शिवसेना-भाजप डोकावताहेत परस्परांच्या लोकसभा मतदारसंघात ! 

शिवसेना-भाजप डोकावताहेत परस्परांच्या लोकसभा मतदारसंघात ! 

मुंबई : परस्परांवर आरोपप्रत्यारोपात रमलेल्या भाजप शिवसेनेला एकत्र लढण्याची अद्याप आस असली तरी मुंबईतील मतदारसंघात पर्यायी उमेदवारांचा शोध घेणे सुरू झाले आहे. लोकसभेत एकत्र असणे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांना उचित वाटत असले तरी युती झाली नाही तर नावे निश्‍चित करण्याचे धोरण सध्या स्वीकारण्यात आले आहे. 

शिवसेनेला याबाबत नावांचा शोध घ्यावा लागतो आहे,भाजपकडे मात्र नावांचे पर्याय उपलब्ध असल्याचे सध्या तरी चित्र आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मतदारसंघात मंगलप्रभात लोढा, गजानन किर्तीकर यांच्या मतदारसंघात परेश रावल किंवा विद्या जयप्रकाश ठाकूर यांच्या पर्यायांचा विचार केला जात असून शिवसेनेनेही किरीट सोमैया यांच्या विरोधात शिशिर शिंदे, पूनम महाजन यांच्या मतदारसंघात डॉ. दीपक सावंत किंवा महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर तर गोपाळ शेटटी यांच्या विरोधात विनोद घोसाळकर यांच्या उमेदवारीची चाचपणी सुरू केली आहे. 

मोदी लाटेत हातून गेलेल्या सहाच्या सहा जागा परत मिळवण्यासाठी कॉंग्रेसही कामाला लागली असून महारूख गुरुदास कामत, कृपाशंकरसिंह, राज बब्बर अशी नवी नावे उमेदवार म्हणून चर्चेत येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने संजय दीना पाटील यांच्याऐवजी नवाब मलिक किंवा सचिन अहिर यांना रिंगणात उतरवण्याचा विचार सुरू केला आहे. 
मुंबईतील मतदारांचा बदलता चेहरा भाजपला अचूकपणे समजला असे सध्या मानले जाते आहे. 

आशीष शेलार यांनी महापालिका निवडणुकीत अमराठी मतांची मोट बांधत शिवसेनेला आव्हान दिले. निम्न आणि मध्यमवर्गीय मराठी उमेदवार शिवसेनेला आजही समर्थन देईल असे मानले जात असल्याने सेना भाजप परस्परांसमोर उभे राहिल्यास भाषक आधारावर मतविभाजन होण्याची शक्‍यता आहे. लोकसभेत महाराष्ट्राने गेल्या वेळी नोंदवलेली संख्या कायम रहावी यासाठी शिवसेनेशी जुळते ठेवण्याचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील साहचर्य लक्षात घेता युती कुरबुरी ओलांडुन सत्तेत एक़त्र असली तरी भाजपसमोर अस्तित्व टिकवायचे असेल तर स्वबळावर लढणे हाच पर्याय उचित असल्याचे शिवसेनेत बोलले जाते. 

युवानेते आदित्य ठाकरे यांच्या मतानुसार युतीचा निर्णय होईल असेही सांगण्यात येते. शिवसेनेने मतदारसंघश: बैठका सुरू केल्या असून किरीट सोमैया यांच्या उत्तर पूर्व मतदारसंघात शिशिर शिंदे यांना उतरवण्याचा विचार सुरू आहे. सोमैया यांना दलित मतांचे विभाजन मदत करते . सोमैया यांच्या विरोधातील नाराजी आम्हाला उपयोगी ठरेल असे सेनेतील काही नेत्यांचे मत आहे. 

उत्तर पश्‍चिम मतदारसंघ गुरूदास कामत यांच्या निधनामुळे कॉंग्रेसमध्ये इच्छुकांचे मनपसंत ठिकाण झाला आहे. उत्तरप्रदेशात तेथील माजी कॉंग्रेस प्रदेशअध्यक्ष राज बब्बर यांना सुरक्षित मतदारसंघ नसल्याने त्यांना या मतदारसंघात रस आहे. मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनीही या मतदारसंघात लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते स्थानीय लोकाधिकार समितीचे सर्वेसर्वा गजानन किर्तीकर यांची खासदारकीची उमेदवारी कायम ठेवून शिवसेना वेगळी लढल्यास भाजपतर्फे या मतदारसंघातून परेश रावळ यांचे नाव समोर येण्याची शक्‍यता आहे. 

रावळ यांना गुजरातऐवजी मुंबईतून लढण्याची इच्छा असल्याचे समजते. राज्यमंत्री विद्या ठाकूर किंवा त्यांचे पती ज्येष्ठ कार्यकर्ते जयप्रकाश ठाकूर यांचाही या मतदारसंघासाठी विचार सुरू आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी या लोकसभा मतदारसंघातून लढावे असे ठराव काही वॉर्डानी केले आहेत. मुंबईच्या राजकारणात एक शक्‍तीस्थान झालेले शेलार दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात राहुल शेवाळे यांच्यासमोर उभे राहतील अशी भीती विरोधी वर्तुळाला आहे. 

माहिम भागात त्यांचे फलक आजकाल सातत्याने लावले जात आहेत. रिपब्लिकन नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही या मतदारसंघात नशीब अजमावण्याची तयारी दाखवली आहे.भाजपसेनेने आपल्याला संयुक्‍तपणे पाठिंबा द्यावा असे त्यांनी जाहीरपणे नमूद केले आहे. 

भाजप शिवसेनेची अंतिमत: युती होईल असे वाटत असल्याने कॉंग्रेस वर्तुळात निवडणूक लढवण्यास उत्सुक नसलेल्यांची यादी वाढते आहे. उत्तर मध्य मुंबईत लोकप्रिय असलेल्या प्रिया दत्त यांनी आपल्याला लढण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. तेथे कृपाशंकरसिंह यांचे नाव चर्चेत आहे मात्र कॉंग्रेसमधील एक गट ते कधीही भाजपत प्रवेश करतील असे मानतो. 

कामत यांची एक्‍झिट झाल्याने त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. श्रीमती महारूख किंवा त्यांचा पुत्र डॉ. सुनील दोघेही अद्याप सावरलेले नाहीत, मात्र ही जागा निरूपम यांना मिळू नये याबाबत कामत गट ठाम आहे. पार्ले परिसरात कामत यांच्या शोकसभेला झालेली गर्दी त्यांच्या लोकप्रियतेचे उदाहरण मानली जाते. दक्षिण मुंबई या एकमेव लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडे मिलिंद देवरा हे उमेदवार पुन्हा एकदा तयार झाले आहेत. 

यावेळी निवडून येण्याबददल त्यांना विश्‍वास आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस मुंबईत एक जागा लढवते.तेथे संजय दिना पाटील यांना पुन्हा उमेदवारी न देता पक्षाचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. पाटील मलिक या दोन गटात बराच तणाव आहे. मलिक अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते तसेच लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे अल्पसंख्यांक जवळ येतील असे पक्षात मानले जाते. गणपतीउत्सवात हे सर्व संभाव्य उमेदवार संपर्क वाढवतील .मुंबईचे रणांगण यावेळी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com