खेळाचे मैदान, राजकारणाचा फड ते मोसंबीची बाग : पंडितांचा प्रवास

मराठा आरक्षणासाठी आंदोलन असले वयाची ८२ वर्षे पूर्ण केलेले शिवाजीराव पंडित हातात भगवा झेंडा घेऊन तरुणांच्या पुढे असतात. शेतीत नवनवे यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता मेळावे घेऊन इतर शेतकऱ्यांनाही धडे देतात. कुटुंब आणि शेतीसाठी त्यांचा वेळ ठरलेला आहे. वयाच्या २५ व्या वर्षी राजकीय फडात उतरुन ५० वर्षे सक्रीय राजकारणात राहीलेल्या शिवाजीराव पंडित यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी स्वत:हून निवृत्ती जाहीर केली.
Shivajirao Pandit
Shivajirao Pandit

बीड : कबड्डी आणि व्हॉलीबॉलचे मैदान गाजविणाऱ्या शिवाजीराव पंडित यांना चुलते सयाजीराव पंडित यांचा विधानसभा निवडणूक प्रचार करण्यासाठी कायद्याची पदवी मिळविता आणि नाही. पण, याच निमित्ताने राजकीय फडात उतरुन त्यांनी जिल्ह्याचे राजकारण गाजविले. वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी समाजकारण आणि शेतीकारणातला त्यांचा उत्साह तरुणांना दिशादर्शक आहे. 

मराठा आरक्षणासाठी आंदोलन असले वयाची ८२ वर्षे पूर्ण केलेले शिवाजीराव पंडित हातात भगवा झेंडा घेऊन तरुणांच्या पुढे असतात. शेतीत नवनवे यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता मेळावे घेऊन इतर शेतकऱ्यांनाही धडे देतात. कुटुंब आणि शेतीसाठी त्यांचा वेळ ठरलेला आहे.  वयाच्या २५ व्या वर्षी राजकीय फडात उतरुन ५० वर्षे सक्रीय राजकारणात राहीलेल्या शिवाजीराव पंडित यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी स्वत:हून निवृत्ती जाहीर केली. 

वयाची ८२ वर्षे पूर्ण करत असलेले शिवाजीराव पंडित सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले असले तरी शेती, समाजकारण, अधात्मिक कार्यात पुढे असतात. स्वत: उत्तम शेती करणारे शिवाजीराव पंडित शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन शेतीचे धडे देऊन प्रोत्साहनही देतात. औरंगाबादला कायदा पदवीचे शिक्षण सुरु असताना त्यांचे चुलते दिवंगत सयाजीराव पंडित यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते गेवराईला आले. सयाजीराव पंडित विजयी झाल्यानंतर त्यांनी शिवाजीराव पंडित यांना जिल्हा परिषद निवडणुक लढविण्याचा आग्रह केला. 

१९६२ साली त्यांनी धोंडराई गटातून जिल्हा परिषद निवडणुक लढवून ते विजयी झाले. दहा वर्षे गेवराई पंचायत समितीचे सभापती सहा वर्षे ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहीले. त्यानंतर १९७८ ते ९५ असे तीन वेळा आमदार राहीले. दरम्यान, त्यांनी साधारण २० वर्षे जिल्हा जिल्हा परिषदेवरील आपली पकड सैल होऊ दिली नाही. दरम्यान, त्यांना मंत्रीमंडळात रोहयो, जलसंधारण, सेवा योजजना, फलोत्पादन, कृषी, ग्रामविकास आदी महत्वांच्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून कामाची सधी मिळाली. त्यांना राजकीय कारकिर्दीत पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, विद्युत मंडळाचे सदस्य, राज्य गृह वित्त महामंडळाचे संचालक अशा विविध पदांवर कामांची संधी मिळाली. 

पक्ष संघटनेत त्यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य पदांवरही त्यांनी काम केले. राजकारणात सर्वाधिक काळ त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या शिवाजीराव पंडित यांनी एस. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेतही पवारांची साथ दिली. त्यांच्या राकारणावर पवारांसह दिवंगत यशवंतराव चव्हाण, दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा प्रभाव राहीला असला तरी शिवाजीराव पंडित यांनी शेवटपर्यंत सासरे आणि मोहोळचे (सोलापूर) दिवंगत आमदार बाबूराव पाटील अनगरकर यांनाच राजकीय गुरु मानले. दरम्यान, त्यांचा राजकीय कारभार पाहणारे त्यांचे पुतणे बदामराव पंडित यांचे राजकीय बंड आणि त्यांच्याकडून झालेला पराभव हा त्यांच्या आयुष्यातील मोठा राजकीय संघर्षाचा काळ ठरला. 

विकास कामांसाठी यशस्वी पाठपुरावा
आपल्या विधिमंडळ सदस्यत्वासह विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी विविध विकास कामेही केली. बीड - परळी उच्चदाब वीज वितरण वाहीनीची उभारणी हे बीडसाठी मोठी उपलब्धी ठरली. जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला. गेवराई तालुक्यातून ७६ किलोमिटर लांबीच्या गेलेल्या कालव्यामुळे २५ हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली आली. तालुक्यात दळणवळणासाठी रस्ते, लघूसिंचन तलाव व पाझर तलावांची कामे केली. सेवा योजना मंत्री म्हणून त्यांनी सुशिक्षीत बेरोजगारांना संधी मिळावी, यासाठी जिल्हा उद्योग केंद्रांत एक खिडकी योजना सुरु करुन स्वावलंबन योजनेची अंमलबजावणी केली. कृषी राज्यमंत्री म्हणून काम करताना सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देण्याचा आणि ठिबक सिंचन योजनांना अनुदानाचा क्रांतीकारी निर्णयही या काळातच झाला. 

पण पूर्ण झाला आणि मगच घातली डोक्यावर टोपी
शिवाजीराव पंडित यांचा राजकीय कारभार करणारे पुतणे बदामराव पंडित यांनी राजकीय बंड केले आणि त्यांचा पराभवही केला. या बंडाला दिवंगत नेते अंकुशराव टोपे आणि दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचे पाठबळ होते. त्यामुळे या दोघांचा पराभव घडविल्याशिवाय डोक्यावर टोपी घालणार नाही असा पण त्यांनी केला. पक्षातीलच या दोघांचाही पराभव घडवून त्यांनी स्वत:चे पराभवाचे उट्टे काढले. केशरबाई क्षीरसागर यांचा पराभव करणाऱ्या माजी खासदार आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या कायम निमंत्रक रजनी पाटील यांनी त्यांच्या डोक्यावर चांदीची टोपी घातली. 

आरक्षण आंदोलनातले शिलेदार
वयाची ८२ वर्षे पूर्ण करत असलेले शिवाजीराव पंडित यांची बायपास सर्जरी झालेली आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन असले की त्यांना स्वस्थ बसवत नाही. ‘अरे बेट्यांनो आपल्याला आंदोलनाकडे निघायचेय लवकर या’ अशी सवंगड्यांना आरोळी ठोकतात. हाती भगवा झेंडा घेऊन धरणे, पायी मोर्चात सहभागी होतात आणि तरुणांना स्फुर्ती देण्याबरोबरच लोकशाहीने आंदोलनाचा सल्ला देतात. बहुतेक आंदोलनात त्यांचा तन - मन - धनाने सहभाग दिसला आहे. 

मैदानातले तरबेज खेळाडू
राजकीय आखाड्यात अनेक डावपेच टाकणारे शिवाजीराव पंडित खेळाच्या मैदानातही तरबेज खेळाडू होते. कबड्डी आणि व्हॉलीबालचे उ्तम खेळाडू असलेल्या शिवाजीराव पंडित यांनी राज्य संघाचे प्रतिनिधित्व करताना आंतरराज्य व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्याला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले. विद्यापीठ संघाचे नेतृत्व करतानाही त्यांनी अनेक पदके पटाकवून देणाऱ्या शिवाजीराव पंडित यांचा व्हॉलीबॉल खेळाचे राष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरव झाला. सध्याही ते महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष तर जिल्हा कबड्डी आणि व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.  

सहकार - शिक्षण चळवळीत पुढेच
राजकारणात काम करताना त्यांनी जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळांच्या माध्यमातून त्यांनी अनेक शाळा - महाविद्यालयांची उभारणी केली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्यांपैकी असलेल्या शिवाजीराव पंडित यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील एकमेव जवाहर नवोदय विद्यालय गढी (ता. गेवराई) येथे उभारले. गेवराई तालुक्यातील एकमेव जयभवानी सहकारी साखर कारखान्यासह त्यांनी माऊली सहकारी सुतगिरणी, भवानी अर्बन बँक, जयभवानी उपसा सिंचन संस्था, गोदावरी मध्यवर्ती सहकारी भांडार आदी संस्थांची उभारणी केली. 

स्वत: करतात उत्तम शेती आणि शेतकऱ्यांना देताता प्रोत्साहन
जेष्ठ चिरंजीव अमरसिंह दोन वेळा आमदार, लहान मुलगा विजयसिंह जिल्हा परिषद अध्यक्ष, जयसिंह जयभवानी कारखान्याचे अध्यक्ष अशी तिन्ही मुले राजकारण आणि समाजकारणात चांगल्या स्थानावर पोचली. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर करुन शेतीकडे लक्ष वळविले. नित्याने चार ते आठ या वेळेत ते हमखास शेतावरच भेटणार. त्यांनी विविध मोसंबी, अंबा, पेरु अशा फळबागांची लागवड केली असून त्यांनी उत्पादित केलेला अंबा मागच्या वर्षी परदेशात विक्री झाला. संकरीत गाईंचेही संगोपन ते करतात. पारंपारिक शेतीऐवजी सेंद्रीय आणि फळबागाच आता बदलत्या काळात शेतकऱ्यांना तारतील असे धडे ते शेतकऱ्यांना देतात. त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी सर्वच वयोगटातील शेतकऱ्यांची वर्दळ तर असतेच शिवाय ते स्वत:ही पुढाकार घेऊन शेतकरी मेळावे घेऊन मार्गदर्शन करतात. 

पहा शिवाजीराव पंडित यांच्या जीवनातले काही क्षण फोटो गॅलरीमध्ये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com