शिवाजीपार्क आणि बाळासाहेबांचा झंझावात ! 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एकेकाळचा कार्यकर्ता असा होता की कोणी येऊ की राहो तो दसरा मेळाव्यासाठी घराबाहेर पडायचा. त्याच्या खिशात पैसे असो की नसो. हातात भगवा झेंडा घेऊन तो शिवाजीपार्कवर दाखल होत असे. आज मात्र तशी निष्ठा शोधून सापडणार नाही. त्यामुळे हजार दोन हजार गाड्या मेळाव्यासाठी बुक कराव्या लागतात. आज पक्ष बदलले आणि त्याबरोबरच कार्यकर्त्यांचे रंगही !
शिवाजीपार्क आणि बाळासाहेबांचा झंझावात ! 

मुंबईतील आझाद मैदान, ऑगस्ट क्रांती मैदान (गोवालिया टॅंक) आणि शिवाजी पार्क ही मैदाने ऐतिहासिक चळवळीचे साक्षीदार. या तीन मैदानापैकी शिवाजी पार्कवर सभा होणे म्हणजे अभिमान बाळगला जातो. याच शिवाजी पार्कचे पूर्वीचे नाव माहीम पार्क असे होते. खरेतर ब्रिटिशांनी हे पार्क राखीव ठेवले होते. पुढे माहीम पार्कचे नामांतर होऊन ते शिवाजी पार्क झाले. 

दादरच्या पश्‍चिमेला प्लाझा सिनेमापासून थोडं पुढे गेले की अथांग पसरलेल्या अरबी समुद्रापासून काही अंतरावर हे शिवाजी पार्क आहे. याच शिवाजीपार्कवर संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी झालेल्या जाहीर सभा असतील किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या रेकॉर्ड ब्रेक जाहीरसभा असतील. शिवाजी पार्क आणि शिवसेना हे जणूकाही समीकरणच होऊन गेले होते. शिवाजी पार्क माणसांनी फुलविणे कुणाचेही काम नव्हते. केवळ बाळासाहेबांमध्ये ती धमक होती. साहेबांची सभा आणि मैदान कधी भरले नाही असे कधी झालेच नाही. 

हे मैदान खूप मोठे असल्याने आणि ते भरेल एव्हढी गर्दीगोळा होणे आव्हानात्मक असल्याने थोडच नेते येथे सभा लावतात. बाळासाहेबांप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे मैदान भरून दाखविले होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शिवाजीपार्कवर झालेल्या या पक्षाच्या सभेनेही उच्चांक केला होता. त्यावेळी शिवाजीपार्क भगव्याऐवजी पांढऱ्या टोप्यांच्या रंगाने फुलले होते. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आला आहे. या मेळाव्याचे वैशिष्ट्य असे की राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने दसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत पोचत असत. प्रत्येक शिवसेना कार्यकर्त्याला एकच आस लागून राहिलेली असायची ती म्हणजे बाळासाहेबांचे भाषण ऐकण्याची. बाळासाहेबांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी त्या दिवशीचे वातावरण मोठे आनंददायी असायचे. कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणजे काही विचारूच नका. 

भगवे फेटे, भगव्या टोप्या, प्रत्येकाच्या हातात भगवा ध्वज, जय शिवाजी, जय भवानी बरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जयजयकार आणि विरोधकांची खिल्ली उडविणाऱ्याही घोषणा. मोठ्या गमतीदार घोषणाही कानावर पडायच्या. शिवसेनेने या मेळाव्या दरम्यान विरोधकांची ठर उडविली नाही असे कधी होतच नसे. 

सांयकाळी सहासाडेसहा वाजण्याच्या सुमारास दत्ताजी साळवी, वामनराव महाडीक, मनोहर जोशी, छगन भुजबळ, सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, सतीश प्रधान, मधुकर सरपोतदार आदी ज्येष्ठ नेते मंचावर विराजमान व्हायचे. प्रत्येकाची भाषणे व्हायची. सात साडेसात वाजण्याच्या सुमारास जेव्हा बाळासाहेबांचे मंचावर आगमन होत असे तेव्हाच तो क्षण पाहण्यासारखा असे. फटाक्‍यांची आतषबाजी, जयघोषांनी शिवाजीपार्क शिवसेना कार्यकर्ते दणाणून सोडत असतं. ती पाच दहा मिनिटे ही बाळासाहेबांसाठीच असत. बाळासाहेब मंचावर आले की सर्वत्र पिनड्रॉप सायलेन्स असे. 

शिवसेनेच्या त्यावेळच्या नेत्यांपैकीच छगन भुजबळ असे एक नेते होते, की ते जेव्हा भाषणाला उठायचे ना तेव्हा संपूर्ण शिवाजीपार्क उभे राहायचे. भुजबळांचे भाषण सुरू होण्यापूर्वी प्रेक्षक कल्लाच करायचे. दातओठ खाण, शर्टच्या बाह्या वर सारत आणि मुठी आवळत ते विरोधकांचा असा काही समाचार घेत की काही विचारू नका. भुजबळ म्हणजे त्यावेळची शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ होती. भुजबळांप्रमाणेच इतर नेतेही सभा जिंकत. शिवसेनेचा एक एक नेता म्हणजे हिराच होते. बाळासाहेब आणि शिवसेना नेत्यांचा काय झंझावात होता. तो झंझावात आज आठवला की आज तीच का ही शिवसेना असा प्रश्‍न पडतो. 

गेल्या काही वर्षात राजकारणही पार बदलून गेले. पूर्वीच्या शिवसेनेत आजच्या शिवसेनेला पाहणेही योग्य ठरणार नाही. पूर्वी सारखे वडापाव खाऊन पक्षासाठी झटणारे नेतेही आज राहिले नाहीत. ही अवस्था आता सर्वच पक्षात आहे. मात्र शिवसेनेकडे आजही कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे आहे. ते बाळासाहेबांनी विणून ठेवले आहे. बाळासाहेबांवर श्रद्धा असल्याने शिवसेनेत निष्ठावंतांची फौज आहे हे खरे असले तरी कार्यकर्तेही स्वत:हून सभांना जात नाहीत तर त्यांना न्यावे लागते. घोडागाड्या कराव्या लागतात. आरामदायी लक्‍झरी बस, बिसलरी वॉटर, वडापावच्या जागा चायनीज लागते. 

शिवसेनेला आज दसरा मेळाव्याची जबाबदारी वैशिष्ट्य अशा नेत्यावर सोपवावी लागते. त्यासाठी टीम करावी लागते. लोकांना सभेसाठी चला म्हणण्याची वेळ आली आहे की काय ? कॉंग्रेसच्या सभांना पैसे देऊन माणसं आणावी लागतात असा आरोप वर्षानुवर्षे ज्या पक्षांनी केला त्याच पक्षावरही आज चला, बसा गाडीत ? चला विचाराचे सोने लुटायला म्हणण्याची वेळ आली का ? असा प्रश्‍न पडतो. 

ठाकरेंची जादू 
एका म्यानात दोन तलवारी नांदू शकत नाहीत हे मान्य. पण, शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना नेहमीच असे वाटते की उद्धव आणि राज एकत्र असते तर महाराष्ट्राचे चित्र नक्कीच बदलले दिसले असते. जर राज आज शिवसेनेत असते तर दसरा मेळावा कसा झाला असता. बाळासाहेबांप्रमाणे तो झंझावात आजही टिकून राहिला असता का ? राज-उद्धव या दोन भावाचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्र शिवाजीपार्कवर लोटला असता का ? खरेतर बाळासाहेबांची दसऱ्यामुळे आठवण झाली म्हणून हे दोघेही भाऊ पुन्हा आठवले. आज ते दोघेही दोन पक्षात आहेत. ते दोघेही सारखेच मुद्दे घेऊन लढता आहेत. दोघांमध्ये तशी समानता आहे. एक अत्यंत आक्रमक तर दुसरा मवाळ आहे. तरीही दोघे आपल्या आपल्या ठिकाणी बलशाली आहेत. काही असो आजही महाराष्ट्रात ठाकरेंची जादू चालते. ते सत्तेवर असो की नसो ! 

उद्या नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण होणार आहे. त्यांच्या मुखपत्राने जोरदार जाहिरातही केली आहे. तेलाचा भडका, महागाईचा तडाखा, महिलांचे शोषण, दुष्काळाची आग, अयोध्येचे राम मंदिर आदी मुद्यावर उद्धव ठाकरे कडाडून हल्ला करणार आहेत. त्यांचेही विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील जनता आणि विरोधकही उत्सुक आहेत. अर्थात उद्या एकच लक्ष असणार आहे ते शिवाजी पार्ककडे. ते कसे दिसते याकडे ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com