shivendra raje bhosale and police | Sarkarnama

खासदारांच्या दहशतीखाली पोलिसांची एकतर्फी कारवाई - शिवेंद्रसिंहराजे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

उदयनराजेंची पोलिसांवर दहशत असून पोलिस खातं त्यांच्या पूर्णपणे अंमलाखाली काम करते, असा आरोप करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आता आमचं एकच म्हणणं आहे, उदयनराजेंनाच एसपी आणि अजिंक्‍य मोहितेला डीवायएसपी करा. म्हणजे त्यांना सर्व अधिकार मिळतील. जो आपला आहे, त्याला ऑल इज वेल आणि दुसऱ्याचा आहे त्याला ते शुट आऊट करतील! 

सातारा : सुरूची बंगल्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या हल्लाप्रकरणात पोलिसांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या दहशतीखाली उलट आमच्याच कार्यकर्त्यांवर कारवाई केली. उद्या (रविवार) पर्यंत पोलिसांच्या भूमिकेत योग्य बदल न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असे स्पष्ट करून पोलिस अधिकाऱ्यांच्या एकतर्फी भूमिकेविरोधात आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात हक्कभंग दाखल करणार आहोत, असा इशारा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. 

टोलनाक्‍याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आज सातारा शहरात तणावपूर्ण शांतता होती. दुपारी शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे समर्थक सुरूची बंगल्यावर जमले. तेथे त्यांनी पोलिसांच्या एकतर्फी कारवाईच्या विरोधात पोलिस अधीक्षक कार्यालयावर जाऊन सर्वांना अटक करा, अशी भुमिका घ्यायचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी शिष्टाई केल्याने शिवेंद्रसिंहराजेंनी आपला निर्णय एक दिवसासाठी स्थगित केला. तसेच खासदारांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईसाठी उद्या (रविवार) पर्यंतची मुदत दिली. यानंतर शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, पोलिसांची कारवाई एकतर्फी दिसते. आमच्या चार कार्यकर्त्यांना तर खासदार गटाच्या पंकज चव्हाण याला पोलिसांनी पकडून नेले आणि पहाटे सोडून दिले. पोलिस निरीक्षक धुमाळ यांच्या फिर्यादीत संशयित म्हणून नाव असलेल्या पंकज चव्हाणला पोलिसांनी सोडून कसे दिले, याचे आर्श्‍चय वाटते. पहाटे तीन-चारपर्यंत काही लोकांनी फोन करुन त्याला सोडा म्हणून पोलिसांवर दबाव आणला. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले. पोलिसांची या प्रश्‍नी भूमिका एकतर्फी आहे. सुरूची हे माझे घर आहे, माझ्या घरात कोणी येऊन अर्व्वाच शिव्या देत गोळ्या घालीन, अशी दमाची भाषा वापरली तर आम्ही गप्प बसायचे का? षंढ असल्याची भूमिका आम्ही घ्यायची का? गाड्या फुटल्या, संषर्घ झाला, वातावरण तंग झाले. सगळं मान्य, झालं हे चुकीचे आहे. त्यांना आम्ही काय निमंत्रण दिले नव्हते. उलट पोलिसांचे ऐकूण आम्ही शासकीय विश्रामगृहात जाऊन थांबलो. माझ्या सहकाऱ्यांना मी शांत राहण्याचे आवाहन केले. पोलिसांचा मान ठेऊन सर्वांनी घरी जावे, असे कार्यक़र्त्यांना सांगितले. असे असताना सुद्धा पोलिसांनी खासदारांना आडवले नाही. पोलिसांनी असे सांगितले की खासदारांनी दोन ठिकाणची बॅरिकेट फेकून दिले. डीवाएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यास ढकलून दिले आणि थेट आमच्या सुरूची निवासस्थानी आले. पोलिसांचे नेमकं चाललयं काय? आम्ही पोलिसांचे ऐकतो म्हणून सगळं आम्हालाच सांगायचं आणि जे जुमानत नाहीत, त्यांना काहीच करायचे नाही, ही कोणती रित. पोलिसांची ही भूमिका आम्ही इथून पुढे खपवून घेणार नाही. मी पण आमदार आहे मलाही काही अधिकार आहेत. माझ्या घरात येऊन घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात पोलिस यंत्रणेनी जी ढिलाई दाखवली आहे. त्याबद्दल मी हक्कभंग दाखल करण्याची तयारी ठेवली आहे. जे पोलिस या प्रकरणाला जबाबदार आहेत, त्या सर्वांवर मी अधिवेशनाच्या काळात हक्‍कभंग दाखल करणार आहे. माझ्याच घरावर हल्ला होतो आणि माझ्याच्या कार्यक़र्त्यांवर कारवाई केली जाते. आमच्या बंगल्यात ते घुसले. तिथे फायरींग झाले, आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते, हे सिसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आम्ही घरात बसलो होतो, तसेच बाहेर आलो. खासदारांनी मुळात आमच्या बंगल्यावर येण्याचे कारण नव्हते. त्यांना काही आमचे निमंत्रण नव्हते. 10 ते 15 गाड्या घेऊन सत्यनारायण पुजेला या असे काही बोलावले नव्हते. आमच्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. प्रसारमाध्यमातून शिवेंद्रसिंहराजे राजे व इतर 200 जणांवर गुन्हा दाखल केल्याचे समजले. आत्ता आम्ही 200 कार्यक़र्ते सुरुचीवर आहोत, आम्ही सगळ्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन स्वत:ची अटक करवून घेण्याची भूमिका घेतली होती. तथापि, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करत आम्हाला असं काहीही करु नये असे सांगितले. त्यांच्या विनंतीनुसार आम्ही त्यांना एक संधी दिली आहे. पुढील कारवाई त्यांनी योग्य रितीने करावी. 
पोलिस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपअधीक्षक यांच्याकडून एकतर्फी सुरू असलेली कारवाई थांबली पाहिजे. अन्यथा आम्ही पुढची स्टेप घेऊन. त्याकरिता रस्त्यावर उतरू. मग जमाव बंदी आदेशाचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. उदयनराजे असो, त्यांची आई असो अगर कोणीही असो माझ्या घरावर चाल करुन आल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्याची धमक माझ्यात आहे, हे मी दाखवून दिले आहे. आता वातावरण निवळायचे असेल तर पोलिसांनी योग्य कारवाई करावी. 
टोलनाक्‍याचा वाद तापत असल्याचे माहिती असूनही पोलिसांनी जादा कुमक मागवली नाही. पोलिसांचे हे अपयशच म्हणावे लागेल. वरिष्ठ पोलिस अधिकारी सक्षम नाहीत. 

टोलनाक्‍यातून गुंड पोसण्याचे काम.... 
टोल नाका माझ्याकडे कधीच नव्हता. तो रिलायन्सचा आहे, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कऱ्हाडचे संजय पाटील आहेत, त्यांना तो देण्यात आला होता. जुनं व्यवस्थापन हे टोलनाक्‍याच्या माध्यमातून हप्ते वसूल करुन ती खासदारांपर्यंत जात होती. मी हे वेळोवेळी बोललो होतो. या माध्यमातून गुंड पोसण्याचे काम सुरू होते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. रियलायन्सने व्यवस्थापन बदलण्याची निर्णय घेतला. त्यावेळी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने त्यांना मदत करायला हवी होती. व्यवस्थापन माझे आणि टोलनाकाही माझाच, हा अट्टाहास कशासाठी याचे उत्तरच मिळत नाही. नवीन व्यवस्थापनाने पत्र देऊन जुन्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे भूमिपूत्रांचा प्रश्‍न संपला होता. तरीही टोलनाका माझ्याकडेच पाहिजे, हा अट्टाहास कशासाठी? 30 हजार एकर जमीन असलेल्या उदयनराजेंना 4-5 लाख रुपये खंडणी मागण्याची काय जरुरी असे त्यांचे कार्यकर्ते सोशल मिडीयावर पोस्ट फिरवतात. मला त्यांना विचारायचे आहे, की 30 हजार एकर जमीन असलेल्या व्यक्तिला स्वत:च्या कार्यकर्त्यांसाठी टोलनाका कशाला हवा? एवढी जमिन असणाऱ्याने टोलनाक्‍यासाठी आटापिटा करणे चुकीचे आहे. ही काय अलीबाबाची गुहा आहे का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 
त्यांनाच एसपी करा... 
उदयनराजेंची पोलिसांवर दहशत असून पोलिस खातं त्यांच्या पूर्णपणे अंमलाखाली काम करते, असा आरोप करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आता आमचं एकच म्हणणं आहे, उदयनराजेंनाच एसपी आणि अजिंक्‍य मोहितेला डीवायएसपी करा. म्हणजे त्यांना सर्व अधिकार मिळतील. जो आपला आहे, त्याला ऑल इज वेल आणि दुसऱ्याचा आहे त्याला ते शुट आऊट करतील! 

संबंधित लेख