Shivena MLA Manhadles power company Superwiser | Sarkarnama

वरोऱ्याच्या सेना आमदाराची अरेरावी, कर्मचाऱ्याला मारहाण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

जमीनीच्या मोबदल्यावरून शिवसेना आमदार सुरेश धानोरकर (वरोरा जि. चंद्रपूर) यांनी राजुरा तालुक्‍यात एका कंपनीच्या सुपरवायझरला मारहाण केली. आमदाराच्या या रुद्रावताराने कंपनीच्या उर्वरित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाहून पळ काढला.

नागपूर : जमीनीच्या मोबदल्यावरून शिवसेना आमदार सुरेश धानोरकर (वरोरा जि. चंद्रपूर) यांनी राजुरा तालुक्‍यात एका कंपनीच्या सुपरवायझरला मारहाण केली. आमदाराच्या या रुद्रावताराने कंपनीच्या उर्वरित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाहून पळ काढला.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍यातील भुरकुंडा येथे उच्च दाबाचे वीज मनोरे उभारले जात आहेत. पॉवरग्रीडतर्फे तेलंगणातून महाराष्ट्रात वीज आणण्यासाठी हे मनोरे उभारले जात आहेत. भूसंपादन कायद्याप्रमाणे मनोरे उभारण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो. तसेच त्यासाठी शेतकऱ्याची पूर्वपरवानगी घेण्याची गरज आहे. पॉवरग्रीडच्या कर्मचाऱ्यांनी मात्र थेट शेतकऱ्याच्या मनोरे उभारण्याचे काम सुरू केले. शेतकऱ्याने याची माहिती आमदार धानोरकर यांना दिली. आमदार धानोरकर वरोरा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते थेट राजुरा येथे पोहोचले. भुरकुंडा येथे जाऊन आमदार धानोरकर यांनी शेतकऱ्याची भेट घेतली.

घटनास्थळी जाऊन आमदार धानोरकर यांनी कर्मचाऱ्याचा समाचार घेतला. कर्मचाऱ्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने आमदार धानोरकर यांनी तेथील सुपरवायझरला मारण्यास सुरू केली. आमदाराचा हा रुद्रावतार पाहून तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी पळ काढला. शेतकऱ्याला मोबदला मिळेपर्यंत मनोरे उभारण्याचे काम होऊ देणार नसल्याचा इशारा आमदार धानोरकर यांनी दिला. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. परंतु, पोलिसांनी आमदारांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही.

संबंधित लेख