shivajirao pandit and kranti morcha | Sarkarnama

अभिजीतचे बलिदान वाया जाऊ देऊ नका आणि कोणी जीवही देऊ नका : शिवाजीराव पंडित

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

वयाची 80 पार केलेल्या शिवाजीराव पंडित यांनी मराठा आरक्षण मागणी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलेला आहे. मराठा क्रांती मोर्चात तन - मन - धनाने सहभाग देणाऱ्या शिवाजीराव पंडित यांनी मराठा आरक्षण परिषद, धरणे आंदोलनांत सक्रीय सहभाग नोंदविला. 

बीड : मराठा आरक्षणाबाबत सरकार नकारात्मक असल्याचे स्पष्ट झाल्यानेच मधल्या काळात उद्रेक झाला. हिंसक आंदोलनांबरोबरच समाजातल्या तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिले. अभिजीत देशमुखचे बलीदान वाया जाणार नाही. मात्र, यापुढे कोणत्याही तरुणाने हा मार्ग पत्करु नये असे आवाहन जेष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी केले. मराठा आरक्षण मागणी आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात जिल्ह्यातून झाली. बघता - बघता आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला. कुठे लोकशाही मार्गाने आंदोलने झाली तर तर कुठे हिंसक वळणेही लागली. तोडफोडीच्या घटनांसह समाजातील तरुणांनी मराठा आरक्षणाची मागणी करत आपली जीवनयात्राही संपविली. 

विडा (ता. केज) येथे अभिजीत देशमुख या उच्चशिक्षीत तरुणाने अशीच चिठ्ठी लिहीत गेल्या आठवड्यात जीवनयात्रा संपविली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या चळवळीतील आग्रणी शिवाजीराव पंडित यांनी अभिजीत देशमुख कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. मराठा समाज आरक्षण नसल्याने शिक्षण, नोकऱ्यांत मागे पडला आहे. एकेकाळी समाजातील सर्वात मोठा भाऊ आणि केवळ देणेच माहित असलेला मराठा समाज आज आपला हक्क मागत असताना सरकार चालढकल करत आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता या समाजाला आरक्षण देण्याच्या न्याय्य मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन चिघळण्यामागे सत्ताधाऱ्यांची चुकीच्या वक्तव्य कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

मात्र कोणीही कायदा हातात घेऊ नये, शांतता आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावे. आरक्षणासाठी बलिदान वाया जाणार नाही यासाठी समाजाने या मागणीत सातत्य ठेवावे. तसेच कोणीही असे टोकाचे पाऊल उचलून आपले कुटूंब उघड्यावर पाडू नये. आपण या वयातही आंदोलनात सक्रीय मात्र लोकशाही मार्गाने सहभाग घेत आहोत. समाजाच्या तरुणांचे रक्त सळसळत असले तरी हा लढा जिंकण्यासाठी शांतता गरजेची आहे.यावेळी श्री सुस्कर, श्री डावकर, धैर्यशील देशमुख, बापूसाहेब देशमुख उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख