shivaji mane in rebel mood in swabhimani | Sarkarnama

हातकणंगल्यात शिवाजी मानेंचे राजू शेट्टींविरोधात बंड 

संजय पाटील 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव माने यांनी यावेळी बंड केले आहे. 

कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव माने यांनी यावेळी बंड केले आहे. 

पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी (ता. 9) मेळावा घेण्यात येणार असून हातकणंगले लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. 

लढवय्या कार्यकर्त्याना केवळ आंदोलनावेळी वापरून घ्यायचे आणि विकासकामे करताना मात्र अन्य पक्षातील लोकांना घ्यायचे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांच्यावर होवू लागला आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मेळाव्यात स्वाभिमानीमध्ये फूट पडणार काय ? या कार्यकर्त्यांची पुढील दिशा काय असणार ? याकडे शेतकऱ्यांसह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

स्वाभिमानीतून सदाभाऊ खोत बाजूला होवून जेमतेम वर्ष होण्यापूर्वीच आता हातकणंगले तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडलेले शिवाजीराव माने यांनी शेट्टींच्या विरोधात दंड थोपटले आहेत. स्वाभीमानीच्या नेत्यांकडून सच्चा कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. चांगली वागणूक दिली जात नसल्याने कार्यकर्ते, नागरिक अस्वस्थ आहेत. कार्यकर्त्यांसह नागरिक या मेळाव्यास उपस्थित राहून आपली पुढील भूमिका ठरवणार असल्याचे शिवाजीराव माने यांनी यावेळी सांगितले 

संबंधित लेख