Shivendra Raje Vs Udayan Raje, verbal battle continues | Sarkarnama

खासदारांचे काम जागा मोकळी करून देण्याचे आहे का ? शिवेंद्रसिंहराजेंची उदयनराजेंवर टीका 

उमेश बांबरे 
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

माझ्यावर अन्याय होईपर्यंत मी गप्प बसत नाही. अन्याय होईपर्यंत मी तोंडाकडे बघत बसत नाही. मुळात शांत बसणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. माझ्यावरील अन्यायाची त्यांनी काळजी करू नये.

सातारा : " खासदारांनी तत्वे व राजघराण्याची भाषा सांगताना त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील सर्व देशी दारूची दुकाने बंद करण्याची मोहीम हाती घ्यावी व आपली तत्वे दाखवून द्यावीत," असे प्रतिआव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांना दिले.

खासदार उदयनराजे यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, "लोकप्रतिनिधींनी खरे बोलावे.  दारू दुकानाची खुंटाळेची जागा  दंडेलशाही करून मोकळी करून द्यायची हा खासदार व त्यांच्या समर्थकांचा  नियोजित प्लॅन होता. केवळ आम्ही सर्व तेथे आलो म्हणून हा त्यांचा हा प्लॅन फिस्कटला.
खासदारांनी  त्यांच्या मतदारसंघातील सर्व देशी दारूची दुकाने बंद करण्याची मोहीम हाती घ्यावी . व आपली तत्वे दाखवून द्यावीत. केवळ रवी ढोणेच्या दुकानापूरती तत्वे आणि तत्वाची भाषा करू नये कारण ते खोटे बोलण्यासारखे होतेय. "

श्री . शिवेंद्रराजे पुढे म्हणाले ,"दुकानाचा विषय अनेक दिवसांपासून सुरू आहे. 1972 सलापासून हे दुकान तेथे आहे. पालिकेचे आरक्षण हे रवी ढोणेच्या दुकानापूरते नाही.  जुना मोटरस्टँडच्या जागेवर वाहनतळाचे आरक्षण आहे. हे दुकान अतिक्रमण नसून खाजगी मिळकत आहे. येथे अतिक्रमण नाही. सगळ्या गोष्टीला यंत्रणा आहे. कोर्ट किंवा शासन यांचा आदेश असेल तरच तर तुम्ही कारवाई करू शकता पण केवळ आपल्या बागलबच्चसाठी हे सर्व करायचे त्याला माझा विरोध आहे. "

"आज रवी ढोणे यांच्यावर वेळ आली. उद्या यांच्याकडे आणखी कोणी जाईल आणि जागा खाली करून घ्या, असे सांगेल. खासदारांचे  काम जागा मोकळी करून देण्याचे आहे का ", असा प्रश्न करून शिवेंद्रराजे  म्हणाले, " कलेक्टर आहेत नगरपालिका आहेत. उच्च न्यायालयाचा स्टे असताना कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत. खासदार म्हणतात, किती वेळा कोर्टात जायचे. कोर्टाच्या पायऱ्या कोण चढायला लावतय? "

" सुरुची राडा,  टोलनाका झाला आता मला सर्वांना सांगायचे आहे, मी जलमंदिरकडे गेलो नव्हतो मी माझ्या सुरुची या घरत होतो. उदयनराजे माझ्या घराकडे आले होते. उद्या कोणी ही यावे आणि दंगा करून जावे. त्यावेळी आम्ही विरोध केला. प्रत्येकाला आपले घर प्रिय असते, खासदर स्वतः माझ्या घरात आले होते. त्यावेळी त्यांचा प्लॅन फसला. कोणीही यावे आणि दंगा करून जावे आणि मी गप्प बसावे, असे होणार नाही.  एसपी साहेब यांनी आम्हाला शांत राहा असे सांगितले होते. त्यानुसार मी आणि माझे कार्यकर्ते माझ्या कार्यालयात गप्प शांत बसलो होतो. खासदार व त्यांचे कार्यकर्ते तेथे आले होते,"असेही शिवेंद्रराजे म्हणाले . 

" त्यादिवशीही दारू दुकानाबाबत ही खासदारच तेथे आले होते. त्यामूळे मी तेथे आलो होतो. तणाव निर्माण यांनीच करायचा आणि कोर्टाच्या पायऱ्या किती चढाव्यात हेही त्यांनीच सांगायचे हे सर्व गमतीशीर प्रकार आहेत. त्यांनी दारुदुकाने मोकळी करून देण्यापेक्ष्या मतदारसंघात लक्ष घालून तेथील प्रश्न सोडवावेत. दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्यावे, पालिकेत लक्ष घालावे. " असा उपरोधिक सल्ला देखील र्त्यांनी दिला . 

उदयनराजेंवर थेट टीका  करताना ते म्हणाले ," तत्व व घराणे सांगत असाल तर त्यांच्या मतदारसंघातील सगळी देशी दारू दुकाने बंद पडण्याची मोहीम उदयनराजेंनी  सुरुवात करावी, मग तत्वे सांगावी. उदयनराजे म्हणतात की माझ्यावरील अन्याय मी सहन करणार नाही. मुळात माझ्यावर अन्याय होईपर्यंत मी गप्प बसत नाही. अन्याय होईपर्यंत मी तोंडाकडे बघत बसत नाही. मुळात शांत बसणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. माझ्यावरील अन्यायाची त्यांनी काळजी करू नये. त्यांनी मतदारसंघात लक्ष घालावे. " 

संबंधित लेख