदुटप्पी वागत असल्याचा आरोप केला. कल्पनाराजे आणि खासदार या दोघांमुळेच विसर्जनाचा प्रश्न चिघळल्याची टीका त्यांनी केली.
मी महाराज, तेरावा वंशज असे दाखवून उदयनराजेंकडून गळचेपी : शिवेंद्रसिंहराजेंची तोफ

सातारा : राजमाता कल्पनाराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामुळेच साताऱ्यातील गणेश विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  राजघराण्याविषयी असलेल्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन मी महाराज, मी तेरावा वंशज असे दाखवून खासदार लोकांची गळचेपी करत आहेत. त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागायला हवी आणि गणेश भक्तांच्या भावनांशी खेळणे थांबावे, अशी टीका साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

खासदार उदयनराजेंनी गणेश मूर्ती विसर्जनाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे गणेश मंडळे आणि सातारकर कसे अडचणीत आले आहेत, याबाबतची माहिती देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्‍न सोडविणे ही पालिकेची जबाबदारी असताना त्यांना ते जमले नाही. पण जिल्हाधिकाऱ्यांनी यातून मार्ग काढून सर्वांच्या भावना लक्षात घेऊन मध्यवर्ती ठिकाणी बुधवार नाक्‍याजवळ कृत्रिम तळे काढण्यास सुरवात केली आहे. त्याबद्दल मी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचे साताकरांच्यावतीने आभार मानतो, त्यांनी लोकांची गैरसोय होऊन दिली नाही.

मुळात हा प्रश्‍न निर्माण झाला, तो खासदार व त्यांच्या आईसाहेबांमुळेच. राजमाता कल्पनाराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघांनी जिल्हा प्रशासनाला जे पत्र दिले आहे. त्यामध्ये मंगळवार तळ्यात गणेश विसर्जन करून देऊ नये, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे खासदार आमच्या मालकीचे तळे असून येथेच विसर्जन होणार असे म्हणत आहेत. या पत्रांबाबत त्यांनी सातारकरांना स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

सप्टेंबर 2015 मध्ये उदयनराजेंच्या स्वीकृत नगरसेविका हेमांगी जोशी यांनी दिलेल्या विनंती पत्रात मंगळवार तळे खासगी मिळकत असली तरी सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन तळ्याची दुरूस्ती व पाण्याचा योग्य वापर करण्याबरोबरच तळ्यात कसल्याही विसर्जनास प्रतिबंद करावे, अशी सूचना केली होती. एकीकडे हे तळे खासदार माझ्या मालकीचे म्हणतात आणि दुसरीकडे नगरसेविका असे पत्र देतात. हा त्यांचा दुटप्पीपणाच आहे. केवळ दंडेलशाही आणि मी म्हणेल तसे झाले पाहिजे, यातूनच हे पत्र त्यांनी दिले आहे. आज जो गणेश विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो खासदार उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यामुळे झाला आहे. दोन्ही पत्राबाबत खासदारांनी स्पष्टीकरण द्यावे, तुम्ही गणेश भक्तांच्या भावनांशी खेळत आहात. तुमच्या हातात काही राहिलेले नाही, म्हणून ते आता जिल्हा प्रशासनावर सर्व काही ढकलत आहेत. घराण्याविषयी असलेल्या प्रेमाचा किती गैरफायदा घ्यायचा, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे.

मी महाराज, मी तेरावा वंशज असे दाखवून खासदार लोकांची गळचेपी करत आहेत. त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागायला हवी. सातारकरांना काय खरे काय खोटे हे एकदा कळू देत. त्यासाठी त्यांनी दोन्ही पत्रांचे स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com