shivajirao naik and bjp | Sarkarnama

शिराळ्याच्या नागाची भाजपकडून उपेक्षा ?

संपत मोरे
रविवार, 2 सप्टेंबर 2018

पुणे : "" मला मंत्रिपद मिळणे हा पक्षीय पातळीवरचा विषय आहे. आपण आपलं काम करत रहायचं. पक्ष विचार करेल असं मला वाटतंय, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर पक्षश्रेष्ठी विचार करतील" असा आशावाद आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केला. 

पुणे : "" मला मंत्रिपद मिळणे हा पक्षीय पातळीवरचा विषय आहे. आपण आपलं काम करत रहायचं. पक्ष विचार करेल असं मला वाटतंय, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर पक्षश्रेष्ठी विचार करतील" असा आशावाद आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केला. 

नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यांच्या कामेरीच्या प्रचार सभेत 'भाजपचे सरकार सत्तेवर आले तर शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद देऊ' असे नितीन गडकरी यांनी जाहीरपणे सांगितले होते. पण भाजप सरकारला चार वर्षे झाली तरी त्यांना भाजपकडून मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजी आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची ओळख असलेल्या आणि ज्यांना 'शिराळ्याचा नाग' म्हटलं जातं. त्या शिराळ्याच्या नागाची भाजपकडून उपेक्षा झाल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. 

नाईक हे नाव सांगली जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या चार दशकापासून आहे. सांगली जिल्हा परिषदेत सर्वाधिक काळ अध्यक्षपदावर काम केलेला नेता आणि सांगली जिल्ह्यातील खेडोपाडी पोहोचलेला नेता म्हणून त्यांची ओळखं आहे. गावोगावी त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांचा जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ विधायक कामांनी चर्चत राहिला. त्यांच्यानंतर या पदावर आलेले अध्यक्ष नेहमीच 'नाईक साहेबांचा' आदर्श डोळ्यासमोर ठेवतात एवढा लोकाभिमुख कारभार त्यांनी केला आहे. 

1995 हे साल टर्निंग पॉईंट ठरले. विधानसभा निवडणुकीत त्यावेळी कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. तेव्हा त्यांनी बंडखोरी केली. अपक्ष म्हणून निवडणूही आले. इकडे शिराळ्यात विजयी झाले तर दुसरीकडे राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले होते. अर्थात काही अपक्ष आमदारांची मदत घेऊन युती सत्तेच्या सिंहासनावर बसली. सांगली जिल्हातील पाच अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यापैकी नाईक एक होते. ते पुढे युतीमध्ये सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री बनले. 

1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर नाईक राष्ट्रवादीत गेले. तेव्हा त्यांनी कॉंग्रेसच्या सत्यजित देशमुख यांचा पराभव केला. त्या सरकारच्या काळातच त्यांचा जयंत पाटील यांच्याशी वारणेच्या डाव्या कालव्यावरून संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष टोकाचा होता याच काळात काही उत्साही पत्रकारांनी जयंत पाटील यांना वाळव्याचा वाघ आणि नाईक यांना शिराळ्याचा नाग अशी उपमा दिली. ही उपमा त्यांच्या कार्यकर्त्यांनाही रुचली, याच कारण म्हणजे जयंत पाटील शिराळ्याला गेले कि त्यांचे कार्यकर्ते आलाय वाघ कुठाय नाग ?अशी घोषणा द्यायचे तर तशीच घोषणा नाईक इस्लामपुरात आले की त्यांचे कार्यकर्ते द्यायचे आलाय नाग कुठाय वाघ ? वाघाची आणि नागाची ही झुंज दक्षिण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली होती. 

त्यानंतर 2004 साली नाईक यांनी अपक्ष लढत राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांचा पराभव केला. त्यानंतरच्या काळात ते कॉंग्रेसमध्ये गेले. 2009 साली त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली .या निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांनी त्यांचा पराभव केला. या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची थोडी पीछेहाट झाल्यासारखी झाली पण साली मात्र ते भाजपमध्ये गेले आणि पुन्हा विजयी झाले. त्यांच्या भाजपप्रवेशानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान आणि नंतर भाजप सरकार आल्यावर त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतची चर्चा आजही सुरु आहे. पण त्यांच्या वाटयाला अदयाप मंत्रिपद आलेले नाही. नाईक सयंमी आहेत त्यांनी मंत्रिपद मिळावे म्हणून हट्ट धरलेला नाही. ते म्हणतात ,मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर पक्षश्रेष्टी विचार करतील'त्याना भाजप संधी देईल अशी आशा आहे. 

संबंधित लेख