shivendraraje on karjmafi | Sarkarnama

चावडी वाचनातून शेतकऱ्यांची बदनामी : शिवेंद्रसिंहराजे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

सातारा : कृषी कर्जमाफी योजनेतील बोगस कर्जदार पडताळणीसाठी शासनाने एक नवा अध्यादेश काढला आहे. कर्जदारयादीचे गावात चावडी वाचन केले जाणार असून एकप्रकारे कर्जदारांच्या नावे दवंडी पिटली जाणार आहे. या निर्णयामुळे आधीच कर्जाच्या खायीत बुडालेल्या शेतकऱ्यांच्या अब्रूची लख्तरे वेशीवर टांगली जाणार आहेत. शासनाने शेतकऱ्यांची चालवलेली क्रुर थट्टा थांबवून हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी साताऱ्याचे आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. 

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले की, शासनाने कृषी कर्जमाफी योजनेतील बोगस व चुकीच्या पध्दतीने कर्जमाफी मिळवणारे लोक शोधण्यासाठी चावडी वाचनाचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे, अशा लोकांच्या नावाची यादी त्या- त्या गावातील चावडीवर वाचली जाणार आहे. चावडी वाचन म्हणजेच नावे पुकारली जाणार याचाच अर्थ दवंडी पिटली जाणार. वास्ताविक आज डिजीटलचा जमाना आहे. बोगस आणि चुकीच्या पध्दतीने कर्जमाफी मिळवणाऱ्यांची नावे शासनाला ऑनलाइन पध्दतीने, बॅंका, सहकार खाते, सहकार आयुक्‍त यांच्याकडून समजू शकतात. कोणालाही चुकीच्या पध्दतीने कर्ज माफी मिळू नये. बोगस कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ होवू नये, यामध्ये कोणाचेही दुमत नाही. मात्र, शासनाने बोगस कर्जदार शोधण्यासाठी चुकीच्या पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यातून शेतकऱ्यांची बदनामी होणार आहे. 

सध्या ऑनलाइनचा जमाना असून बहुतांश सर्वच बॅंकांनी केवायसी प्रक्रीया पूर्ण केलेली आहे. तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड जोडणी बंधनकारकाली आहे. त्यामुळे जे कोण बोगस कर्जदार असतील, ज्यांनी चुकीच्या पध्दतीने कर्जमाफीचा लाभ घेतला असेल त्यांचा शोध संबंधीत बॅंका, सहकार विभाग किंवा सहकार आयुक्‍त यांच्यामार्फत घेतला जाऊ शकतो. परंतु शासनाने गावात दवंडी पिटवून कर्जदार बोगस आहे का, खरा आहे. हे शोधून काढण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी, पिचलेल्या शेतकऱ्यांची त्यांच्याच गावात जाही बदनामी होणार आहे. हा चुकीचा पायंडा शासन पाडत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरणाऱ्या सरकारने चावडी वाचनाद्वारे शेतकऱ्यांची कुचेष्टा न करता तातडीने हा निर्णय बदलावा. बोगस कर्जदार शोधण्यासाठी ऑनलाइन पध्दतीचा अवलंब करावा, असे त्यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख