शिवदीप लांडे यांच्या नगर एसपी म्हणून नियुक्तीला नातेसंबंधांचा अडसर

शिवदीप लांडे यांच्या नगर एसपी म्हणून नियुक्तीला नातेसंबंधांचा अडसर

पुणे : नगरमधील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सिंघम म्हणून ओळखले जाणारे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीची मागणी होत आहे. मात्र त्यांच्या या नियुक्तीला त्यांचे नातेसंबंध आडकाठी बनण्याची शक्यता आहे.

जलसंपदा राज्यमंत्री आणि शिवसेनेचेन नेते विजय शिवतारे यांचे लांडे हे जावई आहेत. आता शिवसेनेच्या मागणीवरून शिवसेना नेत्याचा जावई हा एसपी म्हणून नेमणे सरकारसाठी अवघड होईल, असा अंदाज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नगर येथील महापालिकेच्या पोटनिवडणुकीवरून शहरात हिंसाचार झाला. त्यात दोन शिवसैनिक ठार झाले. थेट पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करण्यात आला. राष्ट्रवादीच्या दोन आणि भाजपच्या एका आमदाराविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. नगरमधील पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेल्याने डॅशिंग पोलिस अधिकाऱयाची नियुक्ती करण्याची चर्चा त्यामुळे सुरू झाले.

या चर्चेत बिहारमधून प्रतिनियुक्तीवर आलेल्या लांडे यांचे नाव साहजिकच अग्रभागी राहिले. कारण लांडे यांनी पाटण्यामध्ये कडक कारवाई करत तेथील गुन्हेगारीला आळा घातला होता. ते तेथील तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले होते. मूळचे अकोल्याचे असलेल्या लांडे यांची महाराष्ट्रात पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. त्यांना सध्या `फिल्ड`वर ड्युटी न देता नार्कोटिक्स विभागाचे अधीक्षक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. नगरसाठी त्यांचीच नियुक्ती करण्यासाठी सोशल मिडीयात चर्चा सुरू झाली. तशीच ती वरिष्ठ पातळीवरही झाली.

नगरमधील संपूर्ण प्रकरणात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. तेथे एसपी म्हणून लांडे यांनी समजा कोणताही निर्णय घेतला तरी तो शिवसेनेच्या दबावामुळे किंवा शिवसेनेला अनुकूल घेतला गेला, असे म्हटले जाऊ शकते. त्यात ते शिवसेना नेत्याचेच जावई असल्याने लांडे यांच्यावर विनाकारण पक्षपातीपणाचाही आरोप होऊ शकतो. त्यामुळेच लांडे यांच्याऐवजी प्रशासन इतर नावांवर चर्चा करत असल्याचे सांगण्यात आले.

या नावांत नगरमध्ये या आधी अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिलेल्या आणि तेथील कोतकर कुटुंबियांच्या गुन्हेगारीचे कंबरडे मोडणाऱ्या ज्योतिप्रिया सिंह यांचेही नाव आघाडीवर आहे. इतरही काही नावे चर्चेत आहे. विद्यमान अधीक्षर रंजनकुमार शर्मा यांची खरेच बदली होणार का, हा मूळ प्रश्न आहे. सरकार त्यांना आणखी संधी देऊ शकते, असेही बोलले जाते.  

 
 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com